Search

आता माझी ‘पाळी’

काल नेहमी प्रमाणे फेसबुक वर ‘काम’ करत होते. देशात काय चालले आहे याचा आढावा सद्या फक्त फेसबुक वर मिळतो. जे लोक फारच गंभीर आहे, अभ्यास करुन काही एका अनुभवानंतरच लिहायचे असे तत्वज्ञान मानतात, पाळतात तेवढीच लोक फक्त त्यांचे अभ्यासपूर्ण लेख पेपर्स मधून, मासिक किंवा वार्षिक अंकांमधून लिहितात किंवा पुस्तक छापतात. मग अशांना वाचायचे असले की काही पेपर्स वाचावे लागतात. पण आजकाल काही गंभीर लेखक, वाचक ही फेसबुक वर येऊन वाचाळ लोकांच्या दुनियेत काय चालले आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. मग इथे लोक ‘काहीही बोलतात’ याचा त्यांना त्रास होऊ लागला, त्यांची संवेदनशीलता जागी झाली की ते मग काही गंभीर लेखन फेसबुक वर शेअर करतात. त्यामुळे काही वेळ चांगल गंभीर, विषयाला धरुन, अभ्यासपूर्वक, काहीतरी चांगला पर्याय देणारे लेखनही कधी कधी इथेच फेसबुकवर वाचायला मिळते. नाहीतर भाडीपा आहेच. अस ऐकून माझ्या आयुष्यात सद्या फेसबुक जागा करुन आहे. आजकाल तिथे ‘हैपी टू ब्लीड’ ‘पाळी माझी मैत्रीण’ अस काय काय छान छान पण असत बर का. काल असाच एक चांगला व्हिडिओ पहायला मिळाला. त्यात पाळी नावाची मैत्रीण जेव्हा मुलींच्या घरी येते तेव्हाची त्यांची मानसिकता, मनात चाललेली घालमेल, त्या पाळी साठी कराव्या लागणाऱ्या तयाऱ्या, ‘ती’ आलेली असते तरी तिचे अस्तित्व कोणाला कळूच नये यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध कसरती अस सगळ त्यात दाखवलं.


कशाला हे दाखवलं ह्या मानसिकतेतून मी कधीच बाहेर आले आहे. म्हणून मी तो व्हिडिओ चांगला दोन तीन वेळा पाहिला आणि शेअर ही केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या सारख्या शेकडोंनी तो लाईक केला होता आणि शेअर ही केला होता. यात माझ्याच विचारांच्या माझ्या मैत्रिणी होत्या, मित्रही होते त्यात मला आश्चर्य वाटलं नाही पण त्यात बरेच अनोळखी पुरुष होते. ते कदाचित ‘पाळी’ कडे सकारात्मक नजरेने पहात असावेत नक्कीच नाहीतर त्यांनी अस पुढे पाठवलं नसत. ते माझ्या ओळखीचे नाहीत म्हणजे ते माझ्या विचारांचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये असे मी मला समजावलं आणि एकदम मला आनंदी वाटायला लागलं की आता हा विषय बऱ्याच जणांसाठी ‘गुपित’ विषय राहिलेला नाही. लोक आता मोकळेपणाने यावर बोलतात, बोलू इच्छितात हा फारच चांगला साईन आहे. आणि मला याआधीच बरच काही आठवायला लागलं.


मला आठवत मी नववीत गेले तरी मला पाळी आलेली नव्हती. वर्गातल्या मुलींसमोर हा विषय निघाला की फारच वाईट नजरेने त्या माझ्या कडे पहायच्या. ‘म्हणजे अजून आली नाही’ हा त्यांचा कटाक्ष मला फारच त्रास द्यायचा. आपण काहीतरी कमी आहोत हा न्यूनगंड जो तेव्हा बसला तो काढायला खूपच मेहनत करावी लागली. शेवटी नववीच्या दिवाळीत कधीतरी एकदाची पाळी आली. त्या दिवशी मी शाळेतच होते. तेव्हा मी हॉकी खेळायची. त्या दिवशी बाईंनी खूपच प्रॅक्टिस घेतलेली होती. माझ खूप कंबर आणि पोटऱ्या दुखत होत्या. मी घरी गेली. तेव्हा आम्ही वस्तीत रहात होतो. मला खूप ब्लिडिंग झालं आहे हे लक्षात आल्यावर मी आईला सांगितलं, ती थोडीशी हसली आणि मला ‘कपडा’ कसा घ्यायचा असतो ते सांगितलं. जेव्हा कळल की ही पाळी आहे तेव्हा जो आनंद झाला की सुटलो एकदाचे त्या नजरांमधून त्याच वर्णन करु शकत नाही. दुसऱ्या दिवशी वर्गात आल्या नंतर ज्या ज्या वाईट नजरेने माझ्या कडे पहात होत्या त्या सर्वाना ही खूष खबर दिली. पण त्या कोणीच खूष झाल्या नाही. मला कळेचना की त्या खूष का झाल्या नाही. नंतरचा त्रास, आईच्या जुन्या लुगड्यांचे कपडे मी वापरायचे त्यामुळे मांड्या घासून ज्या काही जखमा व्हायच्या त्या समजायला लागल्यानंतर वर्गातल्या मुली खूष का झाल्या नाही याचा अर्थ कळू लागला. दर महिन्याचा त्रास, नको नको व्हायचे.


पुढे अकरावीला गेले आणि समता आंदोलन नावाच्या समाजवादी विचारांच्या युवक संघटनेची सदस्य झाले, त्याच वेळी नोकरीसाठी महिला हक्क संरक्षण समितीत जॉईन झाले आणि अनेक प्रश्नांचा उलगडा झाला. मला आठवतय मी बहुतेक बारावी किंवा एफ वाय ला असावी. अभिव्यक्तीच्या अनिता बोरकर हिने ‘मासिक पाळी आणि मी’ असे कार्यकर्त्यांसाठी एक सत्र घेतले होते. माझ्याच वयाच्या साधारण वीस ते पंचवीस मुली आम्ही त्यात सहभागी झालो होतो. तिथे मी माझा एक अनुभव मांडला होता. आम्ही शाळेत सरकारी बसने जायचो. पास काढलेले असायचे. नाशिक मधील फुलेनगर ह्या महाकाय वस्तीत मी राहायचे तेव्हा. बस तिथूनच सुटायची. घरच सर्व आवरुन सकाळी ९.३० ची बस घ्यावी लागायची कारण शाळा दहा ते पाच अशी होती. मग सकाळच्या गडबडीत कधीच वेण्या घालून व्हायच्या नाही. मग आई वेणीची सुरुवात करुन द्यायची आणि मग बस मध्ये ती वेणी पूर्ण केली जायची. हे पूर्णत्वाला न्यायचे कामही बस मधल्या आमच्या पेक्षा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या मुलीच करायच्या. आवरता येत नाहीत तर केस कापावेत असे उच्च विचार तोपर्यंत आमच्या पर्यंत पोहोचले नव्हते आणि मुलीनी केस कापणे आणि मुलांनी वाढवणे हा तेव्हा सांस्कृतिक गुन्हा होता. आमच्या वस्तीत पाळी ह्या विषयावर एकदा चोरुन झालेल्या चर्चेत पाळीच्या काळात जर पुरुषाचा स्पर्श झाला तर ती मुलगी गरोदर होते अशी माहिती कोणीतरी शेअर केली होती. दुसऱ्या दिवशी मी बस मधून शाळेत चालले होते. माझा बसचा पास संपला होता म्हणून मी तिकीट काढायला पैसे काढले. तेव्हा आमच्या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचेशी आमची खूपच दोस्ती असायची. ते आमची चेष्टा करायचे. आम्ही आमचे आपापसातली भांडण त्यांना सांगायचो. गमती जमती शेअर करायचो इ.इ. त्यादिवशी असेच आमचे ते ‘बाळू काका’ चेष्टा करीत होते आणि मला तिकीट काढायचे होते. मी तिकिटासाठी पैसे असे वरतून टाकून दिले, त्यांचा स्पर्श नको म्हणून. त्यांना काय माहित की मला ‘शिवायचे’ नाही. नेहमीच्या सवयीने त्यांनी माझा हात पकडला, हातातून पैसे घेतले आणि डोक्यावर टपली मारली आणि तिकीट दिले. ज्या मिनिटाला त्यांनी माझा हात धरला त्या मिनिटाला मी माझ्या पोटाकडे पाहिले की मी गरोदर तर नाही. झाले. प्रसंग संपला. पुढे तीन तास ऐकणारे हसत होते जस तुम्ही आता हसत आहात.

माझी आजी आणि तिची पिढी ह्या विषयावर बोलायचीच नाही पण बाहेर मात्र बसायची. माझ्या आईची पिढी त्यावर किमान बोलू तरी लागली आणि बऱ्याच घरांमधून बाहेर बसने थांबले. माझी पिढी नुसत घरात नाहीतर चार चौघात ही या विषयावर बोलू लागली. सगळीकडेच हे बदल झाले असे नाही. मला आठवतं ही २००२ ची गोष्ट असावी. मी महिला आणि मुलांकरिता सहाय्य कक्षाच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत होते. दादर ला शारदाश्रमा समोरच्या इमारती मध्ये रहात होतो. आमच्या मजल्यावर एक कुटुंब रहात होत. त्यांना चार मुली आणि एक मुलगा होता. त्या मुलीना पाळी आली की व्हरांड्यात राहावे लागत असे. कोणाची ना कोणाची पाळी सुरुच असायची आमी कोणी ना कोणी बाहेर बसलेलेच असायचे. आणि सगळ्या बिल्डींग मध्ये यावर चर्चा आणि हशा असायचा. त्यामुळेच आपल्याकडे परिवर्तनाच्या बाबतीत असे म्हणतात की आपल्या एकाच देशात एकाच वेळी भारत आणि इंडिया रहात असतात. आता तर मित्राला, बॉयफ्रेंडला, नवऱ्याला, वडिलांना आपापल्या आयुष्यातल्या स्त्रियांच्या पाळीच्या तारखा माहित असतात. त्यात नेमका काय त्रास होतो हे माहित असते, मूड मध्ये काय काय बदल होतो याची व्यवस्थित जाण असते आणि त्याप्रमाणे घरातल वातावरण सांभाळायचा ही प्रयत्न होतांना दिसतो. प्रमाण कमी असेल पण लक्षात येण्यासारखा हा बदल झालेला दिसतो. आता तर सिनेमात, पब्लिक प्लेस मध्ये हे सर्व विषय न लाजता सहज बोलले जातात. कबीर सिंग मधला हिरो ही यावर अतिशय सकारात्मक बोलला ते मला फारच आवडलं.


पूर्वी घरातल्या स्त्रियांच्या जुन्या साड्या ‘कपडा’ म्हणून वापरल्या जायच्या. त्यांनतर ठरवून जरा मऊ साड्या ह्यासाठी वापरल्या जायला लागल्या. मग मोठ्या जाहिरात करत पॅड आले. आधी जरा स्वतःचे मत असलेल्या, थोडे स्वतःचे पैसे असलेल्या आणि ते पैसे वापरायचे अधिकार असलेल्या स्त्रियांनी ह्या पॅडचे जोरदार स्वागत केले. आता हळूहळू सर्वच वयोगटात किमान शहरात तरी याचा चांगलाच प्रचार प्रसार झालेला दिसतो. आता मनाने, वागण्याने भ्रष्ट असलेले लोक कुठेही भ्रष्टच वागतात तस शासकीय आश्रमशाळेत दिले जाणारे पॅड तर का दिले असा प्रश्न पडेल वापरणाऱ्याला इतके ते वाईट, गुणवत्ता नसलेले आहेत. पुढे जाऊन मुली ‘टेंम्पून’ सारख्या सोयी ही सहज वापरायला लागल्या. मला आठवत की, ट्रेनिंग मध्ये आजूबाजूला सर्व पुरुष आणि पाळी आलेली असेल तर फार हाल व्हायचे. बहुतेक ट्रेनिंग सेंटर मध्ये महिलांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र सुविधा नाही. त्यामुळे पटकन पॅड बदलायला मिळायचे नाही मग आम्ही कपड्यांवर कपडे घालायचो. आणि मग ‘माझ्या मागे बघ ग’ हा एकमेकीला पार्श्वभाग दाखवण्याचा जाहीर कार्यक्रम व्हायचा. मला आठवत अशा वेळी पास होणारे ब्लड जाणवायचे, सतत टेन्शन असायचे की ब्लड बाहेरच्या कपड्यांपर्यंत आल तर..... तसेच ट्रेनिंग घ्यायचो आम्ही. पुढे टेम्पून आल्यामुळे ही चिंता बरीच कमी झाली कारण टेम्पून वजायानातून आत ठेवायचे असल्यामुळे ब्लड फ्लो खाली येण्याचा प्रश्नच राहायचा नाही. पण परत वजायाना मध्ये काहीतरी अडकल्याचा त्रास व्हायचाच. एक दोन महिन्यापूर्वी मी महिला उद्योजकांच्या एका प्रदर्शनात गेले होते तर तिथे अतिशय मऊ असे कापडाचे पॅड उपलब्ध होते. जे वापरायला सोपे आणि मुख्य म्हणजे धुता येत होते. मऊ कापड असल्यामुळे कडक होण्याचा आणि मांड्याना त्या कपड्याने जखम होण्याचा प्रश्न येत नाही. हे परत येण्या मागचे कारण आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याचे कारण म्हणजे पॅडची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची हा मोठा प्रश्न उभा रहिला आहे. कारण पॅड जमिनीत जिरत नाही आणि जाळायचे ठरवले तरी ते कुठे, कधी आणि कसे जाळायचे हा प्रश्न उरतोच.

असो, आता सहजपणे ह्या विषयावर जाहीर बोलणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. आता मुली सहजतेने वडील, भाऊ, मित्र यांना येतांना पॅड आण अस सांगतात. किराणा घेतांना पुरुष पॅड घेण्याची आठवण करुन देतांना दिसतो आहे. आई, मुलगी, बायको अचानक चिडचिडी झाली तर घरातले पुरुष घरातल्या दुसऱ्या स्त्रीला किंवा घरात दुसर कोणी नसेन तर त्याच स्त्री ला तुझी ‘तारीख’ सुरु आहे का अस विचारतात, मागची तारीख आठवतात आणि विरोध करायचे थांबतात, चर्चा थांबवतात किंवा माघार घ्यायलाही तयार होतात. परवा प्राची पाठक चा एक मुद्दा फेसबुक वर वाचत होते. ती म्हणाली ज्या दिवशी बाया सहजपणे ‘मला आज ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे मी रजा घेत आहे’ अस रजेच्या अर्जावर लिहीन तो आपल्यासाठी सुदिन असेल. आता पर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासावरून तरी हे फार अवघड आहे असे वाटत नाही. तो दिन लवकर येवो हीच सर्वाना शुभेच्छा.

58 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922