Search

आपण व डिजिटल जगातील गंमती जंमती


वयाची तेरा वर्ष पूर्ण होत नाहीत तर बहुतेकांकडे स्वतःचे स्मार्ट फोन्स असतात. काही काही वेळा तर त्या आधीही. तरुण तरुणींचं अर्ध अधिक आयुष्य व्हर्चुअल जगाशी जोडलेलं असतं. मग शाळा असो, कॉलेज असो, डेटिंग असो नाहीतर गेमिंग आणि सोशल मीडिया. आवडता पदार्थ ऑर्डर करण्यापासून टीपी पर्यंत सगळं ऑनलाईन चालू असतं.


डेलॉइट मोबाईल कन्झ्युमर सर्व्हे २०१५ प्रमाणे पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक सकाळी उठल्याबरोबर पहिल्या पाच मिनिटात स्वतःचा मोबाईल चेक करतात. यात तरुण तरुणींची संख्या अर्थातच जास्त आहे. उठल्याबरोबर तोंड धुण्या आधी मोबाईल उघडून बघण्याची सवय अनेकांना असते. पहिल्या पाच मिनिटात डोळे उघडता उघडता आधी whatsup आणि फेसबुक चेक करतात. एकवेळ डोळे नीट उघडले गेले नाही तरी चालतील पण मोबाईलवरचे अपडेट्स उघडण, नोटिफिकेशन बघणं अधिक महत्वाच होऊन बसलं आहे यात शंका नाही. गादीत लोळतच उपदेशाचे डोस पाजणारे कमी नाहीत. सर्वेक्षणात दुसरी महत्वाची गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे युजर्स सर्वप्रथम सामाजिक माध्यमांमध्येच शिरकाव करतात. याच सर्वेक्षणात असंही दिसून आलं की २८ टक्के वापरकर्ते दिवसभरात ११ ते २५ वेळा फोन चेक करतात तर २२ टक्के लोक २६ ते ५० वेळा करतात. आणि १७ टक्के लोक ५१ ते १०० वेळा दिवसभरात फोन चेक करतात.या सगळ्याचा अर्थ इतकाच, आपण झोपतो तेवढाच काळ आपण स्वतःला आपल्या फोन पासून दूर ठेऊ शकतोय. उरलेल्या सगळ्या वेळात अधून मधून मोबाईलवर डोकवत राहणं ही आपली सवय बनली आहे. whats app वर कुणी काही मेसेज टाकलाय का? आपण केलेल्या एखाद्या मेसेजला काही उत्तर मिळालं आहे का? फेसबुकच्या स्टेटस अपडेटला किती लाईकस मिळाले, कोण काय म्हणालं आहे, अपेक्षित लाईकस मिळाले नाही तर का मिळाले नाही, डेटिंग ऍप्स वर आपल्याशी कनेक्ट कोण होतंय, टिंडरवर काय हालचाल आहे आणि गेमिंगमध्ये नवी लेव्हल कशी क्रॉस करता येईल या सगळ्याचा विचार करण्यात आणि आपल्या रोजच्या जगण्याचं अपडेट समाज माध्यमात देण्यात आपण आपल्या आयुष्याचा बराच वेळ देतोय. आपण कुठे गेलो, कसे गेलो, कधी गेलो, कुणा बरोबर गेलो इथपासून सगळं आपल्याला शेअर करायचं आहे. अनेकदा, काही शेअर झाल नाही तर आपल्या आयुष्यात काही एक्सायटिंग घडत नाहीये असंही वाटायला लागतं. लाईकस, अपडेट्स,नोटीफीकेशन, स्टेटस, डीपी, व्हिडीओ स्ट्रीमिंग, शेअरिंग, गेमिंग, पोर्नोच्या जंजाळात आपण झपाट्याने अडकत चाललो आहोत. माहिती मिळवण्याची, ती दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची, व्यक्त होण्याची, मनोरंजन करून घेण्याची इतकी प्रचंड घाई आपल्याला का आहे? सतत सोशल राहण्याने खरंच आपल्या जगण्यात काही फरक पडतोय का? इतकी प्रचंड माहिती गोळा करून त्या माहितीच आपण काय करतो? आपल्याला सतत मनोरंजन का हवं असतं? आणि या सगळ्यात आपल्या झोपेचं काय? तरुण पिढीला ही माध्यम गुलाम बनवू बघत आहेत का?

हे सगळं समजून घेऊया... पुढचे काही आठवडे!


- मुक्ता चैतन्य

लेखिका समाज माध्यमांची अभ्यासक आहे.


10 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922