Search

आमचा ‘देवदास’

९१-९२ सालातील गोष्ट. मी एफ.वाय. किंवा एस.वाय.ला असेल. कॉलेजला शिकण्यापेक्षाही संघटनेच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तासनतास कॉलेजच्या कँटिन मध्ये ज्या मिटिंग व्हायच्या, त्याचेच आकर्षण जास्त असायचं. आजच्या तुलनेने तेव्हाचा चहा स्वस्त होता. आमच्या कडे मनोहर तेवढा एकटाच कमावणारा बाकी आम्ही सगळे नऊ ते दहा जण नुसते फुकट खाणारे. आजचा चहा कोणाकडून याच्याच आयोजनात अडकलेले.

आमच्या पैकी पाच सहा जण वस्त्यांमध्ये राहणारे. तसे सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबातले. सकाळी नऊ वाजता आम्ही ‘कॉलेज’ला जातो असे घरात सांगून कॉलेजच्या कॅम्पस मध्ये दाखल व्हायचो. आल्या आल्या ग्रुपला शोधणे... जरा अभ्यासातही रमतो असे दाखवण्यासाठी वर्गावरून एक चक्कर... एक चक्कर लायब्ररी वरुन मारुन सगळेजण मागे पुढे करत कँटिन मध्ये जमा व्हायचो.

एकदा का कँटिन मध्ये बसलो की, जगाची चिंता सुरु करायची. आमची जागा ठरलेली. प्रत्येकाच्या जागा.. शेजारी बसणारा- बसणारी ठरलेली. पदार्थ ठरलेले. पै पै जमा करुन बिल भरायची पद्धत ठरलेली. शहरातल्या प्राथमिक शाळांच्या दुरवस्थे पासून चिंतेला सुरुवात व्हायची ती थेट अमेरिकेतल्या धर्मगुरूंनी त्यांच्या देशातील राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा की नाही इथ पर्यंत चर्चा रंगायच्या. साडे बारा ते एक पर्यंत चर्चा रंगायच्या. शेवटी बस त्याच वेळेला होती म्हणून उठायचो, नाहीतर...

नेहमी प्रमाणे त्या दिवशी आमची चर्चा अशीच रंगली होती. एक प्लेट मिसळ आणि चार डबे रस्श्यात बरेच पाव भिजले होते. तेवढ्यात आमच्याच वस्तीत राहणारा एक मुलगा पळत आला आणि मनोहरला आमच्यातून उठवून घेऊन गेला. “काय रे, काय झालं?” असे विचारे पर्यंत तो मनोहरला घेऊन बराच लांब गेला होता. जरा वेळ थांबून आम्ही आमची ‘चिंता, चर्चा’ चालू ठेवली. अर्धा एक तासाने मनोहर परत आला. तो थोडा चिडलेला, तो चिंताग्रस्त झाला असावा अस वाटल्यामुळे आम्ही त्याच्या मूड कडे जास्त लक्ष न देता त्यादिवशीची चर्चा आटोपून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी जमलो. नव्या दमाने नव्या विषयावर चर्चा सुरु केली तरी मनोहर गप्पच!

शेवटी आम्हीच आमचा मोर्चा मनोहर कडे वळवला. खूप चौकशी अंती कालची जी धावपळ चालली होती तिचा वृतांत समजला. ज्यामुलाने त्याला बोलावून नेले होते, त्याचे नाव देविदास. हा आमच्या वस्तीत राहणारा एक हुशार, होनाहार, गरीब मुलगा. आमच्याच बरोबर शिकणारा. एकाच बसने, एकाच स्टॉपवरुन आम्ही प्रवास करीत असू. परंतु त्याचा ग्रुप आमच्या ग्रुप पेक्षा स्टँडर्ड ! त्याच्या ग्रुप मधली मुल-मुली देखण्या, फिरणारी, पॉकेटमनी देऊ शकणाऱ्या कुटुंबातून आलेली, अमेरिकेत जाण्याची स्वप्न पाहणारी ! ‘काय हा दरिद्री, टँलेंटला स्कोप नसणारा भारत देश’ अशी वैचारिक मांडणी करणारी मुलं! यासगळ्या स्मार्ट मुलांबरोबर असतांना देविदास आम्हांला ओळख देण टाळायचा. त्याने आपल्या वागण्यात, बोलण्यात,राहणीमानात आपल्या ग्रुप नुसार बदल केला होता. एवढंच नाही, त्याने नावात सुद्धा बदल केला होता. तो आता त्याचं नाव ‘देव’ अस सांगायला लागला होता.

असा आमचा हा ‘देव’ त्या ग्रुप मधल्या एका मुलीच्या मनातल्या मनात प्रेमात पडला ते फक्त त्यालाच माहीती होतं. काल तिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याला ग्रीटिंग कार्ड घ्यायच होतं. त्याची किंमत होती पंचवीस रुपये. आमच्या काळी पंचवीस रुपये म्हणजे फार मोठी किंमत होती बरं! त्याच्या कडे फक्त दहा रुपये होते. उरलेल्या पंधरा रुपयांची व्यवस्था कशी करायची या चिंतेत तो मनोहर कडे आला होता. मनोहर कमावणारा असल्यामुळे तो सहज आपल्याला पैसे देईन ह्या आशेने तो आला. परंतु त्याची निराशा झाली. मनोहरला बेसिकली अशा ग्रीटिंग मधून भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीचाच राग होता. त्याला पैसे इथून नाही मिळाले तरी तो गप्प बसला नाही. त्याने कुठून तरी पैशांची व्यवस्था केली आणि आपल्या भावना एकदाच्या ‘ग्रीटिंग कार्ड’ द्वारा तिच्या पर्यंत पोहोचवल्याच.

झाला प्रसंग ऐकला, हळहळलो आणि गप्प बसलो. रोजच्या प्रमाणे दिवस येत होते जात होते. असेच सहा महीने गेले. एके दिवशी मनोहर कॉलेजला खूप उशिरा आला. खूपच चिंतेत होता. अवतारही कसातरीच. तो सरळ कँटिनमध्येच आला. त्याला पहिल्या पाहिल्या चर्चा बंद करुन सगळेच चौकशी करु लागले. कॉलेजला उशिरा का आलास ह्याची चौकशी केली. तेव्हा समजले की, आज सकाळी देविदासला वेड्याचे झटके आल्यामुळे दवाखान्यात अॅडमिट करावे लागले. कारण ऐकले तेव्हा तर आम्ही चाटच पडलो.

देविदासच एका मुलीवर प्रेम होतं हे मी आधीच सांगितलं आहे. एके दिवशी कॉलेज संपल्यानंतर तो सर्व ग्रुप घरी निघाला. काहीतरी विषयावरुन देविदास कुठे राहतो असा विषय निघाला. ज्या मुलीवर देविदासचे प्रेम होते ती चटकन, अतिशय तुच्छतेने म्हणाली, “मला माहीती आहे, देव त्या घाणेरड्या वस्तीत राहतो.”

देव तर एकदमच गप्प झाला. इतके दिवस आपण एका उच्च मध्यमवर्गीय कॉलनीत राहतो असे सांगून तो त्या ग्रुप मध्ये शान मध्ये रहात होता. आपण झोपडपट्टीत राहतो हे लपवण्यासाठी केलेली सर्कस वाया गेली. तीच सांगून झाल्यावर सर्व ग्रुप मोठ्याने हसला, देव मात्र एकदम गप्प झाला. सतत हसमुख राहणारा देव आता त्याच हासणच विसरला होता. कोणाशीही न बोलता आपला स्टॉप आल्यावर देव उतरला, घरी गेला, कोणाशीही काहीच न बोलता तसाच झोपला आणि रात्री अडीच तीन च्या दरम्यान उठला तोच मुळी ‘हां, मी झोपडपट्टीतच, गलिच्छ वस्तीतच राहतो”. अस म्हणत आणि मोठ्या मोठ्याने हसू लागला.

घरातले जाम घाबरले. पहिल्यांदा त्यांनी घरातल्या घरात त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज वाढतच होता. हळूहळू एक एक घर करत सगळी वस्ती जागी झाली. एवढ्या रात्री कुठल्या दवाखान्यात न्यावं तेच सुचेना. कशीतरी रात्र काढली आणि सकाळी त्याला दवाखान्यात अॅडमिट केलं. डॉक्टरांनी त्याच्या घरची परिस्थिती विचारली. त्याचा स्वभाव, त्याच राहणीमान इ. संदर्भात त्याची सगळी हिस्ट्री ऐकली आणि शेवटी ‘निदान’ केलं की त्याला वेड्याचे झटके आले आहेत. बस मधला प्रकार घडला तेव्हा आम्हीही त्याच बस मध्ये होतो, परंतु त्या प्रसंगातल कारुण्य, दु:ख, गांभीर्य आमच्या अजिबात लक्षात आल नव्हतं.

देविदास आजही त्याच वस्तीत, त्याच परिस्थितीत राहतो. मध्येच हसतो, मध्येच आपले केस, कपडे नीट करतो. मध्येच मोठ्याने बोलतो. ती मुलगी ग्रॅज्युएट झाली, तीच लग्नही झालं आणि तीच आयुष्य जोमाने सुरु ही झालेलं आहे. तिला जेव्हा कळाल तेव्हा त्या ग्रुप मधल्या सर्वांनाच वाईट वाटल. एकदा ते त्याला भेटायलाही दवाखान्यात येऊन गेले. अजूनही देविदास भेटतो. आम्हांला ओळखतो. मनोहर कडे ‘त्याच दिवसाच्या रागाने पाहतो’.

कोणाच चुकलं तेच कळाल नाही. झोपडपट्टीतल्या गलिच्छ पणाचा राग येवूनही त्याबाहेर पडण्याचा रस्ताच ज्याला गवसत नाही ते मग आहे ते सत्य लपवायला शिकतात. ते लपवतात म्हणून त्याचं चुकलं की जन्माने श्रीमंत कुटुंबाचे सदस्यत्व मिळालेल्या, फुशारक्या मारणाऱ्या आई बापाच्या कष्टांवर चैन करणाऱ्यांच, झोपडपट्टीला गलिच्छ शिव्या देणाऱ्यांच चुकतं? तेव्हा पासून शोधते आहे पण उत्तर सापडत नाही, पण ‘देव’ मात्र बरेच भेटले. काही वेडे झाले काही अजून तिथ पर्यंत पोहोचले नाहीत, एवढंच !

23 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922