ऑनलाईन शॉपिंग आणि आपण
अशी कल्पना करा, कि तुमच्या स्मार्ट फोनवर तुम्ही एखादं अँप उघडून बसला आहात. तुम्हाला काहीबाही खरेदी करायची आहे. ऑनलाईन शॉपिंग अँपला आवश्यक त्या सगळ्या सूचना तुम्ही दिल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्रॅण्डची वस्तू हवी आहे, किती रुपयांपर्यंत हवी आहे, नवीन हवी आहे कि मागच्या स्टॉकमधली हवी आहे...या आणि अशा अनेक सूचना देऊन आता अप्प्ने तुमच्यासमोर आणलेल्या पर्यायांमध्ये तुमच्या आवडीच्या वस्तूची शोधाशोध करताय, तितक्यात अँपमधून एक चेहरा बाहेर येतो. बाहेर म्हणजे शब्दश: बाहेर डोकावतो आणि तुम्हाला प्रश्न विचारायला लागतो. तुम्ही बराच वेळ सर्च करत असल्याने तुम्हाला नेमकं काय हवंय हे तो चेहरा विचारत असतो. तुम्ही त्याच्याशी थेट संवाद करता. तुमच्या गरजा सांगता आणि तो चेहरा तुमच्यासमोर अजून काही पर्याय ठेवतो. यात बघा म्हणून सुचवत अचानक गायब होतो. तर तुम्ही ड्रेस बघत आहात समजा, तर चेहरा गेल्याबरोबर तुम्ही ज्या ड्रेसवर क्लिक केलं आहे तो ड्रेस ऍनिमेटेड रूपात अँपच्या स्क्रीनमधून पॉप अप करतो. तुम्ही त्या ड्रेसचं डिझाईन, साईज अगदी जवळून बघू शकता. जणू काही तो ड्रेसच तुम्ही हातात घेतला आहे. परत दुसऱ्या ड्रेसवर क्लिक केल्यावर दुसरा ड्रेस अँपमधून बाहेर येत तुमच्यासमोर तरंगायला लागतो. हीच गत इतरही वस्तूंची. टीव्ही, फ्रिज, मोबाईल फोन किंवा अजून काहीही..तुम्ही जे काही मागाल ती वस्तू मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर येत तुमच्यासमोर असते. तुम्ही ती अगदी जवळून न्याहाळता, सगळी फीचर्स तपासून बघता, नवा स्मार्टफोन घेताना त्याच मॉडेल दुकानात जाऊन बघण्याची गरजच उरत नाही. पॉप अप झालेल्या ऍनिमेटेड मोबाईलमध्ये तुम्ही सगळी फीचर्स सहज बघू शकता. आणि मग तुम्ही ठरवता काय विकत घ्यायचं!
आता तुम्ही म्हणाल, वस्तू अशा कशा मोबाईलमधून पॉप अप करतील?
तर ते आज शक्य आहे. या तंत्रज्ञानाला म्हणतात ऑगमेंटेड रिएलिटी. म्हणजेच वास्तवाचा सत्यापासून काहीसा दूर नेलेला पण प्रत्यक्षाच्या अगदी जवळ आणलेला अनुभव. ऑगमेंटेड रिएलिटी या अनिमेशनच्या प्रकारात वस्तू खरीखुरी मोबाईलच्या अँपमधून बाहेर येत नाही पण तिची ऍनिमेटेड प्रतिकृती किंवा इतर कुठलीही ऍनिमेटेड गोष्ट जी वास्तवाच्या अगदी जवळ नेणारी आहे पण वास्तव नाही पॉप अप होऊ शकते. ग्राहकाचा अधिकाधिक वेळ वस्तू बघण्यात आणि त्यांची अचूक निवड करण्यात जावा यासाठीही भविष्यात ऑगमेंटेड रिऍलिटीचा वापर केला जाईल. इतकंच कशाला पण कुठेही बाहेर न जाता 'विंडो शॉपिंग;चा आनंद ऑगमेंटेड रिऍलिटीच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला सहज घेता येऊ शकतो.
ऑनलाईन शॉपिंगच्या भविष्याचा वेध घेत असताना ऑगमेंटेड रिएलिटीचा वेध आपल्याला घ्यावाच लागेल. भविष्यात ऑनलाईन शॉपिंगचे चित्र आजच्यापेक्षा पुष्कळ वेगळे असणार आहे. त्याच्या प्रयोगांना सुरुवातही झालेली आहे. मग त्यात अमेझॉन गो सारखा प्रयोग असेल किंवा शॉपिंग केलेल्या वस्तू लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोचवता याव्यात यासाठी ड्रोनचा वापर करता येऊ शकतो का याबद्दलची चर्चा असेल. घरातला फ्रिज सेल्फ मॉनिटरिंग असू शकेल का, तसा बनावता येऊ शकतो का यावरही भविष्यात संशोधन होऊ शकत. सेल्फ मॉनिटरिंग फ्रिज म्हणजे, फ्रिज एका कम्प्युटर चिपशी जोडून आठवड्याला कोणकोणत्या वस्तू आणि पदार्थ किती लागतात हे फीड करून ठेवायचं. वस्तू संपली कि फ्रिज ज्या ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरशी जोडलेला असेल तिथे वस्तू संपली कि फ्रिज स्वतःहून ऑर्डर नोंदवलं. अँपच्या माध्यमातून वस्तू नोंदवली गेली आहे, ती कधी मिळेल आदी गोष्टी फ्रिजच्या मालकाला म्हणजे ग्राहकाला समजतील. वस्तू घरपोच येईल आणि त्याचे पैसे अँप्सही जोडलेल्या ग्राहकाच्या बँकेच्या खात्यातून वजा होतील. ग्राहकाला फक्त या सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं उरेल. कामाच्या धावपळीत दूध राहिलं, अंडी विसरली, चीझ संपलं, फळं संपली तर एरवी जीव काढून मार्केटकडे धावत सुटावं लागतं. पण असा सगळी नेमून दिलेली कामं करणारा फ्रिज निर्माण केला गेला तर ऑनलाईन शॉपिंग सोपं होईल आणि ग्राहकांचा वेळही वाया जाणार नाही. अशा कितीतरी कल्पना भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकतात. वस्तू पोचवण्यासाठी ड्रोनच्या वापरला भविष्यात सुरुवात झाली तर पॅकेजिंग पासून वस्तू नेमकी ग्राहकालाच मिळाली आहे ना याच्या खात्रीलायक यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. या सगळ्यात जिपीएस, लोकेशन डिटेक्टर, व्हिडीओ मेसेजिंग या यंत्रणांचाही कदाचित वापर केला जाईल. ड्रोनच्या माध्यमातून ग्राहकाकडे वस्तू पोचवताना मध्येच ती इतर कुणी लंपास करू नये यासाठी सुरक्षा यंत्रणाही उभ्या कराव्या लागतील. भविष्यातल्या ऑनलाईन शॉपिंगच्या एका कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी अनेक नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उदय होऊ शकतो हेही लक्षात घेतले पाहिजे.
अमेझॉन गो ला वॉक आउट टेक्नॉलॉजी म्हटले जाते. अमेझॉन गो च्या कॅशिअरलेस स्टोअरमध्ये भविष्यात फक्त सहा कर्मचाऱ्यांची गरज असेल असं मानलं जातंय. यात कल्पना अशी आहे कि अमेझॉन गो च्या स्टोअर मध्ये तुम्ही गेलात आणि वस्तू रॅक मधून उचलून घेतल्यात कि तुमच्या मोबाईलच्या अमेझॉन गोच्या अँपवर त्याची लिस्ट तयार होते. तुमचं शॉपिंग झालं आन तुम्ही दुकानातून वस्तू घेऊन बाहेर पडलात कि तुमच्या बँकेच्या खात्यातून तुम्ही ज्या किमतीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत तेवढी रक्कम वळती होईल. कॅशिअरच्या लांब लचक रांगेत भविष्यात उभं राहण्याची गरज उरणार नाही. प्रत्यक्ष अनुभव, अँप्स आणि मोबाईल बँकिंग यांचा मेल घालून अमेझॉन गोची संकल्पना आकार घेते आहे.
भविष्यात अशा अनेक संकल्पना आकार घेणार आहेत. आपल्या हातातला स्मार्ट फोन आपल्या शरीराचा अवयव बनणार आहे. नुसतं इतकंच नाही, तर आपल्या हाताच्या त्वचेवर मोबाईलचा स्क्रीन ऑपरेट करण्याची आणि प्रत्यक्ष फोन शरीराशी लिंक करून आपल्या शरीरातल्या विविध लहरींचा वापर करून स्मार्टफोन वापरण्याच्या यंत्रणा विकसित झाल्या तर नवल नाही. स्मार्टफोन घरी ठेवून, आपल्या हातातल्या स्क्रीनचा वापर करून हवी तेव्हा हवं तिथून शॉपिंग करण्याची सुविधाही लवकरच विकसित होईल, कदाचित! साधे लँडलाईन फोन वापरत असताना अशी मोबाईल फोन नावाची यंत्रणा आपल्या आयुष्यात येईल याचा आपण कधीच विचार केलेला नव्हता. मोबाईल आल्यानंतर स्मार्टफोन कधी आले आणि आपण ते कधी वापरायला लागलो तेही आपल्याला समजलं नाही. एरवी बाजारात जाऊन चार दुकान बघितल्याशिवाय आणि रेटवर घासाघीस केल्याशिवाय साधी कोथिंबिरीची काडी न घेणारे आपण धडाधड ऑनलाईन शॉपिंग करायला लागलो. तंत्रज्ञान आपल्या नसानसात भिनलेले आहे. ते येत्या दहा वर्षात झपाट्याने बदलणार आहे. आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी आपल्या पुढ्यात येतील आणि आपण त्या सहज स्वीकारत जाऊ.
तंत्रज्ञानाची गंमतच हिच आहे. ज्या तंत्रज्ञानाच्या वापरत माणसाची सर्वाधिक सोय तितका त्याचा झटपट स्वीकार...भविष्यात आपण काय काय स्वीकारतो हे बघणं नक्कीच कुतूहलजनक आणि गमतीशीर असणार आहे.
- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com, ९८२३३८८८२८
(लेखिका मुक्त पत्रकार असून सोशल मिडिया अभ्यासक आहेत.)
सदर लेख सामानाच्या दिवाळी अंकात पूर्व प्रसिद्ध झालेला आहे.