Search

कोरोना आणि आम्ही स्त्रिया, ट्रान्सजेंडर आणि ......... खरतर जिवंत व्यक्ती

सगळी मानव जात सद्या ‘कोरोना’ नावाच्या महामारीच्या हातात आहे. घरी, दारी, टीव्हीवर, फेसबुकवर तुम्ही म्हणाल तिथे फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे ‘ह्या कोरोना चे करावे तरी काय?’

घरात कोंडून घ्यायला तीस पेक्षा जास्त दिवस ओलांडले आणि प्रत्येक घराघरातून वेगवेगळ्या स्टोऱ्या ऐकायला, वाचायला मिळायला लागल्या. आमच्या एका मैत्रिणीने लिहिले की, सकाळचा पाहिला चहा मग नाश्ता आणि चहा मग सगळेच घरात त्यामुळे अकरा वाजता परत चहा तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ जवळ येते म्हणून लगेच त्या स्वयंपाकात गुंताव लागत. दुपारची जेवण झाली त्याची भांडी घासून किचन ओटा धुवून जस्ट बसले नाही की तोपर्यंत घरातल्या इतरांची दुपारची वामकुक्षी संपते मग त्यांना चहा प्यायचा असतो की परत गॅस पेटवा आलंच. त्याचे कप, पातेले धुवत नाही तर रात्रीच्या जेवणाची तयारी, प्रत्यक्ष स्वयंपाक, मग लगेच जेवण; मग ती भांडी घसा, किचन ओटा पुसा. आत्ता सकाळी उठून लवकर कुठेही शाळा, कॉलेज की ऑफिस की कामावर जायचे नसल्यामुळे आणि रात्री खूपच छान आल्हाद वाटत असल्यामुळे सगळेच गप्पा मारायला बसलेले असतात त्या रंगलेल्या गप्पांमध्ये घरातल्या स्त्रियाही बसतात, जरा हसण्यात रमायला लागतात, तर घरातल्या कोणा तरी मोठ्या व्यक्तीला चहा प्यावासा वाटतो, त्यात सगळ्यांचा आकडा अॅड होतो आणि परत गॅस पेटतो. गॅस पेटवणे ते विझवणे ही एक रटाळ वेळखाऊ, दमवणारी प्रक्रिया आहे, आणि त्यात उभ राहून सगळ कराव लागत हे अनेकांना विशेषतः पुरुष जातीला माहितच नसल्यामुळे ते पटकन “अग जरा कपभर चहा टाकते का?” असे प्रेमळ आवाजात म्हणतात. जेव्हा ‘बंदिवास’ नव्हता तेव्हा असे प्रसंग खूप कमी वेळा यायचे म्हणून वैताग यायचा पण तरी अखिल स्त्री जात ते करत होती; पण सद्या असलेल्या बंदिवासामुळे अशा फरमाईशा वाढल्या आहेत, असे नुसते लक्षात आणून द्यायचा जरी स्त्री जातीने प्रयत्न केला तरी, “आता मी कुठे जाऊ मग? तुझ्याच कडे मागणार ना, का शेजारणीला सांगू?” असा विस्तव अंगावर फेकला जातो आणि आधीच वाढलेल्या कष्टाने मरुन जाणारी बाई तर अधिकच राख होते आहे.

फेसबुकच्या तळ्यात मात्र बऱ्यापैकी घरातल्या कामांना मदत करणारे पुरुष दिसत आहेत. किमान फोटो तरी आहे. हि एक चांगली संधी आहे स्वयंपूर्ण होण्याची असे म्हणत काही पुरुष घरातल्या कामात हात देत आहेत. ‘आता समजतय की घरात किती काम असत ते’ असे दुर्मिळ शोध निबंध लिहिले जात आहेत. अशा पुरुषांची किंवा त्यांच्या वाहवा करण्यातून मिळालेल्या माहितीवरुन त्यांची यादी करण्याचा प्रयत्न मी करत होते तर लक्षात आले की हे पुरुष एरवीही संवेदनशील होतेच, वेळेच्या कमी मुळे किंवा कामाच्या बाहेरील जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मदत करता येत नव्हती, ती संधी आता निर्माण झाली आहे. पण संस्कृतीने ज्या पुरुषांचा गौरव केला आहे अशा पुरुषांच्या समजण्यात मात्र काहीही फरक पडला नाही. या लेखाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी मी पहात होते, वाचत होते, काही लोकांशी बोलत होते तर फारच मजेमजेच्या गोष्टी समोर आल्या. यात प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ वंदना शिवा यांची एक मुलाखत पहिली. त्यात त्या म्हणतात जोपर्यंत मानव स्वतःचे अधिकाधिक काम स्वतःच्या हाताने करणार नाही, मूळ निसर्गाची काळजी आणि स्वयंपूर्ण स्वयंपाक शिकणार नाही तोपर्यंत तो अशा संकटांवर मात करु शकणार नाही, आणि जे जे लोक हे सर्व करतील ते ते छान जगतील आणि म्हणून स्त्रिया छान जगतील. त्या स्वतः ही आनंदी राहतील आणि त्यांचा परिसर ही त्या आनंदी ठेवतील. आधीच्या बायांनी सतत कामाची चालू असलेली रीघ सांगितलेली मी ऐकली होती आणि त्यात वंदना शिवा यांचे निरुपण ऐकले तेव्हा पटल की जे जे आपल्या हाताने कामे करतील ते वाचतील. https://www.facebook.com/kamla.bhasin.7/videos/2656839344414245/UzpfSTEwMDAwMDA5NjY2MjY2NjozMTcxNDc2NjUyODY1NTI2/

कविताचा फोन आला, ताई तुमच्याकडे येत नाही आता. घरी असल्यापासून तोंड फुगवूनच बसावं लागतं. घरात मी जरा हसले तर घरातले सगळे रागारागाने बघतात. आमच्या घरात सगळं सिरेस. नवरा डोळे वटारून बघतो हसलं मोठ्याने की. कॉमेडी काय चालला असल तरी आपण गालातल्या गालात हसायचं. मी हसले मोठ्याने तर आता पोरंही मला ओरडतात. तुमच्याकडे आपली मस्करी चालते. तुम्ही दादा हसवतात बरा वाटतो खूप मनाला. आता किती दिवस घरात बसावं लागणार.. मला लौकर यायचय कामावर परत मग मी जोरजोरात पोट फुटेपर्यंत हसणार. तुम्ही तुमचा खूप जोक मारा भंकस करा मी परत आले की. हसता खेलता वातावरण असतो तिथे कामाचा काय वाटत नाही. आमचा दीर म्हणत होता की अमेरिकाने चीनमध्ये मुद्दाम हा रोग पाठवला असा बोलत होता तो..

म्हंटलं, तू एक काम कर फक्त घरात बस. अमेरिकेने कोरोना पाठवला की चीनने अमेरिकेते पाठवला तू काही विचार करू नको. अजिबात जगाची काळजी करू नकोस. फक्त तू तुझी मुलं आणि नवरा घरात बसा. तू पुन्हा कामावर आलीस की आपण पार्टी करू खूप फालतु जोक्स करू आणि आमच्या घरात मोठमोठ्याने हस सगळी भांडी खाली पडली पाहिजे. पण आता मात्र शांत गदाधारी भीम शांत- आमची एक मैत्रीण रेणुका खोत हिने हा अनुभव तिच्या फेसबुक पेजवर लिहिला आहे. आपल्याला हा एक अनुभव आहे असे वाटते पण मी काही घरकामासाठी जाणाऱ्या स्त्रियांशी बोलले तर लक्षात आलं की, ज्यांचे पतीदेव सतत दारुत असतात, घरात जागा कमी, इतरही सुविधा कमी अशा कुटुंबातल्या ह्या स्त्रिया कामावर जातात तेव्हा तिकडून मिळणारे जेवण हा त्या कुटुंबाचा एक मोठा आधार असतो. ह्यापैकी बरीच कुटुंब कुठल्या तरी सोसायटीच्या एका कोपऱ्याच्या आडोशात रहात असतात जी जागा त्यांना एरवी दिवसभर फार लागत नाही कारण अशा घरातल्या व्यक्ती कुठे ना कुठे कामासाठी, आणि मुल शाळेत जात असतात. अशा जागा मग रात्री झोपण्या पुरत्या सोईच्या असतात. आता ह्या पूर्ण बंद मुळे दिवसभर एंगेज राहण्यासाठी जी ‘जागा’ लागते ती आता आणायची कुठून? दिवसभराच्या कामा मुळे चिडका/ सतत शिव्या किंवा अपमानकारक भाषा वापरणारा नवरा किंवा कुटुंबातील इतर यांच्या पासून सुटका असते तीच आता बंद झाली आहे. काही कार्यकर्त्यांशी बोलत होते तर तिथे माहिती समजली की, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृतपणे जिथे जिथे दारु किंवा व्यसनाची साधने उपलब्ध आहे आणि शिवाय हातात पैसे नाही, हाताला काम नाही आणि रिकामे डोके ह्यामुळे निर्माण होणारी पोकळी आणि निराशा ह्याच रुपांतर हिंसाचारात होताना दिसते आहे आणि त्याची पहिली शिकार हि महिला असते ते सद्या अनुभवायला मिळते आहे. हे पहिलं संकट आहे जिथे लोकांनी आपापल्या ठिकाणी अलग राहणे हा त्यावरचा उपाय आहे, शासन ही अधिक विचार न करता हाच जणू एकमेव उपाय आहे असे वातावरण तयार करते आहे. त्यामुळे जबरदस्तीचा सहवास जरा जास्तच जाणवतो आहे.

कोरोनाचे संकट तर मोठे आहेच त्यात कौटुंबिक हिंसाचार हे आधीचेच संकट अधिक अक्राळविक्राळ रूप घेत आहे. विविध प्रकारच्या विषमता नष्ट व्हाव्यात म्हणून काम करणाऱ्या जागतिक संघटने पासून ते स्थानिक, राज्यपातळीवर, देश पातळीवर, दक्षिण आशियाई भागात आपला देश आहे म्हणून तिथल्या अनेक संघटना, संस्था या कौटुंबिक हिंसाचाराचे काय करायचे याचा विचार करीत आहेत. त्यापैकी एका लेखाची लिंक येथे देत आहे. https://www.loksatta.com/agralekh-news/domestic-violence-cases-rise-globally-during-during-covid-19-lockdown-zws-70-2129030/

ज्या कुटुंबांमध्ये असा हिंसाचार आजही होत आहे असे लक्षात आले असेल तर त्या हिंसाचार करणाऱ्या व्यक्तीला घर पासून दूर ठेवा अशी मागणी सद्या जोर धरु पहात आहे. खरतर यात काही नवीन नाही. आपल्याकडचा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा २००५ हेच सांगतो की जर स्त्रीला घरात त्रास होत असेल, मारहाण होत असेल तर मारहाण करणाऱ्या पुरुषाला घरातून बाहेर काढा. हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत घरात येण्याची परवानगी हा कायदा नाकारतो. तीच तरतूद ह्या परिस्थितीत ही अमलात यावी अशी मागणी वाढते आहे.


ज्या हेल्पलाईन आधीही काम करीत होत्या त्या कार्यरत रहाव्यात यासाठी शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. फोन वर समुपदेशन मिळावे यासाठी शासकीय पातळीवर तसेच सामाजिक संस्थांच्या पातळीवरही प्रयत्न सुरु आहेत. कौटुंबिक हिंसाचार ज्या स्त्रियांना सोसावा लागतो, त्यांच्या मदतीसाठी देशभर अनेक हेल्पलाईन सक्रीय झाल्या आहेत. अनेक संस्था, संघटना आपल्या आपल्या पातळीवर विविध प्रयत्न करीत आहेत. जसे की, “महिलाओं की समस्या पर सरकार की अनदेखी को लेकर अखिल भारतीय प्रगतिशील महिला एसोसिएशन (ऐपवा) ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को एक पत्र लिखा है। पत्र के माध्यम से ऐपवा ने लॉकडाउन के बीच देशभर में महिलाओं पर बढ़ती यौन हिंसा पर रोक लगाने की मांग की है” हे प्रयत्न फक्त भारतातच नसून दक्षिण आशियाई देशांमध्येही सुरु आहेत. https://www.theelders.org/news/covid-19-pandemic-widening-justice-gap

आपत्ती व्यवस्थापन यातच मास्टर डिग्री करणाऱ्या शिवा नावाच्या माझ्या एका सहकाऱ्याशी याविषयावर बोलत होते. तो म्हणतो अशा संकटाना कस सामोरे जावे यासाठी देशाची आधीच तयारी करुन घ्यायची असते. अनेक विकसित देशात शाळांमधून नियमित हा विषय शिकवला जातो. आपल्याकडे मुलभूत स्वच्छता, वाहतुकीचे नियम, शारीरिक भूक आणि वाढत्या वयाबरोबर आवश्यक असणारी लैंगिक गरज याविषयावर शिक्षण सोडा बोलायचीही चोरी आहे. जे कोणी ह्याविषयावर बोलतात, बोलू इच्छितात, बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना अश्लील गटात टाकून त्यांना देशद्रोह्या सारख वागवल जात. ‘पाण्यात पडल की आपोआप शिकेल’ हा जो आपल्याकडचा अफलातून नियम आहे याचे दुष्परिणाम आपण रोज भोगत असतो. खरतर २००५ साली आपल्या देशाने आपत्ती व्यवस्थापन कायदा पास केला. हा कायदा यासाठी आहे की, देशावर बाहेरून, आतून, मानव निर्मित किंवा निसर्गनिर्मित (माझ मत आहे की निसर्ग निर्मित संकट नसतच. वादळ/पूर/अतिवृष्टी किंवा दुष्काळ ह्या वरकरणी निसर्ग निर्मित दिसणाऱ्या गोष्टी ह्या मानव निर्मितच आहे असे माझे ठाम मत आहे, कदाचित तुम्ही मानणार नाही म्हणून ते कंसात टाकले आहे.) कुठलेही संकट आले तर आपण देश म्हणून त्याचा सामना कसा करणार आहोत याचे फुलप्रूफ नियोजन करावे असे अपेक्षित आहे. पण आपण संकट नसत तेव्हा देश म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता, तेढी आणि दंगली दंगली खेळत असतो. आपल्या बलाढ्य आणि विविधतेने नटलेल्या सगळ्या देशाचे एकाच ठिकाणी बसून नियोजन करणे अडचणीचे आहे कारण यात आपल्याकडे आधी काय आहे ज्याचा संकटात उपयोग होवू शकतो याचा हि विचार करावा लागत असल्यामुळे असे हे नियोजन प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याचे पासून ते तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर अस करत देशाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. पण आपल्याकडच्या नव्वद टक्के पेक्षा जास्त ग्राम पंचायातीना असे त्यांचे काम आहे आणि त्यासाठी त्यांना बजेट मंजूर आहे हेच माहित नाही. काही ठिकाणी बजेट वापरले गेले आहे पण असा आराखडा नाही. काही ठिकाणी कोणीतरी एकाच्या किंवा एका गटाच्या मदतीने असा आराखडा कागदावर तयार करुन ठेवला आहे, पण तो वापरायचा कसा याची माहिती तिथल्या नागरिकांना नाही. केरल, तामिळनाडू, ओरिसा, आसाम सारख्या राज्यांमध्ये याची बऱ्यापैकी माहिती आहे कारण ते अशा संकटाना अनेकवेळी सामोरे गेलेले आहेत.

हे विषय शिकणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. शिवा म्हणतो जेव्हा असे संकट येते तेव्हा पहिल्यांदा त्या संकटाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील तयारी करण्यासाठी एक ‘रॅपिड सर्व्हे’ केला जातो. आता यात ह्याच विषयातले तज्ञ असले की ते बरोबर शास्त्रीय पद्धतीने हा सर्व्हे करतात. ह्या विषयात शिक्षण न घेतलेले लोक जेव्हा हा सर्वे करतात तेव्हा त्यांच्या कडून कायम शारीरिक, मानसिक, बौद्धिक अपंग किंवा विशेष गरजा असलेल्या व्यक्ती सुटतात. कुटुंबातले लोकही सर्व्हे करतांना घरातल्या अशा लोकांची नोंद सांगत नाही कारण रोजच्या आयुष्यात अशा व्यक्तींना फार मोजण्याची पद्धत एकूणच आपल्याकडे कमी आहे. आपल्याकडे जे जे आहे त्याचा पर्याय काढला जातो, पण अशा विशेष गरजा असेलल्या लोकांसाठी एरवीही काही व्यवस्था नाही तर त्याचा पर्याय कसा काढणार? त्यामुळे बऱ्याच वेळा जेव्हा पूर, भूकंप सारखे प्रसंग घडतात तेव्हा अशा लोकांची नोंद नसल्यामुळे त्यांना पळता येणार नाही तेव्हा त्यांना काढण्यासाठी इतरांनाच जावे लागले याची व्यवस्था झालेली नसते आणि मग अश्या व्यक्ति पळू न शकल्यामुळे अडकून मरतात. जेव्हा तज्ञ असे ‘रॅपिड सर्व्हे’ करतात आणि मग आवश्यक वस्तूंचे किट बनवले जाते त्यात सर्व व्यक्तींचा, वयोगटांचा आणि गरजांचा समावेश केला जातो. मागच्या आठवड्यात ‘कोरो’ संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील अडकलेल्या लोकांना गरजेच्या वस्तू पोहोचवल्या तेव्हा त्यांनी एक यादी बनवली होती. ती यादी मी एका ग्रोसरीच्या कार्पोरेट कंपनीला पाठवली तेव्हा त्यात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ होते याचे अनेकांना कौतुक आणि आश्चर्य वाटले. अजूनही ते आवश्यक आहे असे आपल्या दिमाग मध्ये बसलेले नाही.

एवढा मोठा बंद जाहीर करतांना कुठलेही पूर्वनियोजन ना सरकारच्या पातळीवर दिसत ना लोकांच्या पातळीवर दिसत. त्यामुळे ज्यांचा कडे होत, नेहमी असतच ते यात जरा बऱ्या अवस्थेत आहेत. पण ज्यांच्या कडे रोज आणून मगच जगण्याची पद्धत आहे त्यांच्या जगण्याची सद्यस्थिती समजावून घ्यायला लागल की खूपच त्रास होतो. कल्याणीच्या मित्रांच्या मार्फत आम्हांला काही घर अशी कळाली की जी दोन दोन दिवस जेवलीच नव्हती. कुठे जाव, कोणाला सांगाव, कस मिळवाव, यासाठी सोशल मिडिया कसा वापरावा याची माहिती नसल्यामुळे ही लोक उपाशी राहिली. त्यात एका कुटुंबाला आम्ही नियमित तीन वेळचा डबा पोहोचवतो आहे आणि बाकीच्यांना किराणा मिळवून देऊ शकलो. सरकारी यंत्रणांनी ज्या ज्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत त्यासाठी तुम्हांला किमान मोबाईलची माहिती असली पाहिजे, तुमच्या कडे इंटरनेट असले पाहिजे. मग मात्र तुम्हांला घरपोच दुध, औषध, भाजी, रेडीओ वरून सततचे अपडेट, छान छान गाणी किंवा गोष्टी, ऑन लाईन कोर्सेस, विविध प्रकारचे ज्ञान इ.इ. सर्वकाही भरपेट मिळेल. आपल्याकडची मोठी लोकसंख्या स्वत:च पूर्ण नाव ‘ गोलू की अम्मी’ अस सांगते तिथे ह्या व्यवस्था कशा वापरल्या जातील याचा विचार शासकीय नियोजनात दिसत नाही. एकीकडे बाहेर पडू नये याच प्रेशर पण मदतीसाठी मात्र आम्ही तुमच्या कडे येतो अशा अप्रोच ऐवजी तुम्ही आमच्याकडे या असा अप्रोच शासनाकडून दिसतो आहे. आपल्याकडे प्रो अॅक्टिव्ह असण्यापेक्षा रिअॅक्टिव्ह असण्याचीच पद्धत आहे आणि त्यालाच मान्यता आहे.

अंगणवाडी ताई, आशा ताई, प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ज्या यंत्रणेवर आपल राज्य अवलंबून आहे त्या यंत्रणांची स्थिती अतिशय दयनीय आहे. ह्या सर्व यंत्रणेत आधीच घर, दार,आणि शासन सगळीकडे मार खावून दयनीय झालेल्या स्त्रिया आहेत; त्या अशा एका रात्रीतून कशा काय हुशार, तत्पर, अभ्यासू होतील हे आपल शासनच जाणो. हात कसे धुवायचे याचे शास्त्रीय ज्ञान ह्या सर्व ताईंकडे आहे पण त्यासाठी लागणारे पाणी, साबण किंवा सॅनिटायझर, मास्क, ह्या परिस्थितीत गावभर फिरण्यासाठी लागणारा मेडिकलचा तो अंगरखा(पीपीइ) कुठून आणतील? तीन महिन्याचे राशन एकत्र द्या, पण जिथे पैसे नाहीतच अशांचीच संख्या जास्त आहे त्यांचे काय? याचा कुठलाही विचार, अभ्यास आणि तयारी आपल्याकडे नाही. जे पती पत्नी तात्पुरते कामासाठी शहरात आले, रेशन कार्ड त्यांच्या गावच्या घरी त्यांना कार्ड नाही म्हणून अद्यापही रेशन मिळत नाहीये. जे गरीब, गरजू आहेत पण त्यांनी रेशन कार्ड काढलेले नाही त्यानाही आजच्या तारखेला कुठलेही धान्य मिळत नाहीये.

अशा सर्व बंदिस्त वातावरणात स्वतःला जागृत आणि शांत कस ठेवाव यासाठी डॉ. आनंद नाडकर्णीॉ यांचा एक व्हिडिओ (https://youtu.be/BTIXKXH3Kkk) सद्या फिरतो आहे. त्यात ते म्हणतात की हि सुट्टी नाही तेव्हा आयुष्य थांबून न ठेवता उद्या जे आपल्याला करायचे आहे त्यासाठीची पूर्वतयारी, ज्ञानाचे अपडेट मिळवा स्वत:ची कौशल्य अधिक वाढवा, नवीन गोष्टी शिका. माझ्या सारख्या काही मर्यादित समूह/लोकांसाठी आणि मर्यादित अर्थाने हे सर्व खरही आहे. पण जेव्हा मी तो व्हिडीओ आपल्या देशाच्या नियमाप्रमाणे फॉरवर्ड केला तर असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या, तसेच कंपनीत काम करणाऱ्या काही परिचित मुलींचा फोन आला की हे सर्व आटोपल्या नंतर आमच ‘काम’ रहात की नाही ह्याचीच शाश्वती नाही तिथे कशात अपडेट होणार. ज्यांना घरुन काम करण्याची संधी आहे, ज्यांच्या कडे कुठल्या तरी प्रकारचा कॉम्प्यूटर घरात आहे त्यांना हि खरीच संधी आहे. पण मुंबई, पुणे किंवा कुठल्याही मेट्रो शहरात हजारो लोक प्रवासात, हवेत, मध्येच कुठेतरी जगतात. आधीच जागा, पैसे, पाणी, किराणा, सर्वच सुविधा अपुऱ्या अशांचे प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. अशा अडचणींमध्ये राहणारे जगतील कसे आणि कसे अपडेट राहतील हा खरा प्रश्न आहे........

अनिता पगारे, नाशिक- ८०८०९४०९२०, pagare.anita@gmail.com

21 views0 comments
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922