Search

खर तर तुमच्याही फायद्यासाठी

माझी ओळख करून देतांना कायम मी ‘कट्टर स्त्रीवादी’ आहे अशी करून दिली जाते. कोणीही स्पष्ट बोलणाऱ्या, आग्रही मत मांडणाऱ्या त्यात ही सामाजिक कामात असलेल्या स्त्रियांची ओळख अशीच करून देण्याची पद्धत आहे. मी स्पष्ट बोलते, आग्रही असते हे खर पण मी ‘कट्टर’ नाही. कुठलाही कट्टर हा/ही डेंजरच अस मानणार्यांपैकी मी आहे. डेंजर अर्थाने मी कट्टर नाही. मला माझा मुद्दा लावून धरायला आवडतो कारण तसं केल नाही तर माझ्या आजूबाजूचे मला गुंडाळून टाकतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण स्पष्ट बोललो तर समोरच्याला वाईट वाटेल, राग येईल अशी भिती मलाही असते, त्यामुळे मी मुद्दा सांगण्याची पद्धत ‘गुळमुळीत’ करते पण कंटेनच्या बाबतीत आग्रहीच असते.

बरीच वर्ष ‘स्त्रियांवरील हिंसाचार’ याविषया संदर्भात काम केले आहे. त्यातला जास्तीत जास्त काळ हा वैयक्तिक भांडण ऐकण्यात, केस वर्क करण्यात घालवला आहे. मार खावून येणाऱ्या बाईला तर समजावून घ्यायचेच, त्याबरोबर तिला बेदम मारणाऱ्या नवऱ्याशीही नम्रतेने, हळू आवाजात बोलायचे, त्यालाही समजावून घ्यायचे ही फारच मानसिक सर्कस आहे आणि ती मी बरीच वर्ष केली. ही सर्कस एकदा कोसळली आणि मला डिप्रेशनचा अॅटॅक आला. जवळ जवळ आठ महिने लागले मला त्या अवस्थेतून बाहेर पडायला. घरीदारी मला समजावून घेणारे वातावरण होते, मी त्याच विषयातली विध्यार्थिनी होते तरी मला एवढा वेळ द्यावा लागला. सतत मानसिक अपमान सहन करणाऱ्या, मार खाणाऱ्या स्त्रियांचे काय होत असेल याचा नुसता विचार केला तरी जास्त होते. स्त्री पुरुष विषमतेचा ‘पुरुष’ ही बळी आहे, तो ह्याच ‘पितृसत्ताक’ समाजात घडला आहे, ज्यामुळे त्याच्या हातून हिंसाचार घडतो, किंवा केलेला हिंसाचार त्याच्या लक्षात येत नाही किंवा हिंसाचार करणे योग्य आहे असे त्याला वाटते हे सर्व अभ्यासातून शिकलेलो असल्यामुळे चांगलेच समजते. पण तरी त्या हिंसाचारी व्यक्ती बरोबर शांत पणे बोलणे ही खरी कसोटी असते. जोपर्यंत हे जमलं तोपर्यंत आनंदाने केले पण जेंव्हा जमेनासे झाले तेंव्हा त्या केस वर्क मधून बाहेर पडले.

स्त्री पुरुष विषमतेच्या स्त्रिया ह्या बळी आहेत हे जितके खरे तितकेच पुरुषही ह्या व्यवस्थेचे बळी आहेत हे काम करतांना, प्रशिक्षण घेताना- देतांना, कामाच्या टप्प्यावर लक्षात आल होतं. म्हणून नवरा बनण्यापूर्वीच्या पुरुषावर किंवा त्याही आधी म्हणजे ‘मुलगा’ ह्या वयातच त्यांच्या बरोबर काम करायला हवे हे लक्षात आल्यावर पहिली संधी मिळाल्या बरोबर केस वर्क ची नोकरी सोडली आणि आता वेगवेगळे निमित्त शोधून ‘मुलगा- युवक-पुरुष’ सर्वच टप्प्यांवर गप्पांचे कार्यक्रम सुरु केले आहे.

महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी पुरुषांबरोबर काम हे मी शोधून काढलेले रॉकेट सायन्स नाही. कमला भसीन पासून ते आनंद पवार, हरीश सदानी, डॉ. मनीषाताई गुप्ते असे अनेकजण ‘पुरुषांबरोबर’ काम करीत आहेत, त्यांना समजावून घेत आहेत, समजावून सांगत आहेत. यासर्वांशी नात सांगत, प्रशिक्षणा द्वारा त्याचं मार्गदर्शन घेत आम्हीही ह्या कामात सहभागी झालो. खूप मजा येते ह्या कामात. कोणालाही दहशतीखाली, वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी आधी आपल्यात प्रचंड नकारात्मक शक्ती, भावना एकवटावी लागते. त्यापेक्षा प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीनुसार जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तुलनेने कमी कष्ट लागतात आणि नकारात्मक भावना तर त्यासाठी अजिबातच लागत नाही, उलट दोन्हीही व्यक्तींमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्याची, आनंद निर्माण होण्याची शक्यताच जास्त असते हे जेंव्हा पुरुषांच्या लक्षात येते तेंव्हा खरी मजा सुरु होते.

एकदा हे सांगितलं की लगेच पुरुषाच्या लक्षात येत आणि सगळ बदलत, सुधरत हे ही खर नाही. त्याने त्याच्या आयुष्यात जे कधी पाहिलेले नाही त्यावर आपण त्याला विश्वास ठेवायला सांगतो, नुसत सांगत नाही तसं त्याने वागाव अशी आपली अपेक्षाही असते. जे वर्षोनुवर्षे चाललंय तेच बरोबर अस वाटण्याची शक्यताच जास्त आहे. शेकडो वर्षाची ही रचना, संस्कार, व्यवस्था आहे. एका दमात आपण म्हणतोय म्हणून शंभर टक्के बदलणे थोडं अवघड आहे हे आपल्या सारख्या परिवर्तन वाद्यांनी समजावून घेण्याची गरज आहे. हे अवघड आहे पण अशक्य अजिबात नाही. हा बदल घडवायला जरा अधिक वेळ लागेल आणि तो प्रयत्न जरा अधिक काळजीपूर्वक, विचारपूर्वक करावा लागेल त्यासाठी मुलगा ते पुरूष च्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्याशी बोलणाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या संधी निर्माण कराव्या लागतील, विशेषतः ते सहजपणे रडतील अशा अनेक जागांची निर्मिती आणि त्या रडण्याकडे आपल्या सारखे ‘नॉर्मल’ पाहतील अशा अनेक संधी उपलब्ध कराव्या लागतील. आज स्ट्रेस मुळे मरणाऱ्या तरुणांची संख्या यामुळे नक्कीच कमी होईल. मर्दानगी च्या फुशार्कीतून अपयश आले म्हणून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या यामुळे नक्की कमी होईल यात मला शंका वाटत नाहे. पुरुषांमधले हार्ट अॅटकचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. मोठे मोठे महाराज आणि त्यांच्या आत्महत्या वाचतील.

वेगवेगळ्या प्रशिक्षणात, कार्यक्रमात भारावलेले पुरुष किंवा खरतर मुलं घरी जावून त्यांच्या वागण्यात लगेच बदल करतात. उदा. स्वतःची जेवणाची ताट उचलतील, कदाचित घासतील किंवा स्वतःचे आतले कपडे आंघोळ झाल्यानंतर लगेच धुवून टाकतील. बदलाची सुरुवात साधारण अशीच होते. पण लगेच घरातली आई-बहिण-वहिनी-बायको ही कॅटेगरी मध्ये जर का कडमडली की परिवर्तन थांबलंच म्हणून समजा. अखिल जातीय काळजीवाहू स्त्रियांना यानिमित्ताने माझी विनंती आहे की, प्लीज अशा परिवर्तनाच्या आड येवू नका. ताट नीट घासलं नसेल तर तेच ताट त्यालाच परत द्या, त्याला चांगल घासायच कसं ते सांगा. तो आतले कपडे नीट चोळून धुणार नाही, मग ते नको तिथे कडक होतील आणि त्याला नको तिथे काचतील ह्या काळजीने आखं घर डोक्यावर घेवू नका. कदाचित हे त्याच्याही लक्षात वेळीच आले तर ते चांगल चोळून धुवायला शिकतील हे कृपा करुन लक्षात घ्या. हा अनेकींचा यशस्वी झालेला प्रयोग आहे. ह्या मार्गाने त्यांच्या आयुष्यातले पुरुष स्वावलंबी झाले आणि त्याही सुटल्या.

हा विषय मांडतांना मला दुसरी एक भिती वाटते ती म्हणजे या विषयावरची एखादी स्कीम/ योजना सरकारकडून बनून येवून पुरुषांच्या डोक्यावर पडू नये. जसे आपल्याकडे शाळेत नैतिकतेच्या तासाने शाळा सुरु करण्याची स्कीम आली आणि आपल्या देशातली नैतिकता इतकी लांब पळून गेली की या तासाच्या योजनेआधीही हा देश नैतिक होता हे सांगूनही लोकांना पटत नाही. सध्या शासन कशावरही योजना बनवू शकत. जिथं समजून, उमजून बदल करायला हवेत तिथे टार्गेट, त्याचा स्वंतत्र विभाग, त्याचा फॉर्मुला आणि रिपोर्ट हे शब्द, संकल्पना किंवा या मानसिकतेचे लोक मध्ये आले की परिवर्तनाची वाट लागते हे आपण अनेक अनुभवातून शिकलो आहोत. अशा बळजबरीच्या परिवर्तनात ते आणि आम्ही किंवा आपण असे गट पडतात. यात मला कायम बुरख्यावरची चर्चा याचे उदाहरण द्यायला आवडते. ज्या ज्या वेळी स्त्रियांवरचे मानसिक अत्याचार हा विषय चर्चिला जातो त्यावेळी लोक मोठ्या तावातावाने,’आपल्याकडची परिस्थिती आता बदलली आहे हो, त्यांच्या कडचे बुरखे आता बंद व्हायला हवे, त्यांचे बुरखे पहिले की माझा नुसता जीव घाबरायला होतो’ अस बरच काही बोलतात. पण आपल्याकडचे पदर, अंगभर साडी आणि त्या वायफळ ओढण्या ह्या बुरख्याचेच काम / मानसिकता टिकवतात हे बोलणारे लक्षात घेत नाही.

यासर्व कामात ‘विषमते शिवाय समूह’ राहू शकतो याचा विश्वास समाजात निर्माण करावा लागेल. जस बुद्ध काळ संपायच्या पर्यंत आपल्याकडे जाती व्यवस्था नव्हत्या. याचा अर्थ आपला समाज जाती शिवाय होता हे आपण वाचन केल्यानंतर लक्षात येते तसेच स्त्री- पुरुष समानतेने राहू शकतात याचा प्रचार- प्रसार करण्याची गरज आज आहे. हा विश्वास जास्तीत जास्त लोकांमध्ये निर्माण करण्याची आज गरज आहे. त्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करायला लागतील. मुलगी आईला मदत करते आणि मुलगा मैदानावर खेळायला जातो आहे हा पुस्तकातला ‘धडा’ बदलण्या बरोबर ‘हुंड्या’ ऐवजी मुलीला पालकांच्या संपत्तीत सन्मानाने वाटा देण्याची कायद्यातली तरतूद प्रत्यक्ष कृतीत आणायला लागेल. अनेकांनी हे किंवा असे प्रयत्न कधीचेच, कुठलाही आवाज न करता सुरु केले आहेत. आता बऱ्याच घरांमध्ये स्वयंपाक ही घरातल्या स्त्रियां इतकीच पुरुषाची ही जबाबदारी बनली आहे. त्यातले बरेच पुरुष आता फक्त फोडण्या नाही तर भाजी आणण्यापासून ते भाजी केल्यानंतर ओटा आवरण्या पर्यंतची जबाबदारी कुशलतेने पूर्ण करतांना दिसत आहेत. अशा पुरुषांनी त्यांचे अनुभव सहजपणे, उपकार म्हणून नाही किंवा त्यांची पार्टनर ही काम करत नाही, ती कशी ‘नालायक’ आहे अस न म्हणता आपले अनुभव सांगितले पाहिजे. सतत आपल्या वागण्या- बोलण्याचे मूल्यमापन न्यायाच्या तराजूत तोलणाऱ्याची संख्या वाढवावी लागेल.

‘सम्यक’ म्हणजे काय? हे सांगताना कवी ग्रेस म्हणायचे की, सम्यक म्हणजे अधिक न्यायाच्या बाजूने. आपण म्हणतो सम्यक म्हणजे मधला मार्ग. आमचा मित्र ‘आनंद’ प्रशिक्षण घेतांना म्हणतो हिंसाचारात मधला मार्ग काय असू शकतो? नवऱ्याने काठीच्या ऐवजी हाताने मारले की तो रोज बायका बदलत नाही तर एकीलाच ‘ठेवतो’ कशाला मधला मार्ग म्हणायचा? ‘नको बाई मला लग्न’ अस घाबरून म्हणणाऱ्या मुलींची संख्या वाढायच्या आत यावर विचार करायला हवा. कवी ग्रेस म्हणतात तसं आपण ‘सम्यक’ होण्याची गरज आहे. खरतर हे फार अवघडही नाही आणि अशक्य तर अजिबातच नाही, गरज आहे त्या दिशेने पहिल पाऊल टाकण्याचं........


अनिता पगारे, नाशिक. 8080940920, pagare.anita@gmail.com

16 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922