Search

चला मनातलं बोलू या.......

कोणीतरी महान व्यक्ती असं म्हणून गेली आहे की, एखाद्या देशाचे भविष्य समजावून घ्यायचे असेल तर त्या देशाचे तरुण कुठल गाण म्हणताहेत ते पहा. आजच्या भारतातल्या तरुण मुलांना गाण ऐकायला वेळच नाही त्यामुळे त्याचं गाण कुठल आणि त्यावरून देशाचे भविष्य कुठले हे समजावून घेणे फारच अवघड झाले आहे. देश ज्या शक्तींच्या किंवा नेतृत्वाच्या ताब्यात आहे त्यांनी तरुण पोरांना मुबलक नेटपॅक दिल्यामुळे ही सर्व मुल मस्त पब्जी सारखे गेम खेळण्यात, इंस्टाग्राम वर गाव भरच्या खबरी घेण्यात किंवा व्हॉटस्अॅप युनिव्हर्सिटीचा अभ्यास एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात बिझी आहेत. रस्त्याने चालताना कुठलीही तरुण पोर किंवा पोरी पहा ते माणसांशी बोलण्या ऐवजी मोबाईल मध्येच काहीतरी पहात चाललेली दिसतात. जे समोर पाहून चालता आहेत त्यांनाच ह्या मोबाईल मध्ये पहात चालणाऱ्या तरुणांना वाचवावे लागते. बर धक्का लागला तर ते सॉरी म्हणतील अशी अपेक्षा ठेवायची नाही उलट ते काय अडथळा आणला असं आपल्याकडेच पाहतील कदाचित. परवा ऐका नातेवाईकांना भेटायला शहरा जवळच्या एका गावात गेलो होतो. त्यांचे घर गावाच्या मध्यभागी होते आणि घराच्या अगदी जवळ एक छान बांधलेला पार होता. पारावर किमान दहा ते पंधरा तरुण मुलगे एकमेकांना खेटून बसले होते पण एकदम निरव शांतता. कारण कळलंच असेल तुम्हांला, ते सर्व आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी करण्यात बिझी होते. बर ही मोबाईल वर कविताच्या कविता बोलणारी मुल जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा एक वाक्यही एकमेकांशी छान बोलू शकत नाही हा विचार करण्याचा मुद्दा आहे.

आमची मुक्ता नावाची मैत्रीण सोशल मीडियातील मुलांची एंगेजमेंट याविषयावर अभ्यास करीत आहे. तीच म्हणणे आहे कि सद्या सर्वच शाळा डिजिटल बनत आहेत पण ह्या सर्व मुलांना खरतर ‘स्पर्शाची’ गरज आहे. स्पर्शाच्या अभावामुळे ही मुल सतत घाबरलेली, कशावरतीही किंवा कोणावरही विश्वास नसलेली बनली आहेत. त्या मुलांची ही जी स्पर्शाची गरज आहे यावर ना शासन बोलत आहे, ना शाळा ना ही पालक. ही मुल मग नोकरीच्या ठिकाणी पटकन चिडतात, मित्रांमध्ये उभे असले कि कशावरूनही त्यांना राग येतो आणि चेष्टेचे रुपांतर कधी मारामारीत होते हे त्यांचे त्यानाही काळात नाही. आम्ही एका कार्पोरेट कंपनी साठी युवा वर्गाचा अभ्यास करीत होतो तेव्हा लक्षात आले कि ज्या मुलांची मशीन म्हणजे विशेषत: मोबाईल किंवा संगणक यांचेशी संपर्क जास्त येतो ती मुल मानसिक दृष्ट्या खूप लवकर कोणाच्याही ताब्यात जावू शकतात. मग अशा मुलांना कोणीतरी अम्मा, भगवान किंवा बाबा पटकन नादी लावतो. तणावातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल त्या देणग्या देवून अशा अम्मा, भगवान किंवा बाबांच्या पायाशी बसायची त्यांची तयारी असते. म्हणून तर काहीही कमाई नसलेल्या बाबांचे आश्रम कोटी कोटींचे असतात.

मोबाईल फोन किंवा टी.व्ही. हा ऐकूनच नात्यातला दुश्मन बनला आहे. अर्थात यालाही आमचीच पिढी जबाबदार आहे. लहान मुल एंगेज ठेवण्यासाठी आम्हीच त्यांच्या न कळत्या वयात हातात मोबाईल दिला जो मोबाईल आता आमचा दुश्मन झाला आहे. एका ग्रामीण भागाच्या प्रवासात एक लहान मुल खूपच रडत होत. त्याला खाऊ देवून बघितल, बस मधल्या इतरही स्त्रियांनी त्या बाळाला खेळवण्याचा प्रयत्न केला, गरम होत असेल म्हणून हवा घालून पाहिली, कपडे काढून पाहिले पण यश काही येईना. त्याची आई तर रडवेली झालेली. मला राहवेना म्हणून मी तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला. घरी असं रडायला लागलं तर काय करता याची चौकशी केली तेव्हा समजल कि घरी त्याला मोबाईलवर काही विशिष्ट गाणी लावून देतात. ती गाणी तिच्याकडे सेव्ह नाहीत, आणि आता मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे ती गाणी डाऊनलोड ही करता येईना. पुढे गाडी एका तालुक्याच्या ठिकाणी पोहोचली, मोबाईलला रेंज मिळाली, गाण लागलं तेव्हा ते लेकरू शांत झालं. तोपर्यंत त्या लेकराचा आवाज बसला होता. ह्या प्रसंगाने मला फारच शॉक बसला म्हणून मी माझ्या ओळखींच्या ठिकाणी हे सांगत होते तर कोणाच साठी हे नवीन नव्हते. ऐकणारे कोणाच्या मुलाला कुठल गाण ऐकल्याशिवाय जेवण जात नाही आणि कुठल गाण ऐकल्याशिवाय झोप येत नाही याची यादीच वाचत होते. मग अशीही मुल गाडी चालवतानाही कानात गाण्यांसाठी इअर फोन का प्लग घालूनच गाडी चालवतील, बस मध्ये प्रवास करतील किंवा ट्रेन मध्ये प्रवास करतील तरी कानात मात्र नक्की असणारच.

पूर्वी जेव्हा मी टू व्हीलर चालवायचे तेव्हा रस्त्याने गाडी चालवताना भिती वाटत नव्हती, पण आत्ता घरी पोहोचल्या नंतर एक प्रकारचा मानसिक थकवा आलेला असतो. आपण एवढ्या गर्दीच्या रस्त्यावरून, आजूबाजूच्या एवढ्या स्पीडने जाणाऱ्या गाड्यांच्या मधून सुखरुप घरी पोहोचलो याचा तो ताण असतो. रस्त्याने गाडी चालवताना डोळे आणि कान जागे ठेवले कि बरेच ज्ञान प्राप्त होते असे माझ्या लक्षात आले आहे. तरुण मुलं किंवा मुली दोन गाड्यांवर रस्त्याच्या मधोमध चालत छान गप्पा मारत गाड्या चालवत असतात. तुम्ही पाठीमागून कितीही हॉर्न वाजवा, आवाज द्या त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्या शेजारून जातांना त्यांना रागावलो तरी काहीही फरक पडत नाही इतके ते त्यांच्या धुंदीत असतात. अशी ही गप्पासाठी तरसणारी मुल एका ठिकाणी उभ राहून मनसोक्त गप्पा का मारत नाही? हेच मला कळत नाही. अशा ह्या मुलांना घरातही काही घडत असेल तर फरक पडत नसतो. अनेक घरांमधून मी बघते कि घरात कोणीतरी पाहुणे आले आहे आणि नेमकाच यांना यांच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन आलेला असतो त्यात आईवडील काहीतरी काम सांगतात किंवा काहीतरी प्रश्न विचारतात पण हे ‘तरुण’ फोन मध्ये इतके गर्क असतात कि यांना काही विचारलेले किंवा सांगितलेले ऐकायलाचा येत नाही. घरात कोणीतरी आलं आहे म्हणून हे आपल्या मित्र मैत्रीणीना नंतर करतो किंवा नंतर बोलूया असं सांगू शकत नाही? ही मुल अगदी मन लावून गप्पा मारत असतात, यांच्या दीर्घकाळाच्या फोन वरील संभाषणामुळे घरातली मोठी माणसे डीस्टर्ब होतात पण ही मुल काही टस च्या मस होत नाही. एकदा मी सकाळच्या पाच वाजताच्या शिवशाही ने पुण्याला चालले होते. माझ्या शेजारच्या सीटवर एक वयोवृद्ध जोडपं होत. त्यांच्या मागच्या सीटवर एक तरुण मुलगा बसलेला होता. तो बस मध्ये आला तेव्हाच तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याच रिझर्व्हेशन होत त्या सीटवर बसला. त्यानंतर संगमनेरच्या टोल नाक्याला गाडी थांबली तरी बोलतच होता. शेवटी पुढच्या सीटवरच्या आजोबांचा पेशन्स संपलाच आणि ते जोरात ओरडून त्या मुलाला रागावले. आख्खी बस त्या आजोबांच्या बाजूने उभी राहिली आणि त्याच्या फोनचा त्यांना कसा त्रास होतोय हे सांगत होती. जरावेळ ठीक आहे पण गेले दीड तास तो फोन वर बोलतो याचा निषेध केला तेव्हा कुठे तो थांबला.

टू व्हीलर वर मागच्या सीटवर बसलेली तरुण असो कि प्रौढ सतत फोन चेक करून वेळेचा सदुपयोग करतांना दिसतातच. एकूणच व्यक्ती व्यक्तींमधला संवाद थांबला आहे याचा हा सर्व परिणाम आहे. लोक घरात बोलत नाही, कामाच्या ठिकाणी मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हार्ट अॅटक येणाऱ्या व्यक्तीचे वय कमी कमी होत जातांना दिसत आहे. असे अबोल लोक जेव्हा गाडी चालवतात तेव्हा फारच गमतीचे प्रसंग निर्माण करतात. असे लोक कधीच वळताना कधीच कुठलाही सिग्नल देत नाही. चालू गाडीवरून मागे बघतात आणि सरळ गाडी वळवतात. डाव्या साईडला वळताना सिग्नल द्यायचा असतो असे अशा लोकांना माहितच नसतात. त्यांना वळायचे आहे हे मागच्या व्यक्तीने समजावून घ्यायचे असते. असे अचानक का वळलात? असे विचारले तर त्यांचा चेहरा असा असतो कि घ्या ना राव समजावून. मी अनेक वर्ष कौटुंबिक हिंसाचार झालेल्या तक्रारी ऐकण्याच्या कामात होते त्यातल्या अनेक तक्रारी ह्या फक्त न बोलल्या मुळे निर्माण झालेल्या असतात. ज्या दोघांचे वाद आहेत, असतील मग ते घरात असो कि सार्वजनिक आयुष्यात गरज आहे ती फक्त बोलण्याची. एकमेकांना गृहीत धरुन जगण्याच्या आपल्या पद्धती मुळे किंवा तीच आपली संस्कृती आहे असे म्हंटल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत असे मी नाही जागतिक आरोग्य संघटना म्हणते आहे.

मोबाईल चा अतिवापर असो कि माणसांचे ऐकूनच कमी झालेले बोलणे असो उपाय अगदी सोपा आहे तो म्हणजे आपले बोलणे आवाज न चढवता मांडता आले पाहिजे. समोरच्यालाही काहीतरी मत असते हे गृहीत धरुन त्याचे मत येई पर्यंत वाट पहिली पाहिजे किंवा तशी संधी निर्माण करून दिली पाहिजे. घरात आणि दरातही आपल्याला असेच मोकळेपणाने बोलायला शिकायला लागेल. सोपे सोपे मार्ग हाताळावे लागतील. उदा. घरातून कुठेही बाहेर पडतांना आपण नेमके कुठे चाललो आहोत ते घरच्यांना सांगणे, ते सांगणार नसू किंवा ते सांगणे सोईचे नसेल तर आपण परत कधी येणार आहोत हे तरी घरी सांगितले पाहिजे. घरी यायला उशीर होणार असेल तर तसेही घरी, मित्रांमध्ये सांगितले पाहिजे. मी एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी गेले होते तर त्यांच्या घराच्या दरात एक जुन्या पद्धतीचा काळा फळा लावलेला होता ज्यावर घरातल्या सर्वांच्या बाहेरच्या आणि घरातल्या अपॉइंटमेंट्स लिहिलेल्या होत्या. आपल्यालाही आपल्या घरात असा साधा रोल होणारा फळा लावता येऊ शकतो. फ्रीजचा वापर अनेक लोक निरोप देवाण घेवाणीसाठी करतात तसा करू शकता. मुद्दा कसा निरोप जाईल असा नाही तर मुद्दा आहे निरोप देण्याची इच्छा असण्याचा. तेव्हा चला मनातल प्रत्यक्ष डोळ्यात डोळे घालून सांगू या आणि दुसऱ्याचेही खांद्यावर हात ठेवून विश्वास ठेवून ऐकू या……..

अनिता पगारे, नाशिक.

pagare.anita@gmail.com


177 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922