Search

तरच महासत्ता, नाहीतर..........

आज ऑफिसला दुपारचे जेवण झाले आणि असेच जेवण जिरवण्यासाठी आम्ही देशाची चिंता करीत बसलो होतो आणि चर्चा सगळ्या विषयांवरुन ‘आजची तरुण मुल’ याविषयावर आली. असे विषय निघाले की चर्चेच्या ठिकाणी जी तरुण मुल आहेत त्यांच्या वर सर्व चर्चा येऊन अडकते तशीच ती आजही अडकली. काल पासूनच आमच्या कडे समाजकार्य विषयाची पदवी शिक्षण घेणारे आमच्याच भागातले दोन युवक एक महिन्याच्या ब्लॉक प्लेसमेंट साठी आलेले आहे. शिक्षणाची आवड असणारे लोक काय काय प्रयोग करुन पण शिक्षण घेतातच याचे अनेक उदाहरणे मला माहित होती, आज ह्या दोघांची त्यात भर पडली. ही दोघेही आमच्या जव्हारच्या आदिवासी भागातली सर्व सामान्य घरातली मुल, समाजकार्य शिक्षणासाठी नाशिकला प्रवेश मिळाला नाहीतर ते साताऱ्याच्या महाविद्यालयातून शिक्षण घेत आहेत.

त्यांच्या शिक्षणाची आवड ह्या विषयावर चर्चा चालली होती, तिथून ती त्यांची फी ह्यापर्यंत गेली आणि त्यातला एक म्हणाला की माझे आईवडील यांच्या कडे माझी फी भरू शकतील एवढे पैसे नाही म्हणून माझे शिक्षण माझ्या बहिणी मिळून करीत आहेत. मला चार बहिणी आहे आणि मी शेवटचा ‘एकुलता एक’ खानदान का वारीस मुलगा आहे. अशा ह्या शेवटी येणाऱ्या आणि त्यामुळे सर्व आधीच्या मुलींची किंमत कमी करणाऱ्या मुलांना पहिले की मला आपोआप राग येतो, तसा आज ही मला आला राग आला पण आजकाल वयामाना प्रमाणे मी लगेच राग व्यक्त करीत नाही, तसा तो आजही केला नाही. बहिणी शिक्षण करतात ह्याविषयावर सर्व बाजूने चर्चा सुरु झाली. काहींना त्या बहिणींना मात्र शिक्षण मिळाले नाही याचे दुःख वाटत होत. तर काहीना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात ज्या ज्या प्रसंगांत भावाला एखादी गोष्ट मिळाली आणि यांना मात्र मिळाली नाही असे घडलेले प्रसंग उफाळून वर आले होते आणि हिरीरीने त्यांची मांडणी सुरु होती. मग शेकडो मुला-मुलींच्या विषमता दाखवणाऱ्या प्रसंगांचा जोरदार पाऊस पडला.

ह्या विषयात सर्वांनाच बोलायचे असते कारण बोलण्यासारखे, सांगण्यासारखे बरच काही प्रत्येकाकडे असतेच असते, तसे आजही प्रत्येकाकडे काहीना काही सांगायला होते आणि प्रत्येकजण मनोभावे ते सांगत होते. चर्चा पुढे पुढे जातच होती आणि तेवढ्यात तो चार बहिणीचा भाऊ म्हणाला की माझ्या बहिणींना माझ्या सारखे शिक्षण मिळाले नाही हे खर त्यात माझ्या आईवडिलांच्या चुकीपेक्षा आमच्या गावात माध्यमिक शाळा नव्हती, आणि त्यावेळी एवढ्या आश्रमशाळा नव्हत्या, ज्या होत्या त्यांचा प्रचार, प्रसार जेवढा व्हायला हवा होता तेवढा नव्हता. यासर्व गोष्टींचा परिणाम म्हणून माझ्या बहिणी जेमतेम चौथी वर्गा पर्यंतच गेल्या. त्यातही त्यांना शिकवायला ज्या शिक्षकाची नियुक्ती झाली होती तो पगाराच्या आसपासच शाळेत यायचा. त्याला ही पोस्टिंग अजिबात आवडली नव्हती आणि बदली करुन घेण्या इतके पैसे त्याच्या कडे नव्हते आणि त्याच्या परिचयात कोणी मोठा माणूस, नेता ही नव्हता त्यामुळे तो असाच रडत खडत ही नोकरी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणी शाळेत तर जात होत्या पण त्यांची कुठल्याच अक्षराशी नीट ओळख झालीच नाही.

ही परिस्थिती आजही फार बदलेली नाही बर का आमच्या भागात. ही परिस्थिती फक्त गावाच्या झेड पी च्या शाळेतच आहे असेही समजण्याचे काही कारण नाही. तुम्ही आश्रमशाळेत गेले तरी तिथे दहा शिक्षक असायला हवे असतील तर सातच शिक्षक असतात. मग त्या उरलेल्या तीन शिक्षकांचे जे वर्ग आहेत त्यांचे आयुष्य कसे असते हे मी सांगू नये आणि तुम्ही वाचू नये हेच बर. जे शिक्षक आहेत ते शाळेच्या वेळेत शाळेत सापडलेच तर तुम्ही नशीबवान आहात, कारण शाळा दहाला असेल तर हे अकरा वाजता शाळेत येतात. त्यांची पोस्ट ही ‘मुक्कामी’ अशी असते पण हे सर्व शिक्षक रोज त्यांच्या त्यांच्या घरीच सापडतात. त्यांच्यापैकी दोन तीनच शिक्षक आश्रमशाळेत राहतात. पण पगार मात्र पाचवा, सहावा की सातवा जो कुठला वेतन आयोग चालू आहे त्याप्रमाणे मोजून घेतात. त्याबदल्यात आपण पुरेस, कायद्याने अपेक्षित असलेलेही देत नाही याची कुठलीही लाज शरम न त्यांना न त्यांच्या प्रशासकीय कार्यालयातील लोकांना वाटत नाही. शिक्षकांनी गावातच रहावे यासाठी स्वतंत्र ‘भत्ता’ त्यांना मिळतो, ह्याचे जे बिल करायचे असते त्यावर त्या गावाच्या सरपंचाची सही झाल्याशिवाय हे बिल मंजूरच होत नाही. पण ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ ह्या शासकीय न्यायाने सगळी बिल वेळेत मंजूर होतात. विचारले तर ते शिक्षक म्हणतात ज्या आदिवासींना काल पर्यंत त्यांच्या घरी साध अन्न मिळत नव्हत त्याचे खाण्याचे, राहण्याचे, आरोग्याचे प्रश्न सुटला आहे असे सकारात्मक का नाही तुम्ही पहात. खर आहे त्याचं.

आमच्या ह्या चार बहिणीच्या भावाने चर्चा पुढे सुरुच ठेवली होती. तो स्वतः आदिवासी आणि त्याचे जे काही ह्या सर्व प्रशासनाने गमावले होते ते तो पोटतिडकेने सांगत होता. पण त्याच्या ह्याच अडाणी घरात त्याच्या आईवडिलानी मात्र शेतीची वाटणी केली ती मात्र सर्व बहिणी भावा मध्ये समान केली. बहिणी सर्व लग्न होऊन गेल्या आहेत. तर त्यांच्या वाट्याची जमीन ह्याचे वडीलच कसतात पण त्या जमिनीवर जे काही पिकते तो सर्व वाटा त्या त्या मुलीला वेळेवर, न्यायाने आणि सन्मानाने जातो. एवढेच काय पण त्यांच्या त्यांच्या वाट्याची जी जी झाडे शेतात, बांधावर आहेत त्या त्या झाडाची फळ ती ती बहिणच घेते. काल त्यांनी एक बैल विकला तर त्याचे ही समान वाटे करण्यात आले. हे सर्व ऐकून आमची सर्वांची बोलतीच बंद झाली. मुलीही मुलां इतकीच आईबापाच्या संपत्तीत हिस्सेदार आहेत याचा कायदा येऊन इतकी वर्ष झाली तरी याची अंमलबजावणी मात्र अशी खूपच कमी घरात होतांना दिसते. बाकी ठिकाणी मात्र, ‘तू काय आता त्या जमिनीच्या पडीक तुकड्यासाठी भावाशी भांडशील?, दिला तुला तो तुकडा तर तू तुझ्या सासर वरुन येऊन करणार आहेस का? त्यासाठी कोर्टात जाशील? माहेर बंद करुन घेशील?’ हे आणि असे असंख्य टोमणे मारुन मुलींचे खच्चीकरण केले जाते. जी मुलगी असा दावा करते आणि त्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलते तिला सर्वांकडून बदनाम केले जाते.

भारतातल्या स्त्रियांनी राष्ट्रपती होऊन दाखवलं, सक्षम पक्ष प्रमुख म्हणून नेतृत्व दाखवलं, महिला बाल कल्याण पासून ते संरक्षण खात्यापर्यंत सर्व खाती यशस्वीपणे चालवून दाखवली, रिक्षा पासून विमानापर्यंत सर्व उडवून दाखवले तरी जेंव्हा जेंव्हा ‘अधिकार’ देण्याचा प्रश्न येतो तेव्हा तेंव्हा स्त्रियांना ‘इमोशनल ब्लॅकमेल’ केले जाते. आणि एकच पांचट प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो तो म्हणजे, ‘कशाला हवा तुला अधिकार?’ आजच्या निमित्ताने एक गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे आत्ता पर्यंतचा बदलाचा, परिवर्तनाचा इतिहास आपण पहिला तर लक्षात येईल की जेंव्हा जेंव्हा आणि ज्यांना ज्यांना अधिकार समजले त्यांनी ते कृतीत आणले तेव्हाच त्या त्या अधिकारांची अंमलबजावणी झाली आहे. कोणीतरी देईल, करेल, आज ना उद्या करेल अशी वाट पाहणाऱ्यांना कधीच काहीही मिळालेले नाही, आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना स्त्रियांच्या अधिकाराची जाणीव आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने स्त्रियांच्या अधिकाराची अंमलबजावणी स्वतःच्या आयुष्यात केली तरच हा देश सर्वाना घेऊन ‘महासत्ता’ बनेल. लग्नात तो बिन कामाचा रुखवत मांडण्यापेक्षा तिच्या नावावरच्या सातबऱ्याची मोठी फ्रेम लावा. माहेरच्या पुरुषां कडून सासरच्या पुरुषांकडे जाणारा तो हुंडा देण्यापेक्षा मुलीला किंवा बहिणीला संपत्तीचा हिस्सा द्या. एक अशिक्षित आदिवासी आई वडील सहज आपल्या मुलीना अधिकार देऊ शकतात, तुम्ही का नाही..... नाहीतर आहेच एकीकडे महासत्ता करण्याच्या खोट्या स्वप्नरंजनात मित्रो म्हणत कोणीतरी स्त्री मंत्री पदाची शपथ घेत असेल आणि त्याच क्षणाला कोणीतरी स्त्री आहे म्हणून मारली जात असेल, दुधात टाकून, विहिरीत ढकलून, रेप करुन नाहीतर तोंडावर अॅसिड टाकून.......

अनिता पगारे

pagare.anita@gmail.com

9 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922