Search

तुम इतना क्यु मुस्कुरा रहे हो

सकाळी मी ऑफिस पोहचले. सगळ्यांनी good morning तर केलं पण वातावरणात काही तरी ताण आहे हे मला जाणवलंच. इतकी वर्ष पोलीस विभागात आणि त्या आधीही सामाजिक संस्था मध्ये ‘महिलांवरील हिंसाचार’ या विरोधातच काम केले आहे. त्यामुळे मार खाऊन आलेली बाई मला चटकन ओळखायला येते. मनातून दु:खी असलेली व्यक्ती नोकरीची गरज म्हणून हसते ते मला लगेच कळते, कारण मला ते अजिबातच आवडत नाही आणि दुसऱ्यांनी तसं जगाव हेही मला पटत नाही. एखाद्या दिवशी ऑफिसच एखादं काम वेळेवर नाही झालं तर कुठलही आभाळ कोसळते. त्यामुळे मला दु:खी व्यक्तीशी लगेचच, ‘त्या’ विषयावर बोलायला आवडते. त्या व्यक्तीने परवानगी दिली तर मदत ही करावीशी वाटते. तशी मी माझ्या ऑफिसातली आजची दु:खी व्यक्ती शोधून काढली. तिच्या जवळ गेले आणि फक्त “काय झालं ग?” असं खांद्यावर हात ठेऊन म्हणाले तर माझी केवळ २७-२८ वर्षाची ती तरुण सहकारी लगेचच बोलायला लागली. पाहिलं वाक्य ‘त्यांनी माझ्या वर हात उगारला’ असं आदराने नवऱ्याचा उल्लेख करीत बोलण सुरु झालं आणि पुढे भांडण कसं सुरु झालं याचं वर्णन करतांना सहजपणे अरे-कारे वर उतरली होती. ही पहिल्यांदाच घडणारी घटना नव्हती. याआधी जे काही घडलं होतं त्याचही वर्णन तिने केलं आणि आता त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाही या निष्कर्षाला ती पोहचली आणि हा निष्कर्ष तिने अतिशय स्पष्ट शब्दात, माझं कुठलही मार्गदर्शन मिळण्याच्या आधीच व्यक्त केलं. हा निर्णय घेतला म्हणून कुठलीही अपराधी भावना तिच्या मनात नव्हती.

मी अनेक वर्ष हिंसाचारग्रस्त महिलांना त्यांच्या वर होणाऱ्या हिंसाचाराचे विषमतावादी, पितृसत्ता, लिंग विषमता या संदर्भाने विश्लेषण करून त्यावरील उपायांसाठी तिचं तिला सक्षम करण्यासाठी काम करीत होते. पहिल्यांदा जेव्हा मी या कामात आले तेव्हा माझ्या आधीच्या पिढीतल्या स्त्रिया कितीही मारणारा नवरा असला, सासरचे कितीही जाचक असले तरी तिथेच रहाणे पसंत करत होत्या कारण त्यांच्याकडे दुसरं मार्ग, उपायच उपलब्ध नव्हता. सावित्रीबाई फुलेंच्या शाळा सुरु करण्याच्या धाडसा मागचा धडा वेगळ्या वाटेने हिंमतीने जगायचे असते हे त्यांना कोणी सांगितलेच नव्हते. मागच्या पिढीतल्या काहींना गरज म्हणून नोकरीसाठी बाहेर पडल्या आणि त्यातून आलेल्या व्यवहारी ज्ञानातून हिंसाचारातून बाहेर पडण्यासाठी आहे त्या परिस्थितीतही यशस्वीपणे ‘डील’ करायला शिकल्या.

माझ्या पिढीत शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे नोकरीच्या संधीही वाढल्या आणि त्यामुळे कामकरी स्त्रियांची संख्या वाढली आणि त्यांनी स्वतःची किंमतही ओळखायला शिकल्या. या सर्व प्रवासात ‘पुरुष’ मात्र अजूनही १८ व्या शतकात वावरताना दिसतो. त्यामुळे त्याचं वागणं, बोलणं, चालणं, मिनिटा मिनिटाला रुबाब दाखवणं, घरीदारी त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांना दबावात, नियंत्रणात ठेवण्याचा प्रेमाने धाकदपटशहा करून, मेमो काढून, आदळ आपट करून सतत प्रयत्न सुरूच असतो.

मला आज तुमच्या समोर एक प्रश्न मांडायचा आहे तो म्हणजे ‘पुरुष’ का सुधरत नाहीत? आता तुम्ही म्हणाल सुधारला कि आता तो आपल्या मुलीला शाळेत पाठवतोच ना! बायकोला कामावर पाठवतोच ना! हे सर्व मान्य केलं आणि परिस्थितीचे विश्लेषण केलं तर लक्षात येत कि, हे सर्व ‘सुधारणेतून’ आलेले नाहीच आहे. ही सुधारणा कायदा, योजना किंवा आता मुली, स्त्रिया विचारायला थांबतच नाही. निर्णय घेवूनच टाकतात. आता मुली ‘मी बाहेर जावू का?’ असे विचारत नाहीत, मी चालले किंवा मी जरा बाहेर जाऊन येते असं सांगतात. बाहेर जाणाऱ्याने घरात, ऑफिसात किंवा मागे राहिलेल्या व्यक्तीला व्यवस्थित निरोप देऊन जावा. कुठे जाणार आहे? कधी परत याल? इ.इ. हे मला ही मान्य आहे. जेव्हा हे घरातील सर्वांसाठी लागू असतं तेव्हा. पण जिथे मुलग्यांना जेवणनंतर सहज ‘आलो ग ‘ असं म्हणत रात्री पर्यंत बाहेर थांबता येतं आणि मुलीला ७ नंतरचा क्लासही नाकारला जातो तेव्हा वाद सुरु होतात. घरातल्या वातावरणामुळे हा असंतोष बाहेर दिसत नाही, पडत नाही किंवा सनातनी विचारांच्या लोकांना हा सात्विक संताप दिसतच नाही, दिसला तरी मोजायचा असतो हा साधा संस्कारही त्यांच्यात रुजलेला नसतो. मग अशा असुरक्षित घरातल्या मुली जरा कोणी त्यांना छान म्हंटल कि खूष होतात आणि हाच आपला आधार असं मानून सात जन्माचे बंधन घालून घेतात.

ज्या मुली एका भेटीत इम्प्रेस होत नाही त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते कि, त्यांना घरात मोकळीक मिळालेली असते. घरातले पुरुष मग ते आजोबा-वडील-काका-मामा-भाऊ यांच्याशी बोलण्याचे, वेळ प्रसंगी वादविवाद करण्याची, स्वतःची भूमिका पटवून सांगण्याची, शारीरिक स्पर्श करण्याची, मस्ती करण्याची संधी उपलब्ध झालेली असते. त्यामुळे व्यक्ती निवडण्याचं कौशल्य वाढलेलं असतं. कोणी चुकीच्या पद्धतीने अडवण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाच तर ताब्यात न जाता, न घाबरता परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्या वापरतात आणि त्या प्रसंगात अडकून न पडता पुढे जातात. अशा मुलींची संख्या वाढती आहे पण त्याचा स्पीड फारच कमी आहे हे माझे दुखः आहे. आणि तेच आज मला तुम्हांला लक्षात आणून द्यायचे आहे. इतक्या सर्व संतानी, नेत्यांनी प्रयत्न करूनही समाजतले लोक विशेषत: लिंगाने पुरुष असलेले लोक स्वतःच आयुष्य छान रसरसून जगत नाही आणि इतरांनाही जगू देत नाही. हा माझा प्रश्न आहे.

सध्या मी महिला हिंसाचाराविरुद्ध पुरुषांबरोबर काम करते आहे. फारच भारी अनुभव आहे तो. जे पुरुष ‘पितृसत्ता’ घट्ट असलेल्या, लिंग विषमता असलेल्या कुटुंबातून किंवा वातावरणातून मोठे होतात त्यांना स्त्रिया ह्या जन्मजात कुमकुवत आहेत, त्यांना देवाने त्यासाठीच किंवा तसेच बनवले आहे आणि अत्याचार अस काही नसतं ते स्त्रीवादी बायांचं खूळ आहे, स्त्रियांनी आहे त्या परिस्थितीतच जगलं पाहिजे हेच जीवशास्त्र आहे असं त्यांना पटलेलं असतं. आज जे २५ ते ३५ च्या घरात आहे ते आत्तापर्यंतचा घरातला अनुभव, वय, ऑफिसमधील त्यांच्याच तोडीच काम करणारी सहकारी पाहून घराबाहेर असतो तेव्हा स्त्री-पुरुष समानता मानणारा, तसं जाहीर व्यक्त करणारा संवेदनशील व्यक्ती असतो पण एकदा का घरी गेला कि त्याचा सर्व पसारा आई-बहिण-बायको या वर्गाने आवरलाचं पाहिजे हा नियम तो पाळायला सुरुवात करतो आणि असंख्य घरातून स्त्रिया ही ह्याच मानसिकतेच्या असल्यामुळे त्याही लगेच अशा पुरुषांच्या सेवेला हजर असतात. बऱ्याच ठिकाणी असाही अनुभव आहे की जिथे तरुण मुल घरात काही काम करु इच्छीतात तिथे त्या घरातल्या स्त्रिया त्यांना पाठींबा देत नाही. अर्थात याला कारणही तसेच आहे की, एकतर हे काही दिवसच खूळ आहे त्यानंतर आपल्यालाच आवरायचे आहे मग कशाला? आमची किमत कमी करण्यासाठी तर अस करीत नाही ना या भीतीने बायका अशा पुरुषांना कामच करु देत नाही. किंवा तिसरा असा प्रकार अनुभवला आहे की हे जे नवशिके पुरुष आहे ते एक काम करण्याच्या उत्साहात एवढा पसारा करतात की तुझी मदत नको पण पसारा घालून कोस अशी म्हणण्याची त्या घरातल्या स्त्रियांना वेळ येते.

स्त्री आणि पुरुष दोन्हींवर प्रयोग करण्याची गरज आहे. जिथं जिथं या कॅटेगरीतले पुरुष नाटक म्हणून समानता मानत आहेत तिथं लोकलाजेस्तोव जरा मुलीना, बायको ह्या प्रकाराला जरा मोकळीक मिळण्याची शक्यता तयार होते, जरा बरं वातावरण असू शकत. पण जिथं ही मान्यता नाही तिथं स्त्रिया, मुली आता संघर्ष करुन नात्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. तुम्ही त्यांना कितीही कुटुंबव्यवस्थेचे गोडवे गाऊन दाखवले तरी त्या थांबायला तयार नाहीत. तुमच्या खोट्या स्पष्टीकरणापेक्षा स्वतःला त्यांना आलेले अनुभव त्या जास्त गृहीत धरतात. आणि ते अनुभव डोळ्यासमोर ठेवूनच निर्णयाची निश्चिती करतात हे मला जास्त आशादायी चित्र वाटते आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची जी ही प्रथा सुरु झाली आहे ती मला अधिक सकारात्मक वाटते आहे. हा आरसा तुम्हा सर्वांना दाखवण्यामागचे कारणही फार छान आहे ते म्हणजे ‘वॅलेंटाईन डे’. चारचं दिवसांनी तो साजरा करण्याची संधी तुम्हा सर्वांना मिळणार आहे. तो तुम्ही घ्यावी यासाठी हा आरसा.

आता दरवर्षी ‘ह्याच’ दिवशी भगतसिंग, राजगुरू,आणि चंद्रशेखर या देशभक्तांना फाशी देण्यात आली होती आणि तुम्ही मुले ‘त्या’ परदेशी लोकांच्या सण साजरा करत आहात, अशी खोटी माहिती देऊन तुम्हांला गुमराह करण्याची शक्यता आहे. त्याचा तो धंदा आहेपण मला गुमराह होणाऱ्यांचा जास्त राग येतो. स्वतःची बुद्धी, कारणमीमांसा, घटनांचे विश्लेषण करण्याची बुद्धी उपलब्ध असतांना ती गहाण ठेवून आहे त्या अफवांवर विश्वासच कसा ठेवू शकतात? हा मला पडलेला प्रश्न आहे.

‘इव्ह इन्सलर’ या प्रसिद्ध नाटककार कार्यकर्तीने अनेक देशांमध्ये स्त्रियाबरोबर ‘लैंगिक शोषण’ ह्या विषयावर अभ्यास केला आणि तिचा अभ्यास, संशोधनातून आलेले निष्कर्ष ‘ वजयाना मोनोलॉग’ मधून व्यक्त केले. काहींनी हे इंग्रजीतून ऐकले तर बऱ्याच जणांनी ‘ वंदना खरे’ यांनी अनुवादीत केलेल्या ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’त सहभाग घेऊन विषय ऐकला, समजावून घेतला. या इव्ह ने २०१२ पासून अशा असंख्य विविध आत्याचारांमुळे , मुलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे, युद्धामुळे विविध दंगलीमुळे मरणाऱ्या स्त्रियांच्या स्मरणार्थ ‘रडत बसण्यापेक्षा’ आपल बाईपण साजरा करा असं म्हणत OBR नावाचा One Billion Rising अर्थात ‘उगवत्या शंभर करोड’ साजरा करण्याचा फेस्टिवल १४ फेब्रुवारी का सुरु केला.

तुम्ही स्त्री असाल तर या उत्सवात ‘ तुमचं असण साजर करा.’ तुम्ही पुरुष असाल तर यापुढे कुठल्याही कारणाने कुठल्याही स्त्रीच आयुष्य नियंत्रित करणार नाही या कृतीसाठी एक पाऊल टाका आणि त्या प्रवासात सतत सक्रिय आणि प्रवाही रहा. एक ग्रीटिंग देऊन याचा बाजार मांडू नका. यापुढे जेवलेला ताट उचलून ठेवा, घरात कितीही विरोध असला तरी किमान स्वतः चे आतले कपडे कुठल्याही स्त्रीला धुवायला देऊ नका. बोलताना भाषेचा दर्जा, शब्दांची निवड आणि स्वर नम्र ठेवता आला तर खऱ्या अर्थाने हा प्रेमाचा दिवस साजरा केल्याचा आनंद मिळेल. हे सर्व करण्यासाठी तुम्हांला वेळ मिळो आणि तुम्ही ते आनंदाने करो, यासाठी तुम्हांला ‘वॅलेंटाईन डे’ मनःपूर्वक शुभेच्छा. सध्या एवढच.........

11 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922