Search

पोरी वस्तीतल्या

दुपारचे साधारण तीन साडेतीन वाजले होते. मी ज्या वस्तीत काम करते तिथल्या मुलींची मिटिंग सुरु आहे. वस्तीमध्ये (म्हणजेच अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर झोपडपट्टीमध्ये) शांततेने मिटिंग घेता येत नाही म्हणून वस्तीपासून जवळच असलेल्या एका मैत्रिणीच्या बंगल्यावर मिटिंग ठेवलेली. वस्तीतील दहा ते बारा मुली मिटिंग साठी आलेल्या.

सर्व वस्तीतल्या मुली असतात, तशाच ह्याही ! मिटींगला जायचे म्हणून जरा छान आवरासावर केलेल्या. मिटिंग सुरु होऊन अर्धा तास झाला तरी मुली एकदम गप्प. खूप विषय मांडून त्यांना ‘छेडण्याचा’ प्रयत्न केला, पण काही फरक नाही. आंतरराष्ट्रीय महीला आंदोलना पासून ते घर स्वच्छते पर्यंतच्या सर्व विषयांवर मार्गदर्शन झाले तरी मुली गप्पच. शेवटी वैतागून मी विचारलं, “नुकतीच एखादी तुम्हांला विचार करायला लावणारी घटना कोणती?” ताबडतोब सर्वांनी नाशिक मधल्या फुलेनगरच्या अनिता श्रीखंडेच्या हत्येची माझ्या कडे चौकशी केली.

मी त्याच परिसरात रहात असल्यामुळे त्यांनी त्या घटनेबद्दल मला खूप प्रश्न विचारले. त्यांची विचारणा संपल्यानंतर उत्सुकतेपोटी मी त्यांना सहज एक प्रश्न विचारला. त्याच जे उत्तर त्यांनी मला दिले त्याने माझे डोळे खरच उघडले. माझा प्रश्न होता की, “एवढ्या लहान १२-१४ वर्षाच्या मुली प्रेमात कशा काय पडतात? हे काय प्रेम करायचे वय आहे काय?”

“तुझं ‘लव्ह मॅरेज’ झालयं ना ताई?” माझ्या प्रश्ना नंतर मलाच प्रतिप्रश्न.

माझं उत्तर, “हो”.

“कितव्या वर्षी तू प्रेमात पडलीस?” दुसरीचा पहिला प्रश्न

मी आठवून सांगितलं – “१८-१९ व्या वर्षी.”

“इतक्या उशिरा?” – त्यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया.

“उशिरा कसलं? खूपच लवकर. माझ्या ग्रुपमध्ये मीच सर्वात आधी प्रेमात पडले.”- माझं जस्टीफिकेशन.

“तेव्हा तू शिकत होतीस का?”- त्यांचा पुढचा प्रश्न.

“तेव्हा मी एफ. वाय. किंवा एस. वाय. ला असावी.”- माझं उत्तर

“का गं, एवढ सगळ का विचारताय?” – त्यांच्या गप्प बसण्याला माझा प्रश्न.

“ताई, आमच्याकडे मुलीला शाळेत एकतर पाठवतच नाही. ज्यांना पाठवतात त्यांना चौथी पर्यंतच शिकवतात. शाळा चौथी पर्यंतच असली तर पाचवी नंतर नवीन शाळा शोधून, तिथे अॅडमिशन घेण्याचे कष्ट कोण करणार? बऱ्याचजणींना घरी बसाव लागतं. त्यात ती शाळा सातवी पर्यंत असेल तर त्या मुलींना किमान सातवी पर्यंत शाळेत जायला काही अडचण येत नाही.”

या वस्तीतल्या पोरी सातवी नंतर एकदम मोठ्या दिसायला लागतात. चेहऱ्याने, अंगाने एकदम भरायला लागतात. घरच्यांच्या आधी ते आजूबाजूच्यांच्या लक्षात येतं. विशेषतः आमच्या वस्तीमधल्या तरुण मुलांना आणि म्हाताऱ्या आया बायांना. पोरींच्या आईशी मग हे सर्व गमतीने बोलायला लागतात. मग आईच्याही लक्षात आपली ‘वाढलेली पोरगी’ येते.

यासर्व वातावरणामधून एखाद्या मुलीला तिचे आई-वडील वरच्या वर्गात शिकायला पाठवतात. त्यात एखादी सातवीला नापास झाली की तीच शिक्षण तर तिथेच थांबायला पाहिजे हे तिनेच घोषित केलेलं असत. अशा दहा ते बारा वर्षाच्या पोरी आपल्या आईबरोबर धुण्या-भांड्याच्या कामाला जायला लागतात. मुलींना आवडत असलं तरी आणि नसलं तरीही.

जेव्हा ही मुलगी एखाद्या बंगल्यात कामाला जाते तेव्हा तिथं त्याचं शिळपाक का होईना, व्यवस्थित जेवण मिळायला लागतं. मालकिणीचे जुने कपडे, तीने वापरलेल्या फॅशनेबल क्लिपा, रबर, चपला, टिकल्या, बांगड्या वापरायला मिळतात. किंवा मिळालेल्या कामाच्या पैशातून मालकिणी सारख्या फॅशनेबल वस्तू घेण्याची चटक लागते.

अशा मुली मग वस्तीत उठून दिसायला लागतात. काहीतरी का होईना कमवायला लागल्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास, स्वतः बद्दलचा आदर चेहऱ्यावर दिसायला लागतो. ती मुलगी स्वतःकडे एक वेगळ्याच नजरेने बघायला शिकते. ती जस बघते, तस वस्तीतले इतरही तिच्या कडे बघायला लागतात. ते तिच्याकडे बघतात हे तिला कळावं यासाठी त्यातले काही तिला पाहून उगीच हसण, ‘त्या’ अर्थाचं एखाद गाणं गुणगुणणं, एखादा सूचक शेर मोठ्या आवाजात म्हणणं यांसारख्या प्रतिक्रिया देतात. त्यातून त्यापैकी एखाद्याबरोबर गुटर गुटर सुरु होतं. बऱ्याच वेळा ‘लाईन’ वेगळाच मारतो आणि रिस्पॉन्स मात्र त्याचा संदेश घेऊन जाणाऱ्यालाच मिळतो.

साधारण बारा वाजेपर्यंत कामा वरुन मुली घरी येतात आणि परत संध्याकाळी पाच वाजता कामावर जातात. यामधल्या चार साडेचार तासात त्या मुलींना त्याअर्थाने सकारात्मकदृष्ट्या गुंतवून ठेवेल असे वस्त्यांमध्ये काहीही नसतं. बाकीच्या मुली जस शिकतात किंवा पुस्तकी शिक्षण घेत नसल्या तरी एखादा छंदवर्ग, शिवणक्लास इत्यादी सारखे क्लास करीत असतात. तस ह्या मुलींना कुठलेही ध्येय डोळ्यासमोर नसते.

जस मुलींना नसतं तस फार्स वातावरण मुलानाही नसतं. ते ही तसेच रिकामे असतात. अशा प्रकारे दोन्ही समदु:खी एकमेकाला सावरण्यासाठी पुढे येतात. यशस्वी झाले तर लग्न होत. यावस्तीत तेवढंच एक बर असत. तथाकथित मध्यमवर्गीयां सारख जात-पात-धर्म यावरुन मारामाऱ्या करण्यात कोणी फारसा वेळ घालवत नाही. पहिल्यांदा विरोध करुन पाहतात. त्यानंतरही मुल त्यांच्या मतावर पक्की असतील तर सर्व वस्ती मिळून मोठ्या उत्साहाने लग्न लावून देतात आणि हे प्रकरण फसल तर मुलीच घाईघाईत कोणाही एका दारुड्या, तिच्या पेक्षा रुपाने कमी असलेल्या सोम्या गोम्याशी लग्न लावून दिल जातं आणि प्रकरणातल्या मुलावर ‘मामा’ बनण्याची वेळ येते.

यामुलीनी जे सांगितलं ते अगदी खर आहे. आज मी ज्या वस्तीत काम करते तेव्हा हा आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो की, तरुण मुलींच्या मनात निरनिराळे विषय घुसवणाऱ्या या मधल्या वेळेच काय करायचं? त्यातल्या त्यात त्यांची आर्थिक परिस्थिती जरा बरी असते ते आईबाप मुलीच्या कमाईवर खाण स्वतःचा अपमान समजतात आणि १०-१२ व्या वर्षीच मुलीच लग्न लावून निवांत होतात.

तरुण मुलगी सांभाळणे अगदी कठीण आहे अस सर्वच स्तरांमध्ये पक्का समाज आहे. त्याअर्थाची एक फार प्रसिद्ध म्हण आपल्याकडे आहे- एक तरुण मुलगी सांभाळण्यापेक्षा एखादा हत्ती सांभाळण सोपं ! या मुलींनी मांडलेल्या परिस्थितीवरून अनेक गोष्टी समोर येतात. मुलींना अपयशी होण्यासाठीची एकही संधी आपला समाज देत नाही. मग ते अभ्यासातलं असो किंवा आयुष्यातल्या वागण्यातल असो. एकदा जरी अपयशी झाली तरी त्याचे परिणाम तिला आयुष्यभर भोगायला लागतात. एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला. पुढे तो मुलगा वाईट वागला तर यामुलीचे कुठलेही कुटुंब त्या मुलीला स्वीकारायला तयार नसतात. तीच दु:ख, अडचण समजावून घेण्याची, ऐकून घेण्याची सुद्धा तयारी कोणी दाखवत नाही. “तुला आवडला ना, आता तूच निस्तार” हेच प्रत्येकाचे म्हणणं!

शहरी वातावरणाच्या झगमगाटात जगणाऱ्या मुला मुलींची सुख दु:ख आणि प्रश्न सगळेच फार निराळे असतात. या धुमधडाक्या पासून दूर काहीशा अंधारात जगणाऱ्या खेड्यापाड्यातल्या, झोपडी- वस्त्यांमधल्या मुला-मुलींना कधी ओळखणार आपण?

85 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922