Search

भारत एक महासत्ता.....खरच

किती तरी वर्षांनी आपण जगातले सर्वांत तरुण राष्ट्र असणार आहोत असं प्रत्येक शासकिय जाहिरातीत दाखवले जात आहे. म्हणजे त्यावेळेसची आपल्या देशातल्या तरुणांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येत सर्वात जास्त असणार आहे. वयाच्या दाखल्या नुसार ही माहिती एकदम बरोबर आहे. पण काही लोक ‘म्हणजे आपण महासत्ता बनणार’ असा त्याचा अर्थ काढत आहेत त्याचा विचार आपण आज करावा त्यासाठी मला आज तुमच्याशी बोलायचे आहे. महासत्ता होणार असे म्हणणारे लोक वेगवेगळ्या सत्तेत असल्यामुळे ते खरच बोलताय असे सर्वसामान्य माणसाला वाटते आहे हा माझा काळजीचा विषय आहे म्हणून मी तुम्हांला आज माझे काही अनुभव सांगणार आहे.

सध्या रोज शासनाच्या कुठल्या ना कुठल्या नोकर भरतीच्या बातम्या येत आहेत. अशीच एक बातमी लिंक सहित आमच्या एका व्हाटसअप ग्रुप वर आली होती. ग्रुप मधल्या दोन तरुण मुलींनी त्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची इच्छा दाखवली. आता कुठलेच शासन कायमस्वरूपी नोकरी अशी हमी द्यायला तयार नाही. पगार चांगला देतील का याची शाश्वती नाही. पगार वेळेवर येईल कि नाही याचीही शाश्वती नाही. तरीही नोकरी करु इच्छिणारे, नोकरीचे वय असणारे आणि त्यांचे पालक मात्र सरकारी नोकरी म्हणजे खूप भारी याच मनोवृत्तीत असतात आणि त्यासाठी सतत नोकऱ्यांचे अर्ज भरणारे अनेक तरुण मुल-मुली मला माहित आहेत. त्यापैकीच ह्या दोघी. मला वेळ होता आणि मी त्यांना मदत करावी त्या ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी अशी त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही तिघी बसलो लॅपटॉप समोर. साधारण अडीच ते तीन तास खेळत होतो त्या लिंक वर तो फॉर्म भरण्यासाठी. त्याच्या १६ पायऱ्या/स्टेप्स होत्या त्या पूर्ण करायला तीन तासाचा वेळ लागला आणि शेवटी सर्व फॉर्म भरून झाला आणि आम्ही शेवटचे बटन दाबले सेंड करण्यासाठी तेव्हा त्या लॅपटॉपनेच आम्हांला सांगितले की तुम्ही ‘एमएस ऑफिस’ शिकलेले नसल्यामुळे तुम्हांला आम्ही आत घेत नाही आहोत. बर माझ्या ह्या दोन्ही मैत्रिणीनी ‘एमएससीआयटी’ केलेले होते आणि त्यात दोघीनाही चांगले मार्क्स होते. सध्या दोघीही चांगल्या स्पीड ने संगणक चालवतात, वापरतातही. पण हे तपासायच्या आधीच तुम्ही आत येण्याच्या लायकीच्या नाही असा नकाराचा शिक्का त्यांना मिळालं. हा निरोप वाचून माझ्या दोन्ही मैत्रिणी खूपच नाराज झाल्या.

असं रोज एक ना दोन असंख्य तरुणां बरोबर घडते आहे. माझ्या ह्या मैत्रिणी खूपच नाराज झाल्या, रडवेल्या झाल्या. मग मी त्यांना समजावत होते की मी कधीच कुठल्याच सरकारी नोकरी साठी अर्ज केला नाही. कायम सामाजिक संस्थेत नोकरी केली, सामाजिक कामातच रमले. त्याच नोकरीच्या आधाराने घर, गाडी घेतली. माझा साथीदार ही कायम खाजगी नोकरी मध्ये होता. आमच्या स्वतःच्या घरात कधीच आम्ही दोघांपैकी कोणीच सरकारी नोकरीत नसतांना सगळ कमावलं. माझ्या ह्या मैत्रिणीनी पटकन ऐकल किमान तसं दाखवलं तरी. पण सरकारी नोकरी म्हणजेच आयुष्याचे सार्थक असं म्हणणारे किती आणि कसे नाराज होतात, त्यांना हे फारच मोठे अपयश वाटत आणि ते त्याचा राग स्वतःवर किंवा घरच्यांवर काढतात. मग अशी मुल-तरुण मुल-मुली सतत तणावाखाली जगतात. त्यातल्या ज्या लोकांना अशी सरकारी नोकरी मिळते त्यांना आयुष्य सार्थकी लागले असे वाटते.

खरच सरकारी नोकरी म्हणजेच सर्व काही का? आपल्या देशातल्या एकूण नोकऱ्यांच्या संख्येत ३ ते ४ टक्के नोकऱ्या ह्या फक्त सरकारी आहेत. मग आपल्या देशातली २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे हे एवढे लाखो तरुण त्या एका सरकारी नोकरी भोवती का फिरतात? हा माझा चिंतेचा विषय आहे. आणि आज मला याच विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे. दहा एक वर्षापूर्वी बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मागे लागून मी ही कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक ह्या पदासाठी अर्ज केला होता. जागा मर्यादित आणि असंख्य अर्ज. मी अनेक वर्ष ह्याच विषयात काम करीत असल्यामुळे माझी निवड होणारच अशी माझी ठाम समजूत. प्रत्यक्षात माझी निवड झाली नाही. माझ्या सारख्या अनेकांची निवड झाली नाही असे काही दुखी आत्मे एकदा एका कार्यक्रमात भेटले आणि ठरलं की याची माहिती काढायची. माझे एक परिचित त्या विभागात नोकरीला होते म्हणून मी त्यांना भेटले आणि चौकशी केले तर त्यांचे उत्तर ऐकून मला राग आलाही आणि नाही पण आला. ते म्हणाले अग आलेल्या अर्जांपैकी अनेक जण त्या कामासाठी सूट होणारे होते, त्या योग्यतेचे होते. पण जागा मर्यादित आणि अर्ज मात्र अमर्यादित मग स्क्रूटीनी कशी करायची ह्याचा विचार त्यांच्यात चालू होता मग त्यांनी प्रत्येक अर्ज वाचण्यासाठी त्यांचा लागणारा वेळ लक्षात घेता संगणक यंत्राचा वापर करायचा ठरवला आणि त्याला एक यादी दिली की ज्यांच्या कडे ही यादी आहेत तेवढेच लोक आत घे आणि आम्हांला ती यादी दे. यंत्रच ते त्याला डोक नाहीच ना! त्या यंत्राने सगळे अर्ज तपासले आणि एक यादी दिली त्यातून पुढची निवड केली गेली. त्यात ज्या लोकांची यादीत नाव आली नाही त्याची करणे गंमतीशिरच आहे. त्यातले एक कारण होते की, एका व्यक्तीने लग्न झाले याचे सर्टिफिकेट जोडले होते पण अर्जात टिक केले नव्हते; एकीने बारावी आणि पदवीचे गुणपत्रक अर्जाला जोडले होते पण दहावीचे जोडले नव्हते अशी कारण सांगत संगणकाने लोकांना यादीच्या बाहेत काढले होते. आता बोला!

एकीकडे असे नोकऱ्यांसाठी पोत्याने अर्ज आणि दुसरीकडे एमआयडीसी मध्ये लोक पाहिजेत चे वर्षोनुवर्षे लिहिलेले बोर्ड. दोन्हीही खरे. महासत्ता अशी अर्जाच्या पोत्याच्या संख्येने थोडी बनणार आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने ही तरुणाई कामाला लावली पाहिजे. ही देशाची सर्वार्थाने असलेली संपत्ती देशाच्या विकासासाठी वापरायला हवी. यासाठी हे सरकार की ते सरकार हे महत्वाचे नाही, गरज आहे ‘विकास’ ह्या प्रक्रियेकडे संवेदनशीलतेने पाहण्याची. आयटीआयचे बोर्ड बदलून स्कील इंडिया असा बोर्ड लावल्याने आपण महासत्ता बनू शकणार नाही हे समजून घेण्याची आज गरज आहे. त्यासाठी शाळे पासूनच श्रमाला मान्यता, प्रतिष्ठा द्यायला हवी. शाळे पासूनच श्रमाची सवय लावली पाहिजे. श्रमाशिवाय कोणालाच घरात, गावात, देशात भाकर मिळणार नाही याची व्यवस्था उभी करायला हवी. घरातला एक साधा नगरसेवक झाला की त्याच्या आख्या खानदाना ची माज मस्ती सुरु होते त्याला थांबवायला लागेल. सरकारी अधिकाऱ्यांची, त्यांच्या नातेवाईकांची दादागिरी थांबवायला हवी. कळायला लागल्यापासून छोट्या छोट्या कामात आईला मदत करणाऱ्या ताईला जेवण शेवटी आणि गावभर उनाडक्या करुन आलेल्या दादाला जेवण आधी, तेही व्यवस्थित, आदरासहित. आणि तो जेवला की ताट मात्र ताईने उचलायचे अशा देशातले फुकट खाऊन जगणारे लोक कशी आणि कधी महासत्ता आणतील. त्यांच्यात कष्ट करण्याची इच्छा, ताकद आणि त्यासाठी करावे लागणारे सातत्याचे प्रयत्न ते कधी करतील. देश महासत्ता करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा श्रम आणि बुद्धीचा वाटा नियोजना पासून ते वाटपा पर्यंत समान घ्यावा लागेल तर ते जमण्याची शक्यता आहे.

आज पदवी घेणारा किंवा घेणारी शारीरिक कष्ट करायला नको म्हणते/म्हणतो कारण आपण शाळेत त्यांना कष्टाला किंमत द्यायला शिकवलेच नाही. शाळेतील शिपाई, संडास साफ करणारे, झाडू मारणारे यांना कधी आपण सन्मानाने बोलावले नाही, वागवले नाही, सोबत जेवायला घेतले नाही त्यामुळे ह्या सन्मानाच्या जागा आहेत, नोकऱ्या आहेत हा संदेशच गेला नाही. त्यामुळे प्रत्येकाला खुर्चीवर बसून आदेश काढायचा आहे आणि म्हणून माणस ती खुर्ची - मग ती नोकरीची असो नाहीतर राजकारणातील लोक वाट्टेल तेवढे पैसे देऊन, गुंडागर्दी करुन, ओळख वापरुन, जात/ धर्म/पंथ/प्रदेश/लिंग असे कोणाच्याच उपयोगाचे नसलेले अनेक कार्ड/ आधार वापरुन ती खुर्ची पटकवण्याचा प्रयत्न करतात. मी हे सगळ माझ्या मैत्रिणीला सांगत होते आणि माहित नाही का पण तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या अर्जाचा नाद सोडला आणि आहे त्या खाजगी नोकरीच्या कामात रमली. पण असे खरतर प्रत्येकच तरुण-तरुणीला सांगायला हवे. सर्व एमएसडब्ल्यू झालेल्या प्रत्येकाने कल्याणाच्या कामासाठी सरकारी नोकरीत येण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या गावात, राहतात तिथे लोकांशी बोलण्याचा, त्यांना समजावून घेण्याचा, त्यांना मन मोकळ करण्यासाठी जागा निर्माण करण्याचा व्यवसाय केला तर? आणि हे सर्व पैसे घेऊन करायचे बर का! एकीकडे असे समुपदेशन शिकलेले लोक आहेत, त्यांनी अजून थोडे ऐकून कसे घ्यावे, परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे याचे तंत्र शुध्द प्रशिक्षण घेतले तर समाजात अशा शेकडोंची गरज आहे ती पूर्ण होईल. आज लोकांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात असे लोक हवे आहेत जे त्यांना ऐकून घेतील, त्यांचे अपयश, त्यांच्या निराशा समजावून घेतील.

आज आपण दरवर्षी शेकडोंनी/ हजारोंनी पदवीचे कागद घेवून बाहेर पडलेल्या निकामी लोकांची फौज बाहेर काढत आहोत. जिला भूक लागली आहे स्वतःचे ज्ञान, कुवत दाखवण्याची आणि आपण त्यांना एकाच रांगेत उभे करुन एकाच मापात तोलून तुम्ही लायक नाही असा अर्धवट, आग लावू शकेल असा निरोप देतो आहोत. अशा नाकारल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मग अशी सगळी हुशार गँग नको त्यांच्या हातात जाते आणि त्यांना मग आपला धर्म बुडत आहे तो दुसऱ्यामुळे, तुला काम मिळाले नाही कारण तो दुसरा आहे असे खोटे सांगून धर्म युद्धासाठी स्वयंसेवक किंवा जिहादी म्हणून तयार केले जाते. मग असे जिहादी स्वतः बाँब बनतात, स्फोटकाने भरलेली गाडी कशावर तरी आदळायला तयार होतात, आणि आत पेटलेल्या आगीने अनेकांचे जीव घेतात. यासर्व आगींचा उपयोग देशाच्या गरजेच्या अन्न शिजवण्यासाठी, प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या शारीरिक, सामाजिक रोगांचे जंतू जाळण्यासाठी केला तरच ‘महासत्ता’ शक्य आहे नाहीतर..........

अनिता पगारे, नाशिक.

pagare.anita@gmail.com

19 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922