Search

भारत मे इंडिया

भारतात कुठेही जा तुम्हांला दोन देश एकत्र रहात आहे असे जाणवेल. मी सद्या रहाते आहे त्या जव्हार- मोखाडा भागात तर हे फारच जाणवते आहे. शेजारचा जिल्हा जगाची आर्थिक राजधानी आणि त्याचा दोन तासावरच्या गावांमध्ये अजूनही लहान मुलं मरतात कारण त्याचं पोषण व्यवस्थित झाल नाही म्हणून. पहिल्यांदा मी इथे आले आणि आमच्या एका संचालका बरोबर फिल्ड पहायला गेले होते तर जेवढी माणसे पहिली ती सर्व फक्त हड्डी दिसणारी. पहिल्यांदा वाटलं की फिल्ड दाखवत आहेत तेव्हा मला दुःख कळाव यासाठी खास निवडलेली गाव असावी. पण जसजसा प्रवास होत होता तस तस माझ्या लक्षात आल की, सगळीकडे सारखच आहे. ते संचालक संस्थेच्या कामाचा परिचय करुन देतांना म्हणाले, ‘आपण अशा लोकां बरोबर काम केले किंवा पुढे ही करणार आहोत त्यांना ‘भूक’ नावाची गोष्ट असते हे सांगावे लागते’. पहिल्यांदा ही अतिशोयक्ती वाटली होती, आता रोजच अनुभवते आहे.

एकीकडे आठशे का कितीतरी करोड रुपयांचे घर असेलेले लोक आहेत आणि इथे गरोदर स्त्रिला बेसिक तपासण्या करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असेल तर बस साठी लागणारे रोख चाळीस रुपये नसल्यामुळे पोटात काहीतरी गडबड आहे हे कळत असूंनही दवाखान्यात न जाता गावठी इलाज करीत मृत्यूला सामोरे जाणाऱ्या शेकडो स्त्रिया एकीकडे. एका शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आदिवासी लोकांसाठी काय केले तर त्यांचे अकाली मृत्यू थांबवू शकतो अशी गंभीर चर्चा सुरु होती. मी त्यात अशी सूचना मांडली की डोंगराळ प्रदेशामुळे आणि विखुरलेली लोकवस्ती मुळे कोणाचेही सरकार आले तरी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक गावापर्यंत पोहोचवता येणार नाही. मग आपण शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरु केल्या. त्या फार छान चालताहेत अस नाही पण एक व्यवस्था तयार झाली आणि त्यामुळे शिक्षणाची संधी अनेकांना उपलब्ध झाली. तस शासनाने मोखाडा- जव्हार सारख्या अतिदुर्गम भागात गरोदर स्त्रियांना बसचा प्रवास मोफत करावा/द्यावा. तीच गरोदर असण हेच प्रमाणपत्र. तर पहिली प्रतिक्रिया आली की बायका याचा गैर वापर करतील. मला तर हसूच आले. पण राज्यकर्त्यांच्या नजरेने विचार करुन पहिला तरी मनात प्रश्न आला, किती बायका गैरफायदा घेतील? किती शासनाचे किती नुकसान होईल? समजा झाले नुकसान तर काय? निरव मोदीने केलेल्या नुकसानीचे आपण काय केले? पण कुठलीही बचत कायम गरीबांपासूनच सुरु होते. कशाचीच का लाज वाटत नाही आम्हांला? तुम्ही म्हणाल यात लाज का वाटायची? आणि ती आम्हांला का वाटेल? ते त्यांच्या कर्माने गरीब राहिले. झेपवत नाही तर एवढी मुल कशाला जन्माला घालता? खर आहे तुमच. कदाचित ह्या फुकटच्या बस प्रवासाने प्राथमिक आरोग्य केंद्रात एकदा का हे गरीब पोहोचले की त्यांच्यात कुटुंब नियोजना बद्दल बोलण्याची एक संधी निर्माण होते अस का आपण याकडे पहात नाही? हा माझा प्रश्न आहे.

त्त्यांना विकास करायची इच्छा असती तर त्यांनी आमच्या सारखे शहरात येऊन कष्ट करायचे होते. हा एक विचार कायम शहरात राहणाऱ्या माणसाच्या मनात असतो. खरतर हे मला आधीपासून माहिती होते की, हे गावाकडचे अडाणी लोक गावाला सांभाळून राहिले नसते आणि त्यांनीही तुमच्यासारखे शहराकडचे रस्ते धरले असते तर तुम्हांला मला शहरात ज्या बागा, मोकळ्या जागा शिल्लक दिसता आहेत ना त्या दिसल्या नसत्या. विचारा कस? खरतर आपणही सर्व कुठल्या ना कुठल्या गावा कडूनच शहरात आलो. जेव्हा आपण आलो होतो तेव्हाही आपल्या आधी आलेल्याने आपल्या नावाने बोटेच मोडले होते आणि ते हे विसरुन गेले की आपणही कधीतरी असेच गावा वरुनच आलेलो आहोत. ते विसरले तसे आपणही विसरलो. दिवसेंदिवस शहर फुगत चालली आहेत. आपली शहर कशी बेढब वाढत आहेत, ढेरफुट्या माणसा सारखी हे पाहायचे असेल तर एकदा विमानाने प्रवास कराच. गुजरात वरुन मुंबई ला येतांना आपण समुद्रावर काय डेंजर अतिक्रमण केले आहे याचा अंदाज येईल. समुद्राने थोडी जरी हालचाल केली तर काय होईल हे निसर्गाने आपल्याला मोठी नदीच्या रुपाने दाखवून दिल आहे. पण एका अनुभवाने सुधरलो तर आपण माणस कसली?

मी तुम्हांला सांगते आहे कारण तरुण देशाचे नेतृत्व करीत आहेत. २०१४ ला कोणाच्या तरी प्रचारात मिळालेली माहिती खरी आहे हे मानल आणि आधीच्याना घरी पाठवून नवीन विकास करु पाहणाऱ्यांना संधी तुम्ही दिलीत आणि त्याच्या गौरवात तुम्ही पुढची तीन वर्ष रमले. प्रश्न सत्तेवर ‘हे’ का ‘ते’ असा नाहीच आहे. प्रश्न आहे आपण कशाला विकास म्हणायचे. मला आसरा मिळाला, दोन वेलची भाकरीची व्यवस्था झाली म्हणजे विकास झाला की अजूनही कोणीतरी माझ्या इतका जेवायचा बाकी आहे आणि तीही माझीच जबाबदारी आहे अस मानून विकासाची व्याख्या करायची हा खरा प्रश्न आहे. प्रसिद्ध नेते भाऊ फाटक यांना भेटायला आम्ही गेलो होतो. चर्चा सुरु होती आणि कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला,’भाऊ. तुम्ही कसे चळवळीत आलात, तुमच तर घरी चांगल होत?’ ‘मी जेव्हा माझ्या आनंदासाठी बागेत जातो आणि तिथ कोणीतरी जेव्हा एक वेळच्या भाकरीसाठी भिक मागत असतो, मला आनंदाने ती बाग अनुभवता येत नाही, तो आनंद मला घेता यावा साठी समानता, सर्वाना आदरयुक्त जगण्याची संधी मिळावी म्हणून मी चळवळीत आलो.’ कधीच विसरलं जात नाही भाऊंचे हे उत्तर.

सद्या आपण काहीतरी पैसे कमवायला जातो, विचार करीत नाही आहोत की हा मार्ग बरोबर आहे का? कशासाठी पैसे कमवायचे हे ठरलेले नसल्यामुळे टार्गेट च्या जाळ्यात अडकतो मग मरेस्तोवर पळतो टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. आपण जितके पळतो तेवढे टार्गेट वाढतच जाते. मग थकतो आणि किती पळालो याचा हिशेब काढायला जातो तर कमावलेला पैसा, त्यासाठी गमावलेली वेळ, दुखावलेली माणस आणि तणावातून आलेल्या आजारांना थोपवण्यासाठी भरलेली डॉक्टरची बिल यांचा हिशेब केला की लक्षात येत अधिक वजा करुन हाती फार काही राहिलेलं नसत आणि पुढे पाळण्याची ताकदही उरलेली नसते. मग थोड हळू जायला, विचार करुन मग जायला काय हरकत आहे. यात ज्यांनी ज्यांनी भाऊं सारखा दुसऱ्याचा विचार केला, त्यासाठी जमेल तेवढा वेळ, बुद्धिमता, पैसे, ज्ञान, श्रम गुंतवले त्यांचे आयुष्य आनंदाने जाण्याच्या शक्यता वाढल्या आणि त्यांच्या या निर्णयामुळे इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण येण्याच्या शक्यता वाढल्या.

जोपर्यंत गाव, शहर एकत्र होती तोपर्यंत बरेच प्रश्न सोपे होते. तेव्हा किमान प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एकत्र होत्या जिथे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब एकाच शाळेत एकत्र होते त्यामुळे सगळेच जमिनीवर राहण्याची शक्यता होती आता केजी पासूनच श्रीमंताच्या, अति श्रीमंताच्या शाळा वेगळ्या झाल्या आहेत त्यामुळे गरीब हे आळशी असतात, त्यांना काम करण्याची इच्छा नसते किंवा मागच्या जन्माचे पापाचे फळ ते आता भोगताहेत किंवा सर्व श्रीमंत म्हणजे चोर असतात, त्यांनी कमावलेला प्रत्येक पैसा हा त्यांनी चोरीतूनच कमावलेला असतो आणि ते सतत कोणाला ना कोणाला लुबाडत असतात असे दोन्ही बाजूने गैरसमजाचे इमले च्या इमले तयार होतात आणि समाज अधिकाधिक एकमेकाविरुद्ध कडवा होत जातो.

गांधी बाबाचा फोटो लावायचा आणि एकदम त्याच्या विचारांच्या विरुद्ध वागण्याची सद्या पद्धत आहे. पण बापूंचा विचार डोक्यात घेतल्याशिवाय, तो आचरणात आणल्याशिवाय आपल्याला पुढे जाणे आज तरी अडचणीचे आहे. बापू म्हणाले होते की, ‘विकास म्हणजे काय तर, समाजातल्या सर्वात खालच्या माणसाला डोळ्या समोर ठेवून सर्वांनी मिळून विचारपूर्वक टाकलेले एक पाऊल.’ थांबू या ना जरा. आपल्या समाजातल्या शेवटच्या माणसाला शोधू या. कदाचित फार शोधाव लागणार नाही, फक्त संवेदनशील पणे डोळे उघडून बघण्याची गरज असावी लागेल. तुम्ही परत फिरण्याची, उलटा प्रवास करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही थोड थांबलात तर त्या शेवटच्या व्यक्तीला तुमच्या पर्यंत पोहोचणे सोपे जाईल कदाचित. आणि मग सगळे मिळून चालूया हसत खेळत. कुठल्याही द्वेषाशिवाय. मग असेल भारत तरी किंवा कदाचित इंडिया तरी.......

अनिता पगारे, नाशिक.

pagare.anita@gmail.com

23 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922