Search

मनातील आठवण कि सेल्फीतील आठवण...

एक तरुण कपल एका रेस्टॉरंटरंटमध्ये बसलेलं आहे. एकदम रोमॅन्टिक माहोल आहे, आपल्याला वाटतं त्यांच्या गुलुगुलु गप्पा सुरु असतील पण नाही, ती दोघंही आपापल्या फोनमध्ये गर्क असतात. थोड्या थोड्या वेळाने अगदी एखाद दोन शब्द एकमेकांशी बोलत असतात आणि उरलेला सगळा वेळ एकीकडे खात दुसरीकडे अधून मधून जमलं तर एकमेकांशी बोलत बाकी सगळा वेळ त्यांच्या त्यांच्या फोनमध्ये रमलेले असतात. हे चित्र हल्ली खूप कॉमन आहे. या प्रेमी जोडप्याचं सोशल मीडिया अकाउंट जाऊन बघितलं तर मात्र वेगळंच चित्र दिसेल. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले त्यांचे सेल्फी बघून ते किती एकमेकांना वेळ देतात असं काहीबाही वाटण्याची खूप दाट शक्यता असते. पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही.


दुसरी एक घटना म्हणजे कुठलाही कार्यक्रम किंवा पर्यटनाची जागा. सध्या कोविडमुळे आपण पर्यटन करत नाहीयोत पण एरवी कुठल्याही कार्यक्रमात किंवा पर्यटनाच्या जागेवर जो तो क्षण अनुभवण्यापेक्षा सेल्फी काढण्यात दंगून गेलेले अनेक जण आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो.

सेल्फिचा खेळच मोठा रंजक असतो आणि तो संपूर्णपणे स्तुतीपाठकांवर अवलंबून असतो. म्हणजे कौतुकाच्या वर्षावावर. सहज निरीक्षण करा, सोशल मिडीयावर आपण जेवढ्या म्हणून पोस्ट्स करतो त्यातल्या सेल्फी आणि इतर फोटोच्या पोस्टला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात.

काय आहे सेल्फी मागची मानसिकता? हल्ली तर सेल्फिचा इतका अतिरेक झाला आहे की जिवाचीही पर्वा उरलेली नाही. खवळलेल्या समुद्राच्या back ड्रोपवर, दरीत, भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वे सोबत आणि अजून कशा कशा थ्रिलिंग एडव्हेनचरच्या नादात सेल्फी काढता काढता प्राण गमावलेल्यांची संख्या काही कमी नाही. आपण किती भारी आहोत, ‘हिरो’ आहोत हे जगाला दाखवण्याच्या नादात जीव गेल्यानंतरही शुध्द येऊ नये यावरूनच सेल्फी हा प्रकार किती नशा आणणारा आणि आत्मस्तुतीची चटक लावणारा आहे हे लक्षात येतं. काही विशेष कारणासाठी काढलेले, किंवा कधीतरी मूड झाला म्हणून काढलेले सेल्फी वेगळे पण येता जाता, प्रत्येक क्षणी, रोजच्या आयुष्यातल्या घडामोडी जगाला दाखवण्यासाठी सतत सेल्फी काढणं निराळं हे समजून घेतलं पाहिजे.

यातही काही ट्रेंड्स बघायला मिळतात. सतत आपल्या लव्ह लाईफचे, कुठकुठल्या भारी डेस्टिनेशनला दिलेल्या भेटींचे, बनवलेल्या ‘हटके’ पदार्थांबरोबरचे सेल्फी टाकणार्यांची संख्या प्रचंड आहे. आणि त्यांच्यात चढाओढ जबरदस्त आहे.या साऱ्या सेल्फीच्या खेळाला फोटोशोपपासून निरनिरळ्या appsची मदत मिळतेच, त्यामुळे फोटो देखणेच दिसतात आणि लाईक्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियात पोस्ट होणारा प्रत्येक फोटो सुंदर असतो, आकर्षक आणि हटके असतो. त्यामुळे अर्थातच त्यांना लाईक्स भरपूर मिळतात. जितके जास्त लाईक्स तितकी पुन्हा पुन्हा सेल्फी टाकण्याची ओढ अधिक. अतिरेकी सेल्फी टाकणे हे व्यसन आहे की नाही याबाबत दोन विचारधारा आहेत. एक गट म्हणतो सेल्फी हे व्यसन आहे. कारण ते पुन्हा पुन्हा करावसं वाटत आणि सेल्फी टाकणारा स्वतःला त्यापासून रोखू शकत नाही. शिवाय सेल्फी टाकल्यानंतर त्या व्यक्तीला छान वाटल्याचा भास होतो. तर दुसरा गट म्हणतो हे व्यसन नाही तर हा एक आजार आहे. ज्याचं नाव, बॉडी डीस्मोर्फिक डीसोरडर किंवा बीडीडी. ज्यांना स्वतःच्या शरीराबद्दल पुरेसा आदर नसतो, ज्यांना असं वाटत आपण सुंदर नाही, आकर्षक नाही, किंवा ज्यांना असं वाटतं की आपण खूप सुंदर आहोत, आकर्षक आहोत, आपल्या लुक्सचं कौतुक सतत झालंच पाहिजे, आपले सौंदर्य टिकून आहे की नाही याबद्दल जे अति संवेदनशील आहेत असे लोक सतत स्वतःला तपासून बघत असतात. पूर्वीच्या काळी अशा स्वरूपाचा आजार असलेले लोक स्वतःला हजारदा आरशात बघत होते आज हातात सुपर एफिशियंट कॅमेरा आल्यामुळे धडाधड फोटो काढून त्यावर इतरांकडून आपण चांगले दिसतोय, आपण कुल आहोत, आपण हॉट आणि सेक्सी आहोत, आपण हटके आहोत याची पावती घेण्याची धडपड सुरु असते. यातली अजून एक गोम अशी की फोटो दुरुस्त करणारे apps उपलब्ध असल्याने सेल्फी योग्य अँगलमध्ये काढण्यात तासंतास तर जातातच पण काढलेले फोटो दुरुस्त करण्यातही पुष्कळ वेळ जातो. चेहऱ्यावरचे डाग, काळेपणा, डोळ्यांची चमक, योग्य प्रकाश योजना अशा अनेक युक्त्या करून फोटो ‘पर्फेक्ट’ करण्याची धडपड चालू राहते. या सगळ्याला सोशल मिडीयात आभासीच पण सकारात्मक प्रतिसाद मिळत राहिल्याने सेल्फिची इच्छा वाढतच राहते आणि आपल्यातले अनेक जण यात गुंतून पडतात. यातून ‘अटेन्शन सीकिंग’ म्हणजे लक्ष वेधून घेण्याची मानसिकता विकसित होते आणि सेल्फी अशा मानसिकतेला खतपाणी घालतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. सोशल मिडीयावर चटकन अटेन्शन मिळत असल्याने केंद्रस्थानी असल्याच्या भावनिक पूर्तीसाठी सोशल मिडिया वर अवलंबून राहण्याला सुरुवात होते. त्यातून आत्मविश्वास वाढण्याएवजी कमी कमी होत जातो हे मात्र कुणीच लक्षात घेत नाही. एखाद्यावेळी सेल्फिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर स्वप्रतीमेला तडे जातात आणि सेल्फी टाकणारी व्यक्ती अजूनच निराशेत जाण्याची शक्यता असते.

आपण चांगले, वाईट, सुंदर कुरूप कसे दिसतो याची पावती मिळवण्याची धडपड, सेल्फिच्या मागे लागलेल्याला एका विचित्र कोषात घेऊन जाऊ शकते.

सो, बी अवेअर !! कधीतरी सेल्फी काढणं आणि सेल्फी काढला नाही आणि तो सोशल मीडियावर टाकला नाहीत तर अस्वस्थता येणं यातला फरक समजून घ्या. सेल्फीच्या मोहात अडकून पडू नका.


मुक्ता चैतन्य

14 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922