Search

महिलांवरील हिंसाचार- लोकल ते ग्लोबल


कुठल्याही घरात काहीही अनुचित घडले किंवा जगभरात कुठेही काहीही अनुचित प्रकार घडले तरी त्याची अंतिम किंमत ही स्त्रियांनाच द्यावी लागते हे आता पटू लागले आहे. तसे समाज आता स्वीकारताना दिसतो आहे. सावित्रीबाई फुले यांनी भारतातील स्त्री वादी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. १९७५ मध्ये भारतातील स्त्रीवादी चळवळीने स्पष्ट जाणवेल असा आकार घेतला. स्त्रियांवर होणारे अत्याचार हा त्यांचा घरगुती प्रश्न नसून इथे समाजात असलेल्या स्त्री पुरुष विषमतेमुळे तो निर्माण झाला आहे हे आता सर्वार्थाने स्पष्ट झाले आहे. १९७५ ते २०१५ ह्या चाळीस वर्षात अनेक संशोधनात्मक अभ्यास आणि आंदोलनांनी हे स्पष्ट केले आहे. कुठल्याही घरात काहीही संकट आले मग त्या घरातल्या पुरुषाची नोकरी गेली, घरातल्या पुरुषाला व्यसन असले किंवा ते घर काहीही कारणाने स्थलांतरीत झाले तरी त्यामुळे निर्माण होणारा परिणाम सर्वात जास्त त्या घरातल्या स्त्रियांना अनुभवावा लागतो. हे झाले एखाद्या घरातले चित्र पण देशात जातीय दंगली झाल्या, धार्मिक दंगली झाल्या, सुका किंवा ओला दुष्काळ पडला किंवा दोन देशात युद्ध झाले तरी त्याची किम्मत स्त्रियांनाचा द्यावी लागते कारण जो समूह अधिक असंघटीत, अशिक्षित, साधनं विरहीत असतो त्याला कुठल्याही संकटाचा परिणाम भोगावा लागतो.

तुम्हांला हे सर्व सांगण्याचे कारण असे कि,नाशिकला नुकतीच तिसरी महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती परिषद झाली. मासूम आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या प्रयत्नाने २०१५ साली पहिली परिषद पुण्यात झाली. त्यानंतरची दुसरी परिषद मुंबई ला झाली, जिच्या आयोजनात महिला आणि मुलांकरिता सहाय्य कक्ष, अक्षरा, सेहत, स्नेहा, आम्ही आमच्या आरोग्यासाठी ह्या महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संस्था संघटनाही जोडल्या गेल्या. ह्यावर्षीच्या तिसऱ्या परिषदेत चाळीसगाव येथे काम करणारी साद संवाद फौंडेशन आणि नाशिकची संगिनी महिला जागृती मंडळ ह्या संस्थाही जोडल्या गेल्या. संविधानावर विश्वास असणाऱ्या, कुठल्याही प्रकारची हिंसा ही वाईटच, सर्व धर्मातील स्त्रियांना भारताच्या नागरिक म्हणून समान हक्क असले पाहिजे असे मानणाऱ्या संस्था संघटना ह्या या परिषदेच्या आयोजनात जोडल्या जातात.

महिला आणि मुलं यांचे साठी काम करणाऱ्या संस्था संघटनाना आपापले काम या निमित्ताने समाजा समोर मांडण्याची संधी या निमित्ताने निर्माण केली जाते. अनेक वर्ष सातत्त्याने काम करीत असतांना आपल्याच कामाकडे संशोधनात्मक नजरेने पाहण्याची, ते काम काही कसोट्यांवर तपासून स्वतःच्याच कामाचे विश्लेषण सत्रांमधून मांडले जाते. अशा ७५ संस्था संघटनांनी मिळून एकूण पन्नास पेपर्स ह्या परिषदेत मांडले गेले. यात विविध समूहातील स्त्रियांची स्थिती मांडण्यात आली. ज्यात मार्केट यार्डातील महिला, मासेमारी करणाऱ्या महिला, घरेलू कामगार स्त्रिया, वेश्या व्यवसायातील स्त्रिया, पारधी स्त्रिया,आदिवासी स्त्रिया, आश्रमशाळेतील मुली, विशेष गरजा असलेल्या मुलांच्या आयांची स्थिती, कचरा वेचक महिला, शासकिय अल्पमुदतीच्या निवास स्थानात रहाणाऱ्या स्त्रिया, जुनाट प्रथांमुळे जीव गमावणाऱ्या बंजारा समूहातील मुली, जात पंचायतीमुळे अडचणीत येणाऱ्या भटक्या समूहातील स्त्रिया इ. समूहातील स्त्रियांची स्थिती आज काय आहे? या स्थितीला जबाबदार घटक कोण? आणि या स्थितीतून तो समूह बाहेर पडेल यासाठी काय काय उपाय संस्था, संघटना, समाज, शासन करू शकतात यावर मांडणी करण्यात आली. विविध सत्रांमध्ये या विषयांच्या अभ्यास मांडण्या मांडण्यात आल्या. प्रत्येक सत्रात त्या त्या विषयातील तज्ञ जाणकार कार्यकर्ती ने किंवा कार्यकर्त्याने अध्यक्ष पदावरून त्या विषयाचे मार्गदर्शन केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी मांडणी केली.

स्त्रियांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांवर ह्या परिषदेत चर्चा झाली, मांडणी करण्यात आली. यात पुनर्वसन करण्याच्या नावावर वेश्या व्यवसायात असलेल्या महिलांना पोलिस, शासन आणि विविध प्रकारच्या सीएसआर प्रकल्पाच्या नावाखाली त्यांचे अजेंडे पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या संस्था संघटना कडून कसे वेठीस धरले जाते; अर्धवट नियोजन, साधनांची अपूर्तता आणि ढिसाळ नियोजन यामुळे ह्या महिलांचे पुनर्वसन तर सोडाच पण त्या कशा अधिक शोषणात अडकतात याची मांडणी ह्याच क्षेत्रात गेली दहा ते पंधरा वर्षे काम करणाऱ्या ‘संग्राम आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ यांनी केली. याशिवाय जळगाव च्या दिलासा संस्थेने कुटुंबातील पुरुषांच्या ‘व्यसनाधीनते’ चा स्त्रियांच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्यावरील ते स्वतः करीत असेलेले उपाय ही मांडले. मासिक पाळी सारख्या अत्यावश्यक, अविभाज्य शारीरिक बदलांसाठी शाळा,कुटुंब आणि समाजही प्रगल्भ नसल्यामुळे त्या त्या वयात मुलींना अनेक प्रकारच्या शरीरिक,मानसिक आणि लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागते असा अभ्यास वर्क फॉर एक्वालीटी, पुणे आणि गडचिरोलीच्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थांनी मांडला. अनेक शाळांमधून काही कल्याणकारी काम करणाऱ्या संस्था मासिक पाळी ह्या विषयावर फक्त मुलींची सत्र तर घेतात पण अशा सत्रात कपड्यांपेक्षा पॅड कसे चांगले, आमच्या कडचे पॅड कसे इतरांपेक्षा स्वस्त आहेत एवढ्यावरच माहिती येऊन थांबते. मासिक पाळी आणि स्त्रियांच्या अधिकारांचे उल्लंघन आणि त्याला धरुन असलेल्या अंधश्रद्धा यावर हवी तेवढी चर्चा होत नाही. अशी चर्चा होण्यासाठी नाशिकच्या संगिनी संस्थेने मुलींसोबत मुलांना ही ह्या विषयात अवगत करण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या सत्रांचे त्यांचे अनुभव परिषदेत मांडले. कौटुंबिक हिंसाचारामुळे स्त्रियांवर होणाऱ्या परिणामांची, त्यामुळे स्त्रियांचे नागरिक म्हणून कसे हक्कांचे उल्लंघन होते, पुरुष नेमके का हिंसाचार करतात? त्याचा त्यांच्या स्वतःवर काय परिणाम होतो आणि त्याचा त्या कुटुंबातल्या मुलांवर काय परिणाम होतात याची मांडणी करण्यात आली. शासकिय यंत्रणेच्या असंवेदनशीलतेमुळे, अज्ञानामुळे, पुरुषी मानसिकतेमुळे गरजू समूहांवर कसे विपरीत परिणाम होतात याचा अभ्यास मांडण्यात आले. यात मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीचे वाजलेले बारा; लैंगिक अत्याचाराच्या केसेसच्या निकालांचे विश्लेषण यावर ह्या परिषदेत विचार विनिमय करण्यात आला. यासोबतच बीड मधील गर्भाशय शस्त्रक्रियेची समस्या,लैंगिक पिडीत महिलांना व मुलींना गर्भपाताच्या सुविधा न मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या; अल्पवयातील लग्नांमुळे होणारे आजार विशेषत: टीबी; धार्मिक अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक आजार; वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या;मायक्रोफायनान्सच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांचे प्रश्न इत्यादी समस्यांवर सद्य स्थिती आणि त्यावरील उपाय यावर चर्चा करण्यात आली.

फक्त समस्या मांडून प्रश्न अर्धवट सोडायचा नाही ही ह्या परिषदेच्या आयोजकांची भूमिका असल्यामुळे जसे प्रश्न मांडले गेले तसे उपायांवर ही सविस्तर चर्चा, अभ्यास मांडण्यात आले. ज्या समूहांवर हिंसा होते त्यांचे बरोबर मुक्ती संदर्भात आधी काम केले गेले. कामाच्या दीर्घ अनुभवानंतर असे लक्षात आले कि समाजाच्या ज्या समूहांकडून हिंसा घडते मग ते पुरुष असो कि उच्च वर्णीय समूह त्यांचे सोबतही काम करणे आवश्यक आहे. असे मुलांसोबत, युवांसोबत किंवा पुरुषांसोबत काम करण्याचे ज्या ज्या ठिकाणी प्रयोग झाले त्याचा उपयोग इतरानाही कामात व्हावा यासाठी सविस्तर मांडणी करण्यात आली. त्यात स्नेहा संस्थेचा वस्तीतल्या महिलांचा आणि पुरुषांचा महिलांवरील हिंसाचार थांबवण्याच्या कामासाठी निर्माण केलेला प्रशिक्षित समूह प्रयोग, संगिनीचे नाशिक मधील काम, आंबेजोगाई येथील मानवलोकचे पुरुषां सोबत सुरु असलेले काम, नाशिकच्या अभिव्यक्ती च्या शोधिनी आणि शोधक कामाचा अनुभव, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या साथीदारांचा अनुभव मांडून त्यावर विचार विनिमय करण्यात आला. आर्थिक सक्षमीकरण हे स्त्रियांना हिंसाचारातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडते हा प्रत्यक्ष करून पाहिलेला, अनुभवलेला अभ्यास मासुमच्या टीमने मांडला. उपायांवर बोलत असतानाचं समस्यांचे आताचे स्वरुप नेमके कसे आहे, यासाठी महिला हक्क संरक्षण समिति, जळगाव जिल्हा महिला असोसिएशन यांच्या कामाचा अभ्यास मांडून महिलांवरील हिंसाचाराचे ट्रेंड समजून घेण्यात आले. त्याबरोबरच चार राज्यातील मोठ्या शहरांमधून आजचा आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेला युवा, विचाराने कसा अजूनही पुरुषी मानसिकतेत अडकलेला आहे असा निष्कर्ष सांगणारा अभ्यास मुंबई येथील अक्षरा संस्थेने मांडला. म्हणूनच महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुरुषां बरोबर काम करणे आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

१९ डिसेंबरला सुरु झालेली परिषद २१ डिसेंबर ला संपली. अडीच दिवसाच्या या परिषदेत जास्तीत जास्त अभ्यास समजावून घेण्यासाठी,जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्यांचे अनुभव, अभ्यास मांडता यावेत यासाठी समांतर सत्र घेण्यात आले. याव्यतिरिक्त काही विषय सर्वांनी एकत्र बसून समजावून घेण्यासाठी खास सत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अशा या सर्वांसाठीच्या खुल्या सत्रात दुर्लक्षित समूहातील स्त्रियांवरील हिंसा यात विविध लैंगिक ओळख असलेल्या समूहांचे प्रश्न शामिभा पाटील यांनी मांडले,वेश्या व्यवसायातील महिलांचे प्रश्न संग्रामच्या रेखा काळे यांनी मांडले. भटके विमुक्त समूहातील स्त्रियांचे प्रश्न वैशाली भांडवलकर यांनी मांडले. आदिवासी स्त्रियांचे प्रश्न त्यांच्याच भिलारी भाषेत ठगीबाई बर्डे यांनी मांडले तर कौटुंबिक हिंसाचार ग्रस्त महिलांचे प्रश्न मुंबईच्या शोभा कोकितकर यांनी मांडले. दुसऱ्या खुल्या सत्रात ‘कायदे खरच स्त्रियांच्या बाजूचे आहेत का?’ यावर अनुभवांची,कोर्टातल्या निकालांच्या विश्लेषणाची मांडणी करण्यात आली. यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो), कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक प्रतिबंधक कायदा यावर विचार विमर्श करण्यात आला. यावर अनुक्रमे अॅड उज्ज्वला कद्रेकर, कविता निकम आणि प्रीती करमरकर यांनी मांडणी केली तर स्त्री वादी चळवळीच्या नेत्या अॅड. निशा शिऊरकर यांनी त्यांच्या अनुभवांची मांडणी केली. सर्व कायदे स्त्रियांच्याच बाजूचे आहेत ज्याचा गैरवापर करतांना स्त्रिया दिसतात अशी सतत समाजात ओरड असते प्रत्यक्षात मात्र परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. आपल्या देशात पीसीपीएनडीटी (गर्भजल लिंग निदान तपासणी विरोधी कायदा) कायदा येण्यापूर्वी एमटीपी अॅक्ट (गर्भपात सुविधा कायदा) अस्तित्वात होता. पण समाजात एकूणच स्त्रियांना दुय्यम स्थान असल्यामुळे जिवंत महिले पेक्षा पोटातल्या गर्भाला मानवी चेहरा देवून स्त्रियांचे अस्तित्व मात्र नाकारले जाते. जे लोक गर्भजल लिंग परीक्षा करतात पण मुलाचा गर्भ असल्यामुळे गर्भ समापन करीत नाहीत त्यांना कुठलीही शिक्षा होत नाही. गर्भजल लिंग परीक्षा विरोधी कायद्याचे नावाखाली गरजू स्त्रियांना मात्र गर्भसमापन (गर्भपात) सुविधा नाकारली जाते. स्त्रियां संदर्भातील सर्वच कायद्यांचा हा अनुभव आहे कि कायदा बनवताना खूपच सखोल विचार केलेला असतो पण राबविणाऱ्या यंत्रणेला कायद्याची पार्श्वभूमी, त्यामागचा इतिहास याची पूर्ण जाणीव नसते आणि कायदा राबविताना राबविणाऱ्याची पितृसत्ताक मानसिकता असल्यामुळे सर्वच कायद्यांची मदत स्त्रियांना होतांना दिसत नाही असे प्रतिपादन निशाताई यांनी अध्यक्ष पदावरून केले.

दुसऱ्या खुल्या सत्रात ‘प्रसार माध्यम, समाज माध्यम आणि स्त्रिया’ ह्या विषयावर दिव्या मराठीच्या दीप्ती राऊत आणि समाज माध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी मांडणी केली. तिसऱ्या खुल्या सत्रात डॉ. रमेश अवस्थी यांनी ३७० कलम रद्द होण्याने, एनआरसी मुळे आणि नागरिकत्व कायद्यातील सुधारणांमुळे नेमका स्त्रियांवर काय परिणाम होणार आहे याची मांडणी केली. लग्न होऊन जाणार म्हणून माहेरचे मुलीच्या नावावर कुठलाही पुरावा तयार करीत नाहीत आणि सासरी ती बाहेरून आली आहे म्हणून काहीही पुरावा नसतो अशा स्त्रियांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी होणार आहे. आपल्या देशात स्त्रिया मतदार तर आहेत पण त्यांची सर्व ठिकाणी दखल न घेतल्यामुळे त्यांचे राजकारणातले उपद्रव मूल्य हे आरक्षित जागांवरच्या उमेदवार एवढेच होतांना दिसते आहे. स्त्रियांची दखल राजकारणात अजूनही घेतली जात नाही हे आताच्या निकालां वरून दिसते अशी मांडणी जनवादी महिला सभेच्या किरण मोघे यांनी याच सत्रात केली.

लोकांची दु:ख ऐकून अभ्यासकांनी आत्ता पर्यंत मांडली त्यामुळे ज्यांचे दु:ख आहे त्या समूहातून हवे तसे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही. ते नेतृत्व निर्माण व्हाव यासाठी दर दोन वर्षाच्या अंतराने ही महिला हिंसामुक्ती परिषद आयोजित केली जाते. जसे पुस्तकी अभ्यासक फक्त मांडणीला नको तसे संस्था किंवा संघटनेचे प्रमुख ही मांडणीला नको अशी ठाम भूमिका घेवून ही परिषद पुढे पुढे जात आहे. ह्या स्पष्ट भूमिकेमुळे संस्था संघटनामध्ये पुढचे नेतृत्व निर्माण व्हायला मदत झाली. महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून प्रतिनिधी येत असल्यामुळे राज्यात स्त्रियांचे प्रश्न मध्यवर्ती ठेवून नेमके काय घडते आहे याचा आढावा त्यानिमित्ताने घेतला जातो. मांडणी करणाऱ्यांनी अंदाज पंचे बोलू नये, ऐकिवात माहितीवर बोलू नये आणि वर्षोनुवर्ष तेच तेच बोलले जावू नये यासाठी या परिषदेत मांडणी करणाऱ्यांना संशोधनात्मक अभ्यास असल्याशिवाय, त्याच विषयात मांडणी करणाऱ्यांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असल्याशिवाय संधीच मिळत नाही. त्यासाठी ज्या विषयावर मांडणी करायची आहे, ज्या समूहाचा अभ्यास मांडणी करायची आहे त्या संदर्भातील एक टिपण आयोजन समितीने नेमलेल्या समितीकडे आधी दिल्याशिवाय मांडणी करण्याची संधी उपलब्ध नसते. कुठल्याही प्रकारचे अनुदान ही परिषद घेत नाही. सहभागी संस्था व्यक्ती यांची नोंदणी फी, सहभाग मूल्य आणि याच वैचारिकतेला मानणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्या आर्थिक सहकार्यातून ही परिषद घडवली जाते. नाशिकच्या परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या सावित्री बाई फुले अध्यासनाने राहण्याचा आणि परिषदेसाठी लागणाऱ्या सभागृहाची जबाबदारी घेवून आयोजनाचा बराच खर्च उचलला होता.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी ‘शिल्पा बल्लाळ’ यांनी नर्मदा बचाओ आंदोलनच्या सदतीस वर्षाच्या प्रवासावर बनवलेला ‘लकीर के इस तरफ’ ह्या फिल्मची मांडणी झाली. विकासाच्या नावाखाली पुनर्वसनाची वाट लावत समूहच्या समूह देशोधडीला लावणाऱ्या धोरणांचा परिणाम अनुभवण्याची संधी सहभागींना मिळाली. ह्या फिल्मच्या निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांचे बरोबर संवाद करुन हा सर्व फिल्म बनवण्याचा प्रवास समजावून घेता आला.

आशियाई देशात स्त्री वादी चळवळीत आपल्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या कमला भसीन यांना उद्घाटना साठी आमंत्रित करण्यात येऊन परिषदेच्या संकल्पनेतील ‘ग्लोबल’ भाव आणि विचारांची मांडणी करण्यात आली. कमला भसीन यांनी सद्या आशियाई देशांमध्ये स्त्रियांवरील हिंसाचार या विषयात काय स्थिती आहे याची मांडणी केली आणि हा हिंसाचार थांबवायचा असेल तर आपण फक्त बोलणार नाही तर रोजच्या आयुष्यात सर्व ठिकाणी सर्व प्रकारची समानता निर्माण करण्यासाठी कृती करू असे मांडले. त्यासाठी त्यांनी ‘बेटी दिल में, बेटी विल में’, आपल्या घरात छुपी विषमता तर नाही ना हे शोधण्यासाठी सतत जागरूक राहिले पाहिजे, आपल्या वागण्या बोलण्याचे विश्लेषण करीत राहिले पाहिजे आणि जिथे जिथे विषमता दिसेल ती तत्काळ दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांनी अगदी सोप्या सोप्या उदाहरणांमधून मांडले. परिषदेचा इतिहास आणि प्रास्ताविक जया नलगे यांनी केले तर ‘महिला हिंसाचार- लोकल ते ग्लोबल’ यातील ‘लोकल’ची मांडणी महिला हक्क संरक्षण समितीच्या सुरैय्या शेख यांनी केली. सत्राचे संचलन वैशाली निकम यांनी केले.

कमला भसीन एक प्रसिद्ध लेखिका आहेत, प्रशिक्षक आहेत त्या बरोबरच आशियाई देशातील लोक गीतांचा अभ्यास करुन त्यावर परिवर्तनाची गाणी रचून, तशीच लोकगीतांच्या चाली लावून जनमानसात ती गाणी रुजवण्याचा, रुळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गीताला नुसता अर्थच नाही तर काही ना काही रंजक इतिहासही आहे. तो इतिहास समजावून घेण्यासाठी, गाण्याचे किंवा एकूणच सांस्कृतिक अभिव्यक्तीचे परिवर्तनाच्या चळवळीतील महत्व समजावून घेण्यासाठी कमला भसीन यांची गाणी तसेच चळवळीत नेहमी गायली जाणारी गाणी सादर करण्यासाठीचे एक स्वतंत्र सत्र ह्या परिषदेत घेतले गेले आणि सहभागीनी ह्या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

परिषदेचे उद्घाटन जसे जोशात झाले तसेच समारोप ही जोशात झाला. समारोपा साठी तृष्णा, आदोर सारख्या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका, आदिवासी चळवळीच्या नेत्या कॉ. नजूबाई गावित यांनी आपले चळवळीचे अनुभव मांडले. स्त्रियांनी आपली वैयक्तिक दु:ख कवटाळून बसू नये तर त्याचे सार्वजनिकिकरण करुन समूहाने त्यावर व्यवस्था परिवर्तनाचे उपाय शोधले पाहिजे हे पटवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचा आणि अनुभवांचा पट मांडला. शेवटी सद्या सुरु असलेल्या नागरिकत्वाच्या प्रश्नावर स्त्रिया म्हणून आमचे कुठलेही पुरावे आमच्या कडे नाही याचा जब विचारण्याचा ठराव समारोप सत्रात केला गेला. शेवटी ज्यांच्या पुढाकाराने आणि वैचारिक घुसळणीतून ह्या परिषदेचा जन्म झाला त्या डॉ. मनीषाताई गुप्ते यांनी ‘परिषद झाली, पुढे काय?’ याचा विचार,भूमिका आणि कृती कार्यक्रम याची मांडणी केली. परिषदेच्या रिवाजाप्रमाणे पुढील परिषदेसाठी ‘मानवलोक’संस्थेने निमंत्रण दिले आणि अडीच दिवस सतत एकमेकींच्यात घुसळण करणारी, विचार विनिमय करणारी परिषद पुढील कामाच्या साठी उर्जा घेऊन संपली.

परिषदेत सहभागी झालेल्यांना महाराष्ट्रात स्त्री वादी चळवळीत नेमके काय चालले आहे याचे भान यायला मदत झाली. सतत हिंसाचारा बरोबर काम केल्यामुळे येणारी मरगळ झटकून ह्या विषयात आपण एकटे नाही तर आपला एक प्रवाह आहे याची ताकद, उर्जा घेवून पुन्हा नव्या दमाने कामाला जुंपण्याची ताकद ह्या परिषदेने दिली. आपण कामात करीत असलेले नवनवीन प्रयोग सांगणे आणि इतरांचे प्रयोग समजावून घेऊन आपल्या कामात ते कसे उतरवायचे याची देवाणघेवाण यानिमित्ताने झाली. इतर जिल्ह्यात कोण कुठल्या विषयात काम करते याची माहिती मिळाल्यामुळे त्या त्या जिल्ह्यात आपल्याला मदत करायला लोक आहे याची माहिती आणि आधार त्यानिमित्ताने मिळाला. महाराष्ट्र भरातून २५० कार्यकर्ते यापरिषदेत सहभागी झाले होते. मासूम-पुणे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी- गडचिरोली,स्त्री मुक्ती संघटना- महाराष्ट्र, अक्षरा- मुंबई, स्नेहा- मुंबई, सेहत- मुंबई, महिला आणि मुलांकरिता सहाय्य कक्ष- महाराष्ट्र, संगिनी महिला जागृती मंडळ- नाशिक, साद संवाद फौंडेशन- चाळीसगाव आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले अध्यासन ह्या परिषदेच्या मुख्य संयोजक संस्था होत्या तर नाशिक मधील महिला हक्क संरक्षण समिति, मराठा विद्या प्रसारक समाजाचे समाजकार्य महाविध्यालय, युवा अनुभव शिक्षा केंद्र, प्रवरा मेडिकल ट्रस्ट,प्रबिधिनी ट्रस्ट यांनी स्थानिक आयोजनाची जबाबदारी पेलली तर स्थानिक आयोजकां पैकी असलेली अभिव्यक्ती मिडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेने संपूर्ण परिषदेच्या फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगचे काम केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन,अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी उद्घाटन आणि समारोप दोन्ही सत्रात उपस्थित राहून शुभेच्छा तर दिल्याच शिवाय विद्यापीठ महिलांसाठी काय करु शकते याची मांडणी केली तसेच ह्या परिषदेमध्ये जे जे पेपर्स मांडले त्याचे पुस्तक करण्याचा परिषदेच्या प्रस्तावाला मान्यताही दिली.

3 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922