Search

मेंदूलाच मोह पडतो तेव्हा !!

कुठल्याही सोशल मीडियावर माणसं का जातात? त्याला अनेक कारण असली तरीही सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्यांना इतर लोकांशी कनेक्ट व्हायचं असतं आणि ऍप्रिसिएशनची अपेक्षा असते. कौतुक कुणाला आवडत नाही? आणि सोशल मीडियावर तर ते सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. हाच ट्रिगर असतो ज्यासाठी सगळ्या वयोगटातले लोक पुन्हा पुन्हा सोशल मीडियावर जातात.

याखेरीज आपल्याला कुणाचं तरी पेज बघायचं असतं, काहीतरी आवडीचं फॉलो करायचं असतं, कुठे काही गॉसिप सुरु आहे का याचाही शोध घ्यायचा असतो पण अनेकदा सोशल मीडियावर गेलं की वेगवेगळ्या गोष्टीच दिसायला लागतात. त्यात हळूहळू वेळ जायला सुरुवात होते. कुणी कुणाचे शेअर केलेले व्हिडीओ बघण्यात वेळ जातो. कुणीतरी मित्र मैत्रिणीने प्रोफाईल पिक बदललेलं असतं, कुणी कुठल्याशा ट्रीपचे फोटो टाकलेले असतात, कुणी कविता पोस्ट केलेली असते, कुणी दुसऱ्याची स्वतःच्या नावावर टाकलेली असते, कुणाचे जबरदस्त फोटो, कुणाचे वाढदिवस, लग्नाचे फोटो...मध्येच एखादी चर्चा चालू असते त्यात कुणीतरी आपल्याला टॅग केलेलं असतं...मग ते सगळं बघणं आलं, लाईक, वॉव करणं आलं...हे सगळं करता करता आपण सोशल मीडियावर येऊन वेळ का देतोय हेच विसरायला होतं. असंख्य लाईक्स आणि थम्स अपच्या गदारोळात आपण हरवून जातो आणि घड्याळाचा काटा झपाझप पुढे सरकत राहतो.

त्यातून आपण वरचेवर सोशल मीडियावर गेलो नाही तर आउट डेटेड होऊ अशी एक वेगळीच भीती मनात असते आणि या भीतीपोटी आपण नकळत सोशल मीडियाच्या आभासी जगात फिरत राहतो. आपण असे वागतो हा काही अपघात नाही, किंवा आपल्यापैकी प्रत्येकाला सोशल मीडियाचं व्यसन लागलंय असंही नाही. मग ही सगळी काय भानगड आहे. करायचं असतं एक करत राहतो भलतंच काहीतरी, हे कशामुळे होतं ?

समजून घेऊया. या सगळ्याचा थेट संबंध मेंदूतल्या एका केंद्राशी आणि रसायनाशी आहे. आपल्या मेंदूमध्ये एक रिवार्ड सेंटर असतं, म्हणजे मोबदला किंवा बक्षीस देणारं केंद्र. त्याचं नाव न्युक्लीयस अकम्बन्स. मेंदूच्या या केंद्रातून मोबदला देणाऱ्या भावना निर्माण होत असतात. म्हणजे आपण उत्तम पदार्थ खाल्ला, आवडीच्या वस्तूची खरेदी केली, अनपेक्षित धनलाभ झाला, पगार वाढला की आपल्या जे मस्त वाटत ना, छान वाटतं, काहीतरी मिळवल्याचा आनंद होतो ते सगळं या केंद्रामुळे होतं. युसीएलए या संस्थेने केलेल्या संशोधनात लाईक्सचा संबंध थेट या केंद्राशी आहे असं दिसून आलेलं आहे. शास्त्रज्ञाच्या मते, अन्न, मैथुन, पैसा, सामाजिक स्थान या सगळ्यातून मिळणारा आनंद या केंद्राशी निगडीत असतो. सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आपल्या मेंदूतल्या या केंद्राला उद्दीपित करतात आणि मग हे छान वाटणं सतत मिळत राहावं अशी मागणी या केंद्राची सुरु होते आणि आपणही ते सुख मिळवण्यासाठी धडपडायला लागतो.

एकेका लाईक ने वाढत जाणार्या सुखाचा मोह पडतो आपल्याला. या लाईक्सच्या मोहजाळात आपण कधी अडकतो कळतच नाही. अजून सुख, अजून मोह, अजून आनंद अशा भ्रामक चक्रात आपण फिरत राहतो. यातलं काहीही चुकून घडत नाही. ही सगळी आपल्या मेंदूची कारणी आहे.

फेसबुक म्हणत, “Like” is a way to give positive feedback or to connect with things you care about on Facebook. You can like content that your friends post to give them feedback or like a Page that you want to connect with on Facebook.

आता मला सांगा आपण खरंच किती वेळा आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणून लाईक करतो?

करतोही..पण बरेचदा, समोरच्याने आपल्याला लाईक केलेलं असतं, रिलेशन मेन्टेन करायची असतात, भविष्यातली रिलेशन तयार होण्याच्या शक्यता असतात, व्यावसायिक गरज असते, व्यावसायिक कंपल्शन असतं, लाईक केल्याने कुणाचेच काहीच नुकसान नसते म्हणून आपण लाईक करतो आणि लोक आपल्याला लाईक करतात. लाईक कारण सोपं आहे, शब्दांशिवाय आहे, आणि कुठेही बसल्या बसल्या हातातल्या स्मार्टफोन वरून करता येण्यासारखं आहे. म्हणूनच, कुठल्याही डीपी अपडेटला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात. सोशल मीडिया लक्ष वेधून घेण्याचं, भावनिक आधार मिळवण्याचं, सामाजिक मान्यता मिळवण्याचं माध्यम म्हणूनही कळत नकळत वापरलं जातं.

हा सगळा खेळ जोवर आटोक्यात असतो तोवर ठीक आहे पण एकदा याची चटक लागली की मग चढाओढ सुरु होते. आधी कोण लाईक करणार? इतर मित्र मैत्रिणींच्या स्क्रीन टाइम झटझट वाढत जातो. आपण एखादी पोस्ट केली आणि त्याला लगेच लाईक मिळाले की आपल्याला बरं वाटतं. आपला मेंदू खूश होतो. त्याची खूश होण्याची मागणी वाढायला लागते, पण त्याचवेळी एखाद्या पोस्टला अपेक्षित लाईक्स मिळाले नाहीत की मात्र आपण अस्वस्थ होतो. आपल्याला चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागतं. लोकांना आपण आवडत नाही का, आपली पोस्ट आवडली नाही का असले प्रश्न मनाचा ताबा घेतात आणि मग सुरु होतो स्वप्रतीमेचा एक विचित्र खेळ. लोकांनी आपल्याला सतत चांगलं म्हणत राहावं यासाठी धडपड चालू होते. हे लोकांनी चांगलं म्हणणं बरेचदा दिसण्याशी, कपड्यांशी, फोटोशी आणि शेअर होणार्या गोष्टींशी असतं...पुन्हा तेच, आपण जे नाही, किंवा असायला हवं असं वाटतं ते जगाला दाखवण्याचा सारा खेळ. कधी उत्तान कपड्यातून, कधी सो कॉल्ड बौद्धिक चर्चांमधून आणि कधी स्वतःचे क्षणाक्षणाचे अपडेट्स देऊन.

तुमच्या बाबतीत घडतंय असं काही? चेक करा...


मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

18 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922