Search

मी, नातेसंबंध आणि सोशल मीडिया


सोशल मिडीयावर तुम्ही का जाता? तिथे गेल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तिथे जाऊन तुम्ही काय करता? हे प्रश्न कधी स्वतःला विचारले आहेत का?


नसतील तर ताबडतोब विचारा.


त्याबरोबर अजूनही काही महत्वाचे प्रश्न स्वतःला विचारा.


ऑनलाईन जगात वावरायला लागल्यापासून तुमच्या स्वभावात काही मुलभूत बदल झाले आहेत का? सोशल मिडियातल्या मित्र परिवारात तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणजे काय?


ज्या नातेवाईकांशी तुम्ही प्रत्यक्षात एखाद मिनिटही बोलत नव्हतात, किंवा तुम्हाला बोलायला आवडायचं नाही त्यांच्याशी आता चॅटिंग करता का?


त्यांच्याशी ऑनलाईन वाद घालता का? भांडणं करता का?


एरवी स्वतःच मत मांडण्याची तुम्हाला विशेष गरज वाटत नव्हती पण सोशल मीडियावर आल्यापासून तुम्हाला अचानक तुमची मत मांडावीशी वाटतायेत, मत मांडण्याची भीती काहीशी कमी झाली आहे?


आभासी जग आणि त्यातही सोशल मीडिया आपल्या वर्तणुकीत अनेक लहान मोठे बदल करत असतो. काही वेळा ते आपल्या लक्षात येतात, काही वेळा येत नाहीत.सोशल मिडिया, आपल्या सगळ्यांना आपल्या निरनिराळ्या अहं किंवा न्युनगंडातून बाहेर पडण्याची संधी देत असतो. तुम्ही कोण आहात? कसे आहात? तुमची मत, तुमचे विचार लोकांपर्यंत पोहचवा, कुणाचीही भीती न बाळगता व्यक्त व्हा असंच सोशल मिडिया सतत सांगत असतो. आणि आपण सगळेच ही संधी पुरेपूर वापरतो. अगदी १३/१४ वर्षांच्या मुलांपासून सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांपर्यंत सगळेच निरनिरळ्या कारणांसाठी सोशल मीडिया वापरतात. मित्र परिवाराशी कनेक्टड राहणं ही जरी त्यातली मूलभूत गरज असली तरी आता तेवढाच हेतू नसतो. ही माध्यमंही कालच्या सारखी आज नाहीयेत. त्याच्यासाठी निरनिराळ्या स्तरांवरचे बदल झालेले आहेत. त्यामुळे आपला व्यवसाय वृद्धींगत करायला, आपली इमेज तयार करायला, जगाशी दोस्ती करत करत जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी गोळा करायला, विचार मांडायला, दुसऱ्याच्या न पटलेल्या विचारांवर कडाडून टीका करायला, स्वतः खुश होत असताना दुसर्याला खुश करायला, ब्लॉगिंगपासून लाईव्ह शोजपर्यंत अनेक गोष्टींसाठी आपण आता सोशल मीडिया वापरतो.


पण म्हणून आपण सोशल झालोय का ?


की सोशल होण्याच्या नादात आत्मकेंद्री माणसांचीच अधिक गर्दी वाढलीये हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आभासी जगात बहिर्मुख आणि प्रत्यक्ष जगात अंतर्मुख आणि आत्मकेंद्री अशा माणसांचा एक प्रचंड समुदाय तयार होतोय का? आणि त्या चिरडून टाकणाऱ्या गर्दीत श्वास गुदमरू नये यासाठी जास्तीत जास्त वर डोकं काढून चालत राहण्याचा प्रयत्न आपण सगळे करतो आहोत? एकाच वेळी दोन आयुष्य जगताना धावपळ होतेय का? आभासी जगातून मिळणारे प्रोत्साहन, तिथले यश, कौतुक खऱ्या जगण्यातली गंमत हिरावून घेतेय का? आभासी जग रम्य आणि प्रत्यक्ष जग निरस वाटायला लागलं आहे का?


या प्रश्नांची उत्तर हो नाही मध्ये देता येणं कठीण आहे. शिवाय प्रत्येकासाठी त्याची उत्तरं वेगळी असू शकतात. पण तरीही विचार करून बघा.


जगभरात या विषयावर संशोधन आणि विचारांची देवाणघेवाण सुरु आहे. सोशल मिडीयामुळे माणसांच्या आयुष्यात खरंच काय बदल झाला आहे, माणसं अंतर्मुखी बनली आहेत की बहिर्मुखी? माणसं बहिर्मुखी बनत असतील तर नक्की कशी आणि का? खऱ्या जगात बहिर्मुखी असलेल्या माणसांचा सोशल मिडीयावर अधिक वावर आहे की अंतर्मुखी व्यक्तींचा? या दोन्ही प्रकारच्या माणसांमध्ये सर्वाधिक जास्त वावर कोणाचा आहे आणि का? असे कितीतरी प्रश्न मानसोपचारतज्ञ विचारात आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याची धडपड सुरु आहे.


डॉ. पैविका शेल्डन यांनी अलाबमा विद्यापिठात एक सर्वेक्षण केले होते. त्याचे निष्कर्ष त्यांनी जर्नल ऑफ सायकोलोजीकल रिसर्च ऑन सायबरस्पेस मध्ये प्रकाशित केले होते. त्यांच्या सर्वेक्षणा नुसार, बहिर्मुख व्यक्ती सोशल मिडियावर अधिक ऐक्टीव्ह दिसत असली तरी अंतर्मुख व्यक्ती प्रदीर्घ काळासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. अनेक संशोधक आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मते ‘ऑनलाइन बहिर्मुख आणि ऑफलाईन अंतर्मुख’ असणारी व्यक्ती अतिशय गुंतागुंतीच्या मानसिक जडणघडणीची असू शकते. पण त्याच बरोबर काहींच्या मते, ज्या लोकांना प्रत्यक्षात मुक्तपणे व्यक्त होता येत नाही ते लोक मुक्तपणे स्वतःला व्यक्त करण्यासाठी सोशल माध्यमांचा वापर करतात. याचाच अर्थ असा की बर्हीर्मुख व्यक्ती सोशल मिडीयावर कितीही ऍक्टिव्ह असला तरी याच व्यक्तींना सोशल माध्यमांचा चटकन कंटाळाही येतो पण अंतर्मुख व्यक्ती मात्र दीर्घ काल सोशल मिडीयावर असतात मात्र ते स्वतःविषयी फार कमी माहिती शेअर करतात. अनेकदा काहीच न बोलता किंवा प्रतिक्रिया न देता निव्वळ सोशल माध्यमात चालू असलेल्या घडामोडी बघत असतात, असेही डॉ. पैविका शेल्डन यांनी त्यांच्या लेखात नमूद केले आहे.


सोशल मिडीयाने आपले असामाजीकीकरण केले आहे का? म्हणजे लोक सामाजिक सोहळे, मित्र मैत्रिणींच्या पार्टीज आणि इतर सामाजिक कार्यक्रम टाळू लागले आहेत का किंवा तिथे गेल्यानंतरही अनेकदा आपल्या फोन मध्ये गुंतलेले असतात का? तर हो! माणसं असं करतात कारण त्यांना सोशल मिडीयावर चाललेली एकही गोष्ट गमवायची नसते. म्हणजे अनेकदा ते शरीराने सामाजिक कार्यक्रमांना, मित्र परिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर असतात मात्र मनाने सोशल मिडीयावर अडकलेले असतात. मग अशा व्यक्तींना आपण सोशल म्हणायचे का?


आपला अधिक वेळ कुठे जातोय?


एकत्र जेवण्यात? की एका टेबलावर जेवायला बसल्यानंतरही आपापल्या फोनमध्ये?


मित्रपरिवाराबरोबर मनसोक्त गप्पा मारण्यात ?


की हातात गॅजेट घेऊन एखादा गेम खेळण्यात?


प्रिय व्यक्तीला जादूकी झप्पी देण्यात?


कि इमोटीकोन पाठवण्यात?


आपले जिच्यावर/ज्याच्यावर प्रचंड प्रेम आहे त्याचे दीर्घ चुंबन घेण्यात कि...


प्रोनोग्रफी बघण्यात?


- मुक्ता चैतन्य

62 views0 comments
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922