Search

मुलगी म्हणजे काचेचं भांड !

साडेदहा-अकरा वाजले असतील. एका कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भाषण देऊन आले होते. कॉलनीतल्या जयंतीच बर असत, त्यादिवशीच साजरी केली पाहिजे याची आवश्यकता नसते. संक्रांतीच्या हळदी- कुंकवाप्रमाणे १४ ते ३० एप्रिलच्या दरम्यान आपल्या सोईच्या दिवशी, पाहुण्यांना जमेल त्या दिवशी जयंती करता येते. अशाच एका कॉलनीत ‘डॉ. बाबासाहेव आंबडेकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ या विषयावर भाषण द्यायला गेले होते. अजूनही स्त्रियांना अधिकार नाहीत. स्वातंत्र्य नाही, स्वतःचा लाईफ पार्टनर निवडीचं स्वातंत्र्य नाही असं बेंबीच्या देठापासून ओरुडून सांगितलं. माझं भाषण संपल्यानंतर ज्या आभारासाठी उभ्या राहील्या होत्या त्यांनी त्यांच्या आभाराबरोबर ‘आता तशी परिस्थिती शिल्लक नाही, पूर्वी होती, आता सर्व बायका मुक्त झाल्या आहेत’ असे मार्गदर्शनही मला केले. त्यांचे आभार, त्याबरोबर अतिशय छान खादीचा रुमाल, नारळ आणि गुच्छ घेतला आणि रूमाला बरोबर नारळ का देतात याचा विचार करीत घरी पोहोचले. त्या भाषणात मी काय काय सांगितले हे माझ्या मुलींनी विचारले म्हणून त्यांना सांगत होते. तेवढ्यात फोन वाजला. लाँग रिंग म्हणजे बाहेरचा गावचा फोन असल्यामुळे मी उचलला. समोरच्या निकम बाई यांचे साठी फोन होता म्हणून त्यांना बोलावले. त्या पळत आल्या. अतिशय कडक उन्हाळ्यात त्यांनी शाल पांघरली होती. नेहमीसारखा चेहरा हसरा नव्हता. पळण्याची काय जोरात चालण्याचीही ताकद त्यांच्यात नव्हती. उसनं हसू आणून त्यांनी स्मित केलं आणि फोन घेतला. ‘हॅलो’ म्हंटल्या. आम्हीही हळू आवाजात आमच्या गप्पा सुरु ठेवल्या. काय झालं हे कळायच्या आत त्यांचा रडण्याचा आवाज खूपच वाढला. तोपर्यंत त्यांच्या घरातले ही कोणाचं फोन आहे हे बघण्यासाठी आले होते. त्यांनाही काही कळेना. शेवटी मी उठले, त्यांना पलंगावर बसवलं आणि फोन मी घेतला. समोरुन त्यांच्या मुलीच्या सासरकडचे लोक बोलत होते. तिच्या सासरच्यांनी तिला खूप मारले होते आणि घराबाहेर काढले होते. तिला घेऊन जा हे सांगण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी फोन केला होता.

त्यांच्या मुलीचं नाव सुनिता. दिसते तशी बोलायलाही गोड. चौथी पास झाली तेव्हापासून पूर्ण कुटुंबाचं काम ती एकटी करायची. स्वयंपाक करावा तर सुनितानेच इतकी छान चव. आई धुणीभांडी करते. वडील जमेल तेव्हा, जमेल तिथे मजुरी करतात. येईल त्या उत्पन्नातून स्वतःच्या हौशी, व्यसनांचा खर्च पूर्ण करता. त्यामुळे साहजिकच कुटुंब चालवण्याची जबाबदारी निकमबाईंवर. जास्तीत जास्त पैसा कमवायचा या गरजेच्या नादातून खूप घरांची कामं निकम बाईंनी स्वीकारली. सर्व काम होईपर्यंत काहीच खायचं नाही. खाल्ल तर सुस्ती येईल, कामाचा स्पीड कमी होईल या भितीतून दोन ते अडीच वाजेपर्यंत पोटात अन्नाचा कण नाही आणि काम मात्र कष्टाचं. घरी यायचं, असतील ते दोन घास खायचे, थोडा आराम करायचा परत यार्डात हमाली करायची असा त्यांचा दिनक्रम. घराजवळ शाळा होती. शिक्षक समजावून घ्यायचे म्हणून सुनीताची सातवीपर्यंत शाळा झाली. पुढे खाजगी शाळेतून शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे शिक्षण थांबलं. घरी राहून सहा आठ महीने झाले असतील नसतील तर लग्नाची स्थळ सुचवण्याचा छंद असणाऱ्या हौशी मंडळींकडून सुनितासाठी एक स्थळ सुचवलं गेलं. ‘मुलीच्या उंचीकडे जावू नका, अजून ती खूप लहान आहे तेव्हा इतक्यात तिच्या लग्नाचा विचार नाही’ अस खूप समजावूनही कोणीही निकम बाईंच ऐकल नाही.

“पोरीच्या जातीला खूप दिवस घरात ठेवू नये, लोक काय म्हणतील, तुम्ही आई-बाप का कोण ! घरात काचेचं भांड असतांना तुम्हांला रात्रीची झोप तरी कशी येते.”- असे अनेक चॅलेंज करणारे प्रश्न विचारुन सगळ्यांनी निकमबाईला घोड्यावर बसवलं. जिथं काम करत तिथून अॅडव्हान्स घेतला, रुपयाला चार आणे व्याजाने पैसे घेतले आणि धामधुमीत लग्न करुन दिल. त्याचं स्वतःच त्याच दरम्यान गर्भपिशवीचे अतिशय अवघड ऑपरेशन झालं. या सर्वांच कर्ज फेडत नाही तर मुलगी दारात.

प्रसंग दुसरा- माझ्याच वस्तीतली दुसरी मुलगी माधुरी. आमच्यात राहायची, मिटींगला यायची, कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची म्हणून घरचे खूप रागवायचे. मुलींच्या जातीने जास्त फिरू नये, पोरांशी बोलू नये, आपलं चालचलन चांगलं ठेवावं, सगळ्यांसमोर मोठ्याने हसू नये असे सल्ले घेत माधुरीला घरात कोंडल जायचं. माधुरी फारच हुशार. काहीही कारण काढून आमच्याकडे यायची. खूप बोलायची, मोठमोठ्याने हसायची आणि रडायचीसुद्धा. सातवीपर्यंत शिकली. घरात पोरं सांभाळायला कोणी नाही. तिची आई जिथे कामाला होती त्या मालकाने एक मुलगा दाखवला. मुलगा दिसायला जरा बारा होता. मालक म्हणतोय म्हणजे कुटुंब चांगलंच असेल या विश्वासाने माधुरीचं लग्न ठरलं. माधुरीच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत तिची बिदाई झाली. “तिचं लवकर लग्न करु नका, करणारच असाल तर समोरच्या कुटुंबाची किमान माहीती घ्या” अशी विनंती करायला गेलेलो आम्ही तर ‘संस्कृती बुडवायला निघाल्यात’ असं म्हणून गोड आवाजात घराबाहेरच काढलं. माधुरीचं लग्न झालं. मुलीचं कसं कर्ज काढून का होईना पण टेचात लग्न केलं या खुशीत माधुरी रडतच सासरी गेली. तिला आधार मात्र कोणी दिला नाही. निषेध म्हणून लग्नाला न जाण्याचा चुकीचा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे तिच्या भावना तिच्याच जवळ राहील्या. सहा महिन्यात तीनदा मार खाऊन माधुरी माहेरी आली. अंगावरचे वळ पाहून आता तर पाठवायचंच नाही, तिला तिच्या पायावर उभं करायचं अस आश्वासनही आम्हांला दिल गेलं. माधुरीचा चेहरा खुलला. आमच्या नवीन प्रकल्पाची माधुरी प्रमुख झाली. तीन दिवसांनी मिटींगचा निरोप द्यायला घरी गेले तर घरी माधुरीचा नवरा आला होता. तो खूप हातापाया पडत होता. आता मारहाण करणार नाही अस म्हणाला म्हणून तिच्या इच्छेविरुद्ध तिला नवऱ्याबरोबर पाठवली. पाच-सहा दिवसांनी तोच नवरा परत माधुरीला शोधायला तिच्या माहेरी आला होता. थोडसं भांडण झालं होतं असं सांगत होता. माधुरी सद्या माहेरीही नाही आणि सासरीही नाही. दहा-पंधरा दिवस होऊन गेले पण पोलिसात तक्रार नाही. मुलगी काचेचं भांड आहे, ते फुटायला नको म्हणून शोधाशोध चालली. पण सगळं कसं गुपचूप. आता पूर्ण कुटुंब तिला शोधतय.

प्रसंग तिसरा- आमच्या वस्तीचे पुढारी, वस्ती स्लम म्हणून घोषित करुन घ्येण्यासाठीच्या मोर्च्याच्या आयोजनात अग्रभागी असलेले. सरकारी नोकरी, त्यामुळे घर जरा बरं. पण पोर भरपूर. पोरांचं शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत. मुलीला (कामिनीला)मनपाच्या शाळेत शिकवलं. आठवीला ती जवळच्याच एका खाजगी शाळेत जाऊ लागली. नवीन शाळेचा अभ्यास समजायला तिला वेळ लागला. पहिल्या वर्षी नापास झाली. तेव्हा पासून शाळेत पाठवलंच नाही. मग लोकांच्या घाणेरड्या नजरेतून हे काचेचं भांड लपवण्यासाठी तिला घराबाहेर जाणं एकदम बंद केलं गेलं. दोन वेळेचं भरपेट जेवण आणि दोन खोल्यांच्या घरातला वावर त्यामुळे तिची एकदम जाडी वाढली. तिला स्थळ येऊ लागली. तिच्या चुलत भावाचे आणि तिचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात झाले. दोघा भावंडांची लग्न एकाच वेळेस केली तर एकाच चांगलं होतं आणि एकाच वाईट होत या भितीतून दोघांच एकाच मांडवात पण विधी वेगवेगळ्या वेळाने केले. खुशीने मुलीचा निरोप समारंभ झाला. भरपूर कर्ज वाढलं. टॉवेल, टोप्या, साड्या वाटल्या. दुसऱ्याच मुळाला मुलगी जेव्हा आली तेव्हा जावयाने वस्तीच्या कोपऱ्यावरच तिला सोडलं, तो काही घरी आला नाही. ती घरी आल्यानंतर तीने तो कसा वागतो, कसा मारतो त्याच्या अंगावरच्या खुणा दाखवल्या. शे-पाचशे लोकांसमोर निरोप समारंभ झालेला. मग मुलगी परत कशी आली? या लोकांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं ह्या भीतीने परत तिला घराबाहेर पडण बंद. आता ती फक्त नैसर्गिक विधीला बाहेर येते. तेव्हाही कोणीतरी रक्षक तिच्या बरोबरच असते. तिला कोणाशीही बोलता येत नाही. खाली मन घालून येते आणि खाली मन घालून जाते.

तिच्या सासरचे जेव्हा स्वतःहून घ्यायला येतील तोपर्यंत पाठवायचे नाही आणि चौकशीही करायची नाही असा तिघींच्याही घरच्यांनी निर्णय घेतला आहे. अर्थात ह्या निर्णयात ना मुलींना विचारले आणि ना त्यांना विश्वासात घेतले. फरक काय पडला सुनिता, माधुरी आणि कामिनीच्या आयुष्यात? लग्ना आधीही घरातच आणि लग्न झालं तरी घरातच. कारण काय तर मुलगी हे काचेचं भांड आहे ना?

35 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922