Search

युद्ध नको….. घरातही आणि घराबाहेरही…...

त्या तिथं पलीकडं तिकडं, त्या कुंपणाच्या पल्याडग, मला खात्री हाय, माझी मैत्रीण हाय।।

तुम्ही म्हणाल, तिचं नाव काय?, मी खरंच सांगते ठाव नाय,

असल जहिरा, जिनत, सलमा, रजिया नाय तर असलं जरीना

काय असलं कुणाला, खबर मी म्हणते, नावात एवढं असतंय काय?

तुम्ही म्हणाल मला, तिचं गाव काय, मी खरंच सांगते ठाव नाय, असलं पेशावर, रावळपिंडी,

लाहोर नाय तर असल कराची, काय असलं कुणाला खबर, मी म्हणते, गावा बिगर काय अडतंय काय?

तुम्ही म्हणाल मला मग, करते काय? नाही ठाऊक परी अंदेसा हाय, असलं रांधत, दळत-कांडत,

रानाला न्हाय तर तान्ह्याला पाजत, काय असल कुणाला खबर मी म्हणते, बाई दुसरं करणार काय?

तुम्ही म्हणाल मला मग ओळख कशी?, आमच्या दोघींचं बाप हायेत बॉर्डरपाशी, असल तिच्याबी उरात धडकी, माझ्यावानी झोप उडाली, काय हुईल कवा काय, घडलं हि भीती, हाच ओळखीचा धागा हाय।

ही पवन खेबुडकर यांची कविता, आम्ही स्त्री मुक्ती वाल्या बाया अनेक वेळा गातो. बाबासाहेब म्हणायचे की स्त्री मुक्ती ही मानवमुक्तीचीच चळवळ आहे. त्या अर्थानेही मी स्त्री वादी झाले. ज्या ज्या वेळी ही कविता मी ऐकली मला माझ्या जन्मा आधी घडलेली जागतिक युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध आठवत असे आणि काय परिस्थिती असेल त्यावेळी याचा न झेपावणारा अनुभव घेत असे मी. गेले आठवडाभर हा ताण माझ्या सारखे अनेक संवेदनशील नागरिक अनुभवत आहेत. माझ्या कडे जव्हारला टीव्ही नाही याचे अधिक सुख ह्या आठवड्यात मी अनुभवले. बातम्यांमध्ये चाललेला थिल्लरपणा अगदी अल्पसा माझ्या वाट्याला आला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत मी ही तुमच्या सारखेच पैसे भरुन प्रवेश घेतलेला असल्यामुळे माझ्या पर्यंतही काही बातम्या पोहोचल्याच. आता मला विचारल्याशिवाय काहीही डाऊनलोड करायचे नाही ही फॅसेलिटी कशी वापरायची याचे तंत्रज्ञान माझ्या तरुण मित्रांनी शिकवल्या पासून मी आता फार स्वतःच्या जीवाला त्रास करुन घेत नाही. त्यामुळे बरेच अॅनिमेशन केलेले व्हिडीओ पाहण्याचा प्रसंग आला नाही. त्यामुळे मी बरीच वाचले. रवीश म्हणाला काही दिवस टीव्ही पाहू नका हे मी बरेच आधी पासून अमलात आणले आहे. त्यामुळे जरा वाचन वाढले आहे, लिखाणही वाढले आहे.

पण घरात बसून, एक बॉम्ब टाकून मनातल्या मनात पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन उडवून टाकल्याचे स्वप्न पाहणारे मात्र माझ्या सारख्या अडाण्यांना माहिती पोहोचेल याची व्यवस्थित रचना करतात आणि कितीही काळजी घेतली तरी काही तपशील आपल्या पर्यंत पोहोचतातच. हा सर्व त्रागा तुम्हांला सांगते कारण अशी मनातल्या मनात देश, लोक यांना काढून टाकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हे असे लोक त्यांच्या त्यांच्या मनातल्या मनात असे मांडे खात असते तर मला फार वाईट वाटले नसते. पण असे लोक आता सर्व सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अस्तित्व तयार करता आहेत आणि त्यात सहभागी न होणाऱ्यांना ‘देशद्रोही’ जाहीर करुन टाकतात आणि एकदा का तुम्ही त्यांच्या अशा गटात आलात की तुमचे जगणे त्यांच्या नियंत्रणात ते घ्यायला लागतात. या सगळ्याचा खूपच त्रास होतो आहे कारण यात तरुण पोरांची संख्या जास्त आहे म्हणून. एवढ असत तरी कदाचित मी हा विषय तुमच्याशी बोललेच नसते, पण आज गंभीरपाने बोलते आहे कारण तसेच आहे.

आमच्या जव्हार मधली एक छोटीशी शाळा. म्हणजे श्रीमंत अंगणवाडी खरतर. ज्या आईबापांकडे थोडे पैसे आले आहेत, इंग्रजी बोर्ड लावलेल्या शाळा म्हणजे आपल्या पोरांची प्रगती, शाळेच्या युनिफॉर्म मध्ये टाय असला म्हणजे आपल पोरग नक्की परदेशात जाईलच .....इ.इ.अनेक गैरसमज असलेल्या पालकांच्या खिशातून/पर्स मधून, मार्केटिंगच्या तत्वाने भरपूर पैसे घेऊन चालवलेल्या ह्या बालवाड्या. अशीच एक रंगीत बालवाडी आमच्याकडे आहे. ज्यादिवशी पुलवामा ची घटना घडली. त्याच्या दोन-तीन दिवसांनी ह्या शाळेच्या लोकांनी सर्व ज्युनिअर केजी , सिनियर केजी याचे वर्ग एकत्र केले, वर्गात एक संगणक उपलब्ध केला, त्यावर पुलवामाची सहज उपलब्ध झालेली अॅनिमेटेड फिल्म मुलांना दाखवली, मग सर्व शहिदांचे फोटो असलेले मोठे बॅनर समोर लावला, आणि एका एका मुलाला समोर बोलावून त्यांच्या हातात दिलेली मेणबत्ती त्या फोटोंसमोर लावायला सांगितली. यासर्व नाट्याचा मध्यंतर असा झाला की हळूहळू बाई रडायला लागल्या आणि मग सर्व वर्ग ढसढसा रडला. तोपर्यंत शाळा सुटायची वेळ झाली होती. मुल तसाच रडलेला चेहरा घेऊन घरी आले. माझ्या एका सहकाऱ्याची मुलगी ह्या शाळेत आहे,तिच्या घरी मी ही कामानिमित्त गेलेली होते. त्या लेकराची आणि माझी खूपच दोस्ती आहे. प्रत्येकवेळी मला ती भेटली की खूप बोलते, तिला खूप काही मला सांगायचे असते, खूप सारे प्रश्न मला विचारायचे असतात. पण आज ती तोच मूड घेऊन घरी आली होती. तिने सांगे पर्यंत हा कुठलाही प्रकार आम्हांला माहित नव्हता. चौकशी केल्यावर वरील सर्व सविस्तर कळाले. प्रसंग अजून संपलेला नाही. प्रसंगाचा शेवट असा की, ते लेकरू मला सांगत होत ‘आई, मी ना मोठी होईल तेव्हा बंदूक घेईन आणि पाकिस्तानला मारेन, त्यांनी आपल्या सोल्ड्जरला मारलं ना?’

मी अजून ही त्याच धक्क्यात आहे की, शाळेने हे अस का केल? त्यांना अस करायला कोणी सांगितलं? शाळेत संगणक, तो अनिमेशन केलेला व्हिडीओ कोणी पुरविला? शाळेतले शिक्षक एरवी शिकवण्यासाठी एव्हढे कल्पक नसतात मग ही कल्पकता त्यांना कोणी दिली? ज्या शाळेत असे प्लान कार्यक्रम होतात त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य काय? हे विध्यार्थी जागतिक गावाचे नागरिक असणार की नाही? यासर्वांचे एका वाक्यात उत्तर आहे की काहीना असे मानवाच्या मनात सतत आपल न ऐकणाऱ्याचा राग तयार करुन हवा आहे आणि ते यासाठी एक ही संधी सोडत नाही. ही तात्पुरती निर्माण केलेली युद्ध सदृश्य परिस्थिती किती लोकांच्या विशेषतः तरुणाच्या, लहानग्यांच्या मनात काय काय भीती, राग, असंवेदनशीलता निर्माण करीत आहे. त्यामुळेच आज घरा घरात सतत रागावलेले, नाही हा शब्द ऐकून न घेणारे, आत्ताच हव आहे अस सतत म्हणणारे लहान मुल दिसत आहेत जे ह्या देशाचे नागरिक होणार आहे. हे नागरिक जरा कोणाचा विरोधी सूर ऐकून घ्यायला तयार नाही, मग ती विरोधी वागणाऱ्यांशी कस वागतील याचा विचार करुन डोक फुटायला आलं आहे. म्हणून मी हे आज तुम्हांला शेअर करते आहे. रागीष्ट मुलांचे कौतुक करण्यात तुम्ही अग्रेसर आहात. त्याला हे अजिबात आवडत नाही, तो ही भाजी खाणारच नाही अशी त्याच्या आधी तुम्ही प्रस्तावना करता तेव्हा तुम्हा सर्वाना याचा त्रास व्हावा. आपण निर्माण केलेल्या या ‘त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, माजलेत ते’ च्या वातावरणामुळे तुम्ही ‘माणूस’ मारण्याचे शास्त्र शिकवता आहात हे तुमच्या लक्षात यावे यासाठी हा चिमटा.

त्या दिवशी २६ ला मी सीएसटी ला पोलीस प्रशिक्षणात सहभागी होते, चहाचा ब्रेक झाला आणि मला आयोजकांनी निरोप दिला,’आपण केला बर का त्यांच्या वर अॅटॅक’. माझी तर पायाखालची जमीनच सरकली. त्याआधीच्या ‘२६’ ला ही मी अशीच सीएसटी होते. जस्ट मी लोकल मध्ये बसले, विक्रोळी पर्यंत जेमतेम पोहोचले असेल आणि त्यांनी आपल्यावर अॅटॅक केल्यामुळे झालेली सर्व प्रकारची अगदी इमारती पासून ते माणसाच्या मनातली पडझड पहिली होती, ते सर्व काही सेकंदांच्या आत डोळ्यासमोरून गेले. कसे तरी सत्र संपवले आणि तिथून बाहेर पडून आधी आपल्या माणसात जाण्यासाठी झपाझप पावल टाकत स्टेशन कडे धावत चालली होती. कामा हॉस्पिटल कडून जरा वळाले आणि फटाक्यांचा जबरदस्त आवाज झाला. खूपच घाबरले मी. घामाच्या धारा लागल्या. आवाजाच्या दिशेने पळतच गेले, माझ्या सारखे अनेकजण त्याच दिशेकडे पळत जात होते. पोहोचले तेव्हा पाहिलं तर, स्टेशनच्या जवळ असलेल्या मुस्लीम बहुल कॉलेजने सर्व विध्यार्थ्यांना खाली जमा केलेले होते, दोन चार तिरंगे फडकत होते, एका बाजूला चेकाळलेले तरुण फटाक्यांच्या लडी, बॉम्ब फोडत होते, लाऊड स्पीकर वर ए आर रहेमान वंदेमातरम् जोराजोरात गात होता, तोंडावरचा बुरखा न उचलता ‘वीट का जवाब पत्थरसे देंगे च्या जोरदार घोषणा’ सुरु होत्या. मुलमुली एकत्र विजयाचा उन्माद करीत होते. काहीवेळ च चालला हा सर्व ड्रामा, जणू काहीतरी सिद्ध करण्यासाठीच करायचा होता तो. हा पुरावा असंख्य मोबाइल कॅमेरे हे टिपून तिथे अनुपस्थित असणाऱ्यांना लाईव्ह शेअर करीत जगजाहीर करीत होते.

बुरख्यात सारख्याच दिसणाऱ्या बऱ्याच मुली, एकत्रच उभे असलेले त्यांचे वर्गमित्र आणि त्या ह्या जल्लोषात एकत्र शामिल झालेल्या होत्या आणि त्यांच्या अशा एकत्र उभ्या राहण्याला त्यांचे कुठलेच गुरु ऑब्जेक्शन घेत नव्हते. कशीतरी स्टेशनला पोहोचले, मोबाइल इतका वेळ सत्रासाठी बंद करुन ठेवला होता त्याला जागे केले. तोपर्यंत बातम्या सविस्तर धडकलेल्या होत्या. मोठा व्यक्ती गम्बीर आजारी असला आणि त्याला दवाखान्यात नेले की पेपरवाले सर्व त्याचेशी संदर्भात माहिती गोळा करुन अगदी ‘पान’ रेडी ठेवतात आणि शेवटचा निरोप आला की ‘शेवटी त्यांनी इतक्या वाजता प्राण सोडला’ हे टाईप होते आणि पान प्रिंट होते. अगदी आज तसच सर्व पान सविस्तर रेडी होत. परत तोच प्रश्न कोणी दिली ही सविस्तर माहिती? शहारून तिथेच पुलावर उभे होते आणि हळूहळू मित्रांच्या पोस्ट यायला लागल्यावर समजल की आम्ही त्यांच्या घरात घुसलो नव्हतो तर दोन शेजारी कचरा टाकायला जी जागा तशीच गलीच्छ ठेवतात त्यावर हल्ला केला होता आपण. त्याला जोडूनच सर्वांचे वाक्य होत, दहशतवाद संपलाच पाहिजे, पण त्यासाठी युद्ध नको.’ वाक्य वाचून माझ्यात थोडी जाण आली. आज माझ्या गावच्या निनाद मांडगवणे याच्या पत्नीने ,’युद्ध नको हो’ असे स्पष्ट सांगितले आणि खूपच हायसे वाटले. इतक्या मोठ्या तिच्या नुकसानी नंतरही ती मानवतेला धरून आहे त्याअर्थी शेवटी मानवताच विजयी होईल. ‘विजेता’ तिचे नाव तिच्या वाक्यात आपण मिसळलो नाही तर हे तिकडे करा असे सांगत असताना कधी आपल्या घरात घुसेल हे आपल्याला कळणारही नाही. म्हणूनच म्हणते आहे ‘युद्ध नकोच... घरातही आणि घराबाहेरही......

अनिता पगारे,नाशिक.

pagare.anita@gmail.com

8 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922