Search

वस्तीवरची पोरं - मनोगत{अनिता पगारे}

काल परवा पर्यंत वस्तीतच रहात होते. आता ‘फ्लॅट’ नावाच्या नवीन रचनेत गेले, पण ‘वस्तीने’ पिच्छा काही सोडला नाही. फरक एवढाच वस्तीत होते तेव्हा जे दररोज पहायचे ते आता शिळं झाल्यानंतर पाहायलां मिळतं. तेव्हा जे पहायचे ते अनुभवायचेहि, आता अनुभवायला, समजायला वेळ लागतो. वस्तीत दिवसाची सुरुवातच ‘सार्वजनिक’ आयुष्याने व्हायची. अर्धवट झोपेतच ‘सुलभ’ मध्ये गेलं की, रात्री वस्तीत कुठ काय झालं किंवा काहीच झालं नाही याची ‘खबर’ मिळायची. आपसूकच मिळायची. आता ‘खबर’ मिळण्यासाठी विशेष लक्ष ठेवावं लागतं.

माझा जन्म झोपडपट्टीतलाच. पण आई अतिशय स्वच्छ त्यामुळे ‘खायला’ नसल तरी ‘स्वच्छ’ राहायची सवयच पडली. त्यामुळेच आयुष्यात अनेक चढउतार आले पण ‘स्वच्छच’ राहिले. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे वस्तीत रहात असलो तरी इतरांपेक्षा बऱ्याच सुविधा आमच्या घरात होत्या. वडिलांना स्वतःला शिक्षणाची खूप आवड होती. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःशिकू शकले नाहीत. पण त्यांनी आम्हांला कुठेही कमी पडू दिलं नाही. त्यामुळे आम्ही चारही भावंड आमच्या आमच्या क्षेत्रात शक्य तेवढ्या उंचीपर्यंत शिकलो. पहिल्याच वर्षी दहावी पास झाले आणि कॉलेज मध्ये गेले. माझ्या पिढीत माझ्या वस्तीत दोनच मुली कॉलेजमध्ये गेल्या. एक माझी मामे बहिण आणि नंतर मी. कॉलेजमध्ये ‘समता आंदोलन’ या समाजवादी विचारांच्या संघटनेत सहभागी झाले. तिथून आयुष्याला एकदम वेगळेच वळण लागलं. वस्तीतल्या रहाण्याचे, तिथल्या नटण्या मुरडण्याचे, सार्वजनिक नळाचे, तिथल्या दारुचे एकूणच सर्व आयुष्या मागच्या सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय जडणघडणीचे अर्थ समजायला लागले. प्रत्येक घटना वेगळी भासायला लागली. ‘वस्तीवरचं प्रत्येक पोर’ खुणवायला लागलं. त्यांच्या जगण्यातल ‘विशेष’ अंडरलाईन करावं तस स्पष्ट डोळ्यासमोर उभं राहिलं. जे दिसलं ते तसच्या तसंकागदावर उतरवलं. ज्या काही दोन चार रेघा मारल्या, त्या पुस्तकाच्या रुपाने तुमच्या समोर आहेत.

झोपडपट्टीच्या जवळच ‘सलाईन’ डॉक्टर का असतात? दारु, जुगार हे वाईट असतं हे शुद्धीत सांगणारे रात्री परत तिथेच का जातात? या मागची मानसिकता थोडी थोडी लक्षात यायला लागली होती. त्या निमित्ताने वाचायलाही शिकले होते. त्याच काळात दै. लोकमतने तरुणाईच्या अभिव्यक्तीसाठी ‘मैत्र’ सुरु केले होतं. कॉलेज रोड, गंगापूर रोड वरच्या माध्यम वर्गातल्या तरुणां इतकाच आमच्या वस्त्यांमधल्या तरुणां मध्येही तरुणाईचा जोश असतो; शिक्षण घेण्याच्या वयातच स्वतःपुरतं का होईना कमवावं लागल्यामुळे अकाली प्रौढत्वाने जगण्याची एक नवी दिशा त्यांच्यात असते. झोपडपट्टी म्हणजे टुक्कार पोरं, जे रस्त्यावर चौकात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडत असतात असा (गैर)समज असलेल्या समाजापुढे याचंही आयुष्य असायला पाहिजे या भावनेने लिहायला सुरुवात केली.

‘वस्तीवरची पोरं’ लिहितांना असंबद्ध लिखाणाचा नेहमी भास व्हायचा. पण खरोखरच या पोरांच्या आयुष्याला सुसंबद्ध शब्दच मुळी लागू होत नाहीत. माझ्या बाबतीत मात्र दादा, माझे वडील सरकारी नोकरीत असल्याने म्हणा किंवा त्यांच्या समवेत नामांतरा सारख्या समतावादी लढ्याचे जोडीदार असलेले कार्यकर्ते असल्यामुळे म्हणा दादांचा आम्हा भावंडांशी वागण्याचा दृष्टीकोनही बदललेला होता. शिक्षणाच्या बाबतीत मुला – मुलींचा भेद न करता सगळ्या झळा सोसूनही शिक्षणात काही कमी पडू दिले नाही. या सर्व गोष्टी त्या त्या वेळी लहान वाटायच्या. पण वस्तीतले सवंगडी भेटत गेले तेव्हा मात्र याची जाणीव तीव्रतेने झाली. दिवसेंदिवस ती जाणीव अधिकच प्रखर होते आहे. कारण आमच्या वस्तीतले राजा, विज्या, मिनी, निशा, मनीषा, शोभी, नाथा, रंजना, शाहरुख, देवदास, सुनिता, निमा, माया, विमल यांना केवळ ‘आई दादा’ मिळाले नाहीत म्हणून तर ती ‘वस्तीवरची पोरं’ झाली नाही ना? अस मन सारखं विचारतं.

‘वस्तीवरची पोरं’ असंबंध असलं तरी एक वास्तव आहे. समाज व्यवस्थेची अभेद्य रचना आहे. त्यामुळे केवळ मीहून चालणार नाही. वस्तीजवळच घेतलेल्या फ्लॅटमध्ये रहात असताना कधीतरी रात्री उशिरा बाहेर गावावरुन घरी परतताना लहानपणी अंधारात पाहिलेली वस्ती ‘हायमास्ट’ दिव्यांच्या लखलखाटात वाकुल्या दाखवते, हे सांगितले नाही तर मन स्वतःलाच धिक्कारेल. पण हीच खरी आशा आहे की, जोपर्यंत ही सल टोचत राहील तोपर्यंत जेथे कोठे असेल तेथे वस्तीवरच्या पोरांची दोस्ती घट्ट राहील याबद्दल निश्चिंत आहे.

वस्तीवरची जी पोरं भेटली, ती फक्त व्यक्ती म्हणून भेटली नाही. त्या प्रत्येक व्यक्तिमत्वा मध्ये वस्तीची रचना, तिथल्या प्रथा, परंपरा, सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेले प्रश्न होते. आर्थिक बदल झाल्यामुळे वरवर वस्ती बदलली असं वाटतं, पण सामाजिक विषमतेची दरी नव्या स्वरुपात पुन्हा आ वासून उभी राहिल्यामुळे वस्तीवरची पोरं आजही तसेच जगताहेत. वस्तीतला विज्या, राजा आता मुळा पासून ‘डबक्यांमध्ये’ अडकले आहेत, आता त्यांनी बाहेर पडायचं ठरवलं तरी ते शक्य नाही, कारण त्यांच्या आयुष्याच्या वाटेला मागे फिरण्याचा, नाही म्हणण्याचा रस्ताच नाही. वस्तीतल्या अनेक शोभा आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी धडपडताहेत. त्यासाठी दिवसभर सिमेंट वाळूत रहावं लागलं तरी त्यांची तक्रार नसते. तोंडात एक गुटख्याची पुडी टाकली की त्या दुसऱ्याचे घर बांधायचे श्रमही विसरुन जातात आणि स्वतःच्या घरासाठी कष्ट करतात. ‘देवदास’ आजही कॉलेजला जाणाऱ्या बसच्या वेळेला रस्त्यावर बसून ‘ते’ दिवस आठवतो, एकट्याशी हसतो, एकटाच बोलतो. ‘शाहरुख’ तर दिवसागणिक वाढतच आहे. आता शिक्षणाने बराच बदलही दिसतो. पूर्वी कोणी आजारी पडलंकी, फक्त ‘बाबा’ कडेच न्यायचे. आता बाबा बरोबर डॉक्टर कडेही न्यायची प्रथा सुरु झाली आहे. लोकांच्या या नव्या प्रथेचा (गैर) फायदा घेणारे ‘सलाईन’ डॉक्टर मात्र वाढलेत. बाबा डोळ्याने दिसतो. त्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आंदोलन तरी करता येत पण या सलाईन डॉक्टरांच्या भोंदूपणाबद्दल काही करता येत नाही. कुठलाही आजार घेऊन गेलात तरी एक सलाईन भर, बरं वाटेल अस गळी उतरवलं जातं. सलाईनच्या पाण्यात लोकांना बुडवून पिशवीत संसार घेऊन वस्तीजवळ भाड्याने राहायला आलेले आज स्वतःचा बंगला, प्रत्येक पोराला वेगळी गाडी घेऊ शकले. एका एका अंधश्रद्धे विरुद्ध शेवटी जनजागृती करत रहावीच लागणार आहे. फरक एवढाच केला की, बाबा विरुद्ध लढण्यात वेळ घालवण्यापेक्षा बाबांकडे जाणाऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न करणारी ‘विमल’ सारखी जी ‘वस्तीवरची पोरं’ आहेत त्यांना ‘स्ट्राँग’ करणाऱ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आमच्या वस्तीवरच्या पोरांच्या आया बाजारात भाजी घेतांना ‘काय गं आक्के’ म्हणून तोंड भरुन विचारतात. तेव्हा वस्तीपासून दूर गेल्याची अपराधीपणाची भावना तात्काळ विरते. समाजाच्या बाजारात डिग्र्यांचा ढिग करावा लागतो, लेटरहेड्स लागतात, वस्तीवर मात्र ‘पोझिशनच’ लागते; आणि ती मला वस्तीतल्या दारिद्र्याने पिचलेल्या विषमतावादी सामाजिक परिस्थितीच्या ओलीत्या रक्तबंबाळ जाणिवेनं मिळाली. म्हणूनच ‘वस्तीवरची पोरं’ लिहिण्याच डेअरिंग मिळालं.

वस्तीचं आयुष्य शब्दांमध्ये मांडतांना अनेकांचे प्रोत्साहन, शुभेच्छा, धीर कामी येताहेत. दै. लोकमतने लेखांच्या स्वरुपात वस्तीवरच्या पोरांना ‘हीरो’ केले. समाजासमोर, वाचकांसमोर निर्व्याजपणे आणले यात अपर्णा वेलणकर, दत्ता सराफ, किरण अग्रवाल यांचे मोठे योगदान आहे. या लेखांना पुस्तक स्वरुपात आपल्या हाती देतांना सामाजिक कामात अनेक चढ उतारांना ‘चार्जर’ची भूमिका निभावणारे अरुण ठाकूर, विनायकदादा पाटील, अॅड. प्रेमानंदजी रुपवते. डॉ. संजय अपरांती, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाचे सर्व स्नेही पुन्हा पुन्हा ‘वस्तीतल्या पोरांची’ साथ न सोडण्यासाठी ‘साथ’करतात, त्यामुळेच हा उत्साह.

श्री. विनायकराव पाटील यांचे विंनतीवरुन मा. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री निधीतून या पुस्तकाच्या छपाईसाठी अर्थ सहाय्य केले. याबद्दल मी मा. मुख्यमंत्र्यांची आभारी आहे.

ज्या विनायकदादांनी मायेची सावली दिली, पुस्तक निर्मितीसाठी सर्वार्थाने ‘सहयोग’ दिला आणि पुस्तकाची प्रस्तावना लिहितांना माझ्या आयुष्याला अर्थ दिला. त्या दादांच्या ऋणात रहाणंच पसंत करीन. माझ्या सारख्या असंख्याना अविरत ते ही अबोल राहून सक्षम करणारी आमची मोठी आई ‘सरोज पाटील’, पुस्तकाच्या निर्मितीत माझ्या पेक्षा जास्त काळजीने सहभागी झालेले अक्षरमुद्रा प्रकाशनचे श्रेयसी आणि भरद्वाज रहाळकर, ज्यांच्या रेखाटनामुळे पुस्तक आकर्षित झालं, ते धनंजय गोवर्धने या सर्वांची मी ऋणी आहे.

सर्वात शेवटचं पण तितकच महत्वाच म्हणजे माझ्या या कामामुळे ज्यांच्यावर कायम अन्याय होतो त्या माझ्या मुली किर्ती, कल्याणी, तसेच माझा जीवनसाथी मनोहर या सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद !

- अनिता पगारे

sangini.mk16@gmail.com / pagare.anita@gmail.com


60 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922