Search

वस्तीवरचा शाहरुख

आमच्या वस्तीत एक दिवस सकाळी सकाळी गडबड झाली. गडबड तशी नेहमीच होत असते. त्याशिवाय सकाळ झालेली ‘जाणवत नाही’; परंतू आजची गडबड मात्र काही वेगळीच असावी. कारण लोक हसत ही होते आणि चिंतेतही होते. चौकशी केली तेव्हा पहिल्यांदा खूप हसले, नंतर मात्र चिंता वाटायला लागली. ती आज पर्यंत गेली नाही.

आमच्या वस्तीत एक शाहरुख नावाचा मुलगा राहतो. शाहरुख हे त्याला वस्तीने प्रेमाने दिलेलं नावं. त्याच मूळ नाव सलीम. त्याला आम्ही आवडीने सलम्या म्हणतो. आमच्या वस्तीमध्ये प्रत्येकाला वस्तीने सर्व संमतीने काहीनाकाही नाव बहाल केलेले असते. काहीना लाल्या, बारदान्या, डोळ्या, बाळ्या, मंत्री तर काहीना टकल्या, झिब्बो, डूप्या, झिक्या, नान्या, सुऱ्या अशी नावे दिली जातात.

आमचा हा शाहरुख दिसायला एकदम ‘त्या’ शाहरुख सारखाच. सिनेमात शाहरुख आला, तो टॉप ला गेला तशी आमच्या शाहरुखची किमत वाढली. त्याच वागणं, बोलणं, चालणं, राहणं एकदम बदललं. शाहरुख खानचे डायलॉग तो सहज बोलायला लागला. बोलण्याच्या पद्धतीत आता ‘क-क...किरण’ असा बदल झाला.

आमचा हा शाहरुख गॅरेज मध्ये कामाला. घरी विधवा आई. भावंड नाही. घर अस की आत गेल्या गेल्या कोणी म्हंटल नाही तरी कंपलसरी बसावच लागतं. घरात प्रवेश तुम्ही नम्र झालात तरच मिळतो. ताठ मानेने जायचे ठरवले तर दारातच तुमच्या डोक्याला लागेल आणि तुम्हांला प्रवेश नाकारला जाईल. आई भाजीच छोटसं दुकान लावते. त्यातूनच घर चालत. शाहरुख वर घराची तशी काही जबाबदारी नसल्यामुळे त्याला मिळणार सर्व उत्पन्न तो स्वतःला शाहरुख खान सारख ‘मेंटेन’ करण्यासाठी खर्च करतो. त्याच्या सारखेच बूट, त्याच्या सारखीच हेअरस्टाईल, त्याच्या सारखेच कपडे करुन जेव्हा आमचा शाहरुख बाहेर पडतो, विशेषतः कॉलेज रोड वरुन गॅरेज मध्ये दुरुस्ती साठी आलेल्या गाडी वरून जेव्हा तो जातो, तेव्हा चांगल्या ‘चांगलीं’च्या नजरा फिरतात. आता तुम्ही विचार करीत असाल, गाडीच समजलं, Now what about dress? अरे, अगदी सोपं उत्तर आहे. आमची वस्ती ओलांडली की लगेच पलीकडेच ‘स्ट्रीट बाजार’ आहे. तिथ जायचं. आपल्या मापाच्या आसपासचे कपडे, बूट घ्यायचे. ताबडतोब उभे राहून, अंगावर माप देऊन शिवून घ्यायचे. बूट ही तिथेच व्यवस्थित शिवून, पॉलिश करुन घ्यायचे.. Now ready for Show! ह्या ‘स्ट्रीट’ बाजारामध्ये अमिताभ पासून शाहरुख पर्यंतचे सर्वांचे कपडे वरच्या फार्मुल्या प्रमाणे शिवून घेता येतात.

आमचा हा शाहरुख असा मेकअप करुन रोज कॉलेज रोड वर फिरायला जायचा. तिकडून आला की चौकात बसून शाहरुखचे डॉयलॉग पोरांना ऐकवून ‘टाईम पास’ करायचा. एकदा पोरानी त्याच शाहरुख प्रेम टेस्ट करायचं ठरवलं. त्याला शाहरुख ला एक पत्र लिहायला सांगितलं. त्याच्या वर ‘मायापुरी’ तून पत्ता टाकला. पोस्टात टाकू अस सांगून ते पत्र त्याच्या कडून घेतलं. साधारण आठ दहा दिवसांनी त्याच्या नावावर एक पत्र आलं. पोस्टाने एखाद्याच्या नावावर पत्र येणे ही आमच्या वस्तीमध्ये खूप कुतूहलाची गोष्ट असते. त्यात शाहरुख ला पत्र म्हंटल्यावर सगळ्यांनाच उत्सुकता! सगळेजण जमले. त्यात पत्र लिहिणारे ‘ते’ मित्रही होते. पण ते ही उत्सुकतेत सहभागी असल्याचे नाटक करीत मनातल्या मनात हसत होते.

एका शिकलेल्या मुलाने ते पत्र फोडलं. तुम्हांला खाजगी पत्र फोडल्याचा राग येतो. आमच्या कडे ‘खाजगी’ काहीच नसतं. सगळच चव्हाट्यावर! पत्र त्याने मोठ्याने वाचलं. सगळे एकदम खूष! आमचा शाहरुख कामावर गेला होता. २-४ पोर गॅरेज वर पळत जाऊन शाहरुखला आहे त्या अवतारात पळत घेऊन आले.

शाहरुख ने एक एक शब्द जुळवून ते पत्र वाचलं आणि आनंदाने नाचू लागला. अस काय होत त्या पत्रात? ते पत्र अस तस नव्हतं. चक्क हिरो शाहरुख खानने आमच्या शाहरुख ला मुंबईला त्याचा डमी म्हणून भेटायला बोलावल होतं. अरे हो, एक सांगायचं राहीलच ‘त्या’ पोरांनी याचा एक शाहरुख खान स्टाईल फोटो ही आठवणीने त्या पत्रा सोबत पाठवला होता.

झालं.. त्या दिवसापासून आमचा शाहरुख मुंबईला जायच्या तयारीला लागला. कपडे, बूट, सुटकेस, पैशांची जमवाजमव करायला सुरुवात झाली. डॉयलॉग नीट पाठ करायला लागला. सगळी वस्ती त्याच्या कामात त्याला मदत करीत होती.

जाण्याचा दिवस जवळ येत होता. त्याच्या आदल्या दिवशी घरात गोडधोड जेवण झाले. उद्या शाहरुख मुंबईला जाणार, त्या आनंदातच वस्ती गाढ झोपली. तो रात्री जेऊन, आईला झोपवून आपल्या कट्ट्यावरच्या मित्रांना शेवटच भेटण्यासाठी गेला. तो आपली स्वप्न मित्रांना सांगत होता. त्याने गॅरेजचे कामही सोडले होते. मालक काम करुन घेतांना त्याला खूप शिव्या द्यायचा. कधी कधी तर मारायचाही. ते त्याला आज पर्यंत कधी जाणवले नाही. पण आज मात्र त्याला हे सर्व आठवत होतं. मालकाला शिव्या देत देत आज पर्यंत मनात दाबून ठेवलेले प्रसंग तो एक एक करीत सांगत होता. त्याची ती परिस्थिती पाहून त्याची टेस्ट घेणारे ‘ते’ मित्र मात्र मनातून खूप घाबरले. त्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि खरे सांगून टाकायचे असे ठरवले. शाहरुख मुंबईला गेल्यानंतर काय अपघात होवू शकतो हे त्यांना जाणवायला लागलं होतं. आपली चेष्टा एकाबाजूला राहिली आणि भलतच घडत गेलं. ते थांबवायचं अस त्यांनी ठरवलं. त्यांनी हिम्मत केली आणि ते पत्र शाहरुख खानने पाठवलेले नसून आम्हीच पाठवलं होतं अस सांगितलं. आमचा शाहरुख ढसाढसा रडला. कोणालाच काय कराव सुचेना. सगळेच शांत बसलेले. शाहरुख उठला, डोळे पुसले आणि जड पावलांनी कोणाशी काहीही न बोलता तसाच घरी निघून गेला. बाकी सगळी मुलं स्वतःच्या मूर्खपणाला शिव्या घालत आपापल्या घरी गेली.

सगळ्या समोर शाहरुख घरी तर गेला. सकाळी वस्ती झोपेतून जागी झाली तीच मुळी त्याच्या आईच्या रडण्याने! सगळी वस्ती डोळे चोळत जमा झाली. तसेच त्याचे ते मित्र ही अर्धवट झोपेत तिथे आले. त्याची आई रडत रडत शाहरुख घरातून रात्रीच कुठेतरी गेला असे सांगत होती. त्या मुलांनी घाबरत घाबरत सगळा प्रसंग समजावून सांगितला. माफीही मागितली. आता सगळेच खडबडून जागे झाले. शाहरुख ची शोधाशोध सुरु झाली. ज्याला तिकडे सुचेल तिकडे तो तो शोधायला जात होता. आया बाया त्याच्या आईला शांत करीत होत्या.

तेवढ्यात एक लहान मुलगा ‘‘शाहरुख सापडला, शाहरुख सापडला’’ असा ओरडत आला. सगळी वस्ती त्याच्या मागून पळत गेली. आमचा शाहरुख त्याच्या गॅरेज समोर मोठ्याने ‘क..क..किरण’ म्हणत होता. सर्वांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्याला घरी तर आणल, पण शरीराने घरी आलेला शाहरुख मनाने मात्र ‘क..क..किरण’ म्हणत केव्हाच मुंबईला पोहोचला होता.

33 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922