Search

सण- उत्सव आणि युवा


काल आमच्याकडे बालमानस शास्त्र जाणणारे, संवेदनशील असणारे एक प्रसिद्ध कार्यकर्ते आले होते. ते खास गप्पा मारण्यासाठी प्री अपॉइंटमेंट घेवून आले होते. सकाळी त्यांचा हेच विचारण्यासाठी फोन आला तेंव्हा पासून माझी चलबिचल चालू होती की, ते येतील तेंव्हा माझ्या भाच्याचं काय करु? माझ्या भाच्यांना खूप वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी खूप खेळाव लागतं, त्यांना प्रचंड प्रश्न असतात तेवढ्या सर्व प्रश्नाचं न थकता उत्तर द्यावं लागतं. ते जगातल्या कुठल्याही वस्तू, प्रसंग, शब्द, फोटो इ.इ. (हि यादी प्रचंड मोठी आहे) कशा बद्दलही, कशा वरुनही प्रश्न विचारु शकतात. माझ्याशी बोलताना त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नसतो. त्यांना घरातल्यांनी माझ्या संदर्भात कितीही घाबरवल तरी ते मला अजिबात घाबरत नाहीत. मी किती महान आहे हे घरच्यांनी कितीही पटवलं तरी ते पटतच नाही. त्यांच्या दृष्टीने मी त्यांची ‘आत्या’ आहे विषय संपला.

जेंव्हा जेंव्हा मी माझ्या भावाकडे असते तेव्हा तेव्हा त्यांच्या घरात आमचा प्रचंड दंगा, हसी मजाक, मस्ती सुरु असते. मला प्रचंड हसायला आवडतं, हसणाऱ्या व्यक्तींना बघायला आवडतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी माझ्या गौरवाच एवढ का लिहिते आहे. तर कारण तितकच महत्वाच आहे आणि जे जे कोणी ते कारण समजावून घेईन आणि ते आत्मसात करेन त्या सर्वांच आयुष्य आनंददायी होईन. वरती म्हणाले तसं ते माझे विचारवंत मित्र वेळेवर माझ्या घरी पोहोचले. आमच्या गप्पा तर सुरु झाल्या पण माझ्या भाच्यांचा हस्तक्षेप काही कमी होईना. ही मुल सारखी काहींना काही कारण काढून आमच्या चर्चेत व्यत्यय आणत होते. मी खुणवून पाहिलं, त्यांना समजावून पाहिलं, हसत हसत रागावून पाहिलं परिणाम शून्य.

त्या माझ्या मित्राने मात्र माझ्या तीनही भाच्यांना जवळ बोलावलं.त्यांची नांव, शिक्षण, शाळा, शाळेची वेळ, सुट्ट्यांचे दिवस, आईवडील काय नोकरीत/ व्यवसायात आहे, खेळायला काय आवडतं, काय काय करायला आवडतं? असे बरेच प्रश्न सहजपणे विचारत माहिती घेतली. पुढे त्याने त्या तिघानाही अस काही कामं दिले की, साधारण ४५ ते ५० मिनिटे माझ्या भाच्यांचा कलकलाट थांबलेला होता. एक तासा भराने माझ्या भाचीने कागदाचे एक छान डिझाईन करुन आणले होते. एका भाच्याने १०० असे जनरल नॉलेजचे प्रश्न लिहून आणले होते जे त्याला महत्वाचे वाटतात आणि त्यातल्या सर्वात मोठ्या भाच्याने १५ इंग्रजी सिनेमांचे नांवे, तसेच थोडक्यात त्याची स्टोरी जे सिनेमे त्याने यु ट्यूब वर, पेन ड्राइव्ह द्वारे मित्रांकडून आणून किंवा त्यांचे सोबतच पाहिले होते. हे सिनेमे पाहताना घरातलं कोणीही मोठं बरोबर नव्हतं.

माझ्या त्या मित्राच्या प्रती आदर खूपच वाढला. त्याच्या या कृतीच विश्लेषण जेव्हा त्यानेच मांडले तेव्हा लक्षात आले की, शाळकरी वयाच्या मुलांमध्ये प्रचंड ताकद, उत्सुकता आणि कृतिशीलता असते. ती ताकद योग्य तऱ्हेने वापरली गेली नाही की घरात तोडफोड होते. त्यांची उत्सुकता योग्य पद्धतीने शमवली नाही तर त्यांच्या डोक्यात अनुत्तरीत प्रश्नांची गर्दी वाढते. मग ती गर्दी जेंव्हा ओव्हरफ्लो होते तेव्हा नको त्या व्यक्तीला प्रश्न विचारुन उत्सुकता शमवली जाते किंवा स्वतःच कुठलं तरी लॉजिक कशाला तरी लावून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या वयातली मुलं प्रचंड कृतीशील असतात. त्यांच्या त्या त्या कृती सतत समजावून घेतल्या पाहिजे . तर बऱ्याच वेळा घरातले वयस्कर आजी- आजोबा किंवा पालक अज्ञाना पोटी विचित्र आरोप करत मुलांना रागावतात. म्हणजे माझ्या भाच्याच्या बाबतीत माझ्या आई बाबांची सारखी तक्रार असते की तो शाळेतून आला की काहीतरी इंग्रजी पहात असतो. हे तक्रार त्यांनी जशी वारंवार त्याच्या मम्मी पप्पांकडे केली तशी माझ्या कडेही केली होती. त्याच्या मम्मी पप्पांनी त्याला पहिल्यांदा साध्या पद्धतीने , नंतर टिपिकल पालकांच्या पद्धतीने समजावलं. मला माझा भाचा काय पाहतो याची उत्सुकता होती पण मी कधीच क्वालिटेटिव्ह टाईम काढून त्याच्या बरोबर सिनेमा पहायला बसले नाही. बर तो माझा भाचा मला अशा छान डिटेक्टिव्ह सिनेमांबद्दल कायम सांगायचा. मी त्याच्या बरोबर वेळ न घालवल्यामुळे तो डिटेक्टिव्ह सिनेमे बघतो जे त्याला आवडतात हे मी समजूच शकले नाही. इंग्रजी सिनेमात बायका कमी कपड्यात असतात कारण तो त्यांच्या नियमित पेहेरावाचा भाग आहे, आणि माझा तो भाचा त्या पेहेरावाकडे पहात देखील नाही हे मी माझ्या पालकांना समजावू शकले नाही त्यामुळे आपला नातू बेकार काहीतरी पहातो हा गैरसमज दूर न होता तो वाढतच गेला.

कमी अधिक फरकाने बऱ्याच घरांमध्ये असच घडत असत आणि हळूहळू मग मुल – पालक- आजी आजोबा यांच्यातली दरी वाढतच जाते आणि मग असे तीन ग्रहांवर राहणारे लोक एकाच घरत आरडाओरडा करत किंवा मुके होवून दिवस ढकलत असतात असे दिसते. प्रश्न फक्त एवढाच नाही. पुढे हीच नाराज मुल समवयस्क मुलांच्या घोळक्यात जमा होतात. सर्वांचे असच काहीतरी कच्च पक्क दुख एकत्र येत, गॅंग घट्ट होत जाते आणि मग पहिल्यांदा गम्मत म्हणून सुरु केलेली मजा कधी व्यसनांच्या आहारी घेवून जाते हे त्यांनाही कळत नाही किंवा कुठल्यातरी भाऊ- दादा- नानाच्या टोळीच्या तरी आहारी जातात.

मागच्या लेखात मी शेतातून दमलेल्या युवांचा जत्रा किंवा उरुसा सारख्या गर्दीच्या ठिकाणचा सहभाग नोंदवला होता. गणपती संपले की उरुस आणि उरुस संपतो तोच नवरात्री सुरु होतात. इकडे गावो गावाची तरुण मंडळी टेम्पो, ट्रक्स मध्ये इकत्र जमतात. सर्वांच्या अंगात गणपती किंवा ‘आदिवासी दिवसाला’ शासनाने वाटलेले सारखे टी शर्ट असते. डोक्याला भगवी पट्टी तीवर बरोबर जय श्रीराम असे लिहिलेले असते. असलेल्या सणाचा आणि त्या जय श्रीरामचा काय संबंध हे कोड जेव्हा श्रीराम भक्त सत्तेवर आले तेव्हा कळले. अशा या गाडीतून जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर मोठा भोंगा कर्ण कर्कश आवाजात गाण ऐकवत असतो. गाण्यातले शब्द देवाच्या नावाचे असतात पण ज्या ठेक्यावर गाणे बेतलेले असते ते मात्र कुठल्या न कुठल्या प्रसिद्ध सिनेमाचे डोलवणारे गाणे असते. मोखाडा, जव्हारच नाही तर अगदी त्रिंबक, हरसूल यासर्व भागांकडून मोठ्या प्रमाणात ही तरुण मंडळी अशा गाड्या करुन डहाणू च्या देवीकडे जावून मशाल घेवून, ती मशाल पायी नाचवत नाचवत आपापल्या गावी नेऊन चौकात बसवतात.

ह्या सर्व आयोजनाचे पैसे कोण? किती? आणि का देतो? हा पुन्हा मोठाच अभ्यासाचा विषय आहे, तो परत कधीतरी यावर बोलू. पण आता लक्षात आलेली गोष्ट अशी की शहरातले मोठे मोठे इवेंट पासून तर आता ह्या कुपोषित भागात हि मी पहात आले आणि लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ह्या सर्व आयोजनात होणारा प्रचंड खर्च. आता फक्त शहरातच नाहीतर गावांमध्ये हि आर्केस्टा असतो. आत आत मधल्या मध्यवर्ती गावात मधल्याच चौकात मोठा मांडव घातलेला असतो आणि आजूबाजूचे सर्व तरुण तरुणी छान सजून धजून ह्या जागरणा साठी मनोभावे आलेले असतात. बर अशा ठिकाणी जाण्याला घरातले ही विरोध करीत नाहीत. फारतर फार बरोबर येतील. आमच्या कडे तर आतल्या पाड्यांवरचे लोक असे गट करुनच येतात आणि रात्री उशिरा एकत्र परत जातात. मी स्वतः नास्तिक असल्यामुळे देवाच्या नावावर चालणाऱ्या या सर्व अंधाधुन्दीचा मला फारच राग यायचा. पण मनोरंजनासाठी एकट्यात पुस्तक वाचायला त्यांना आवडतं नाही हा काही त्या लोकांचा दोष नाही होऊ शकत. बिगर आदिवासी शिक्षकांच्या कधीतरी शाळेत येण्याच्या सवयीमुळे जेंव्हा शिकण्याची आवड लागण्याची शक्यता होती तेव्हा संधी न मिळालेले आमच्या कडचे अनेक आदिवासी मुल पुढे कायमस्वरूपी शिक्षणातून बाहेर पडतात किंवा कोणीही नापास नाही ह्या चुकीचा अर्थ घेवून बजावण्यात आलेल्या निर्णयामुळे ही मुले पास होतात पण स्वतःचे नाव सुद्धा व्यवस्थित लिहू शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर यांना काय तुम्ही निर्गुण निराकार देव असतो, गरजा भागवण्यासाठी देवाची नाही आपल्या आपण कष्टाची गरज असते हे कसे शिकवणार हा मोठाच चँलेज आहे.

म्हणून त्या त्या वयात जबाबदार सर्वानीच आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वच मुलांची एनर्जी, कृतिशीलता समजावून घेतली पाहिजे मग ते मुल स्वतःच असो की तुम्ही शिकवत असलेल्या आश्रम शाळेतील असो किंवा तुम्ही शासकीय कार्यालयात असाल जिथून ह्या सर्व कामाला वेतन, अनुदान जात असेल अशा सर्व ठिकाणच्या मुलांना रागवण्यापेक्षा किवा सगळीकडे मोकळे सोडून देण्यापेक्षा त्यांचेशी वेळेत, त्याचे भाषेत, त्यांच्या कलेने घेतले पाहिजे तेव्हाच देवाचे, सणांचे किंवा त्या बरोबरीने उभ्या राहणाऱ्या जिवंत माणसांच्या प्रस्थेचे अवडंबर थांबेल. याचा अर्थ माझा तुमच्या देवाला विरोध आहे असे नाई पण एकदा देव रस्त्यात किती, कधी आणि का मिरवायचा? याचा विचार करायला सर्वांनी शिकायलाच लागेल याची जाणीव व्हावी त्यासाठी हे विवेचन.

अनिता पगारे, जव्हार

Pagare.anita@gmail.com

4 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922