Search

सन्मान अर्थ

सद्या जव्हार मोखाड्यात काम करते आहे. मी राहते जव्हार शहरात आणि काम सुरु आहे पाथर्डी, आमले, कुर्लोद, बोटोशी या भागात. त्यामुळे बऱ्यापैकी प्रवास होतो. लोकांना भेटण, बोलन होत असत. अस म्हणतात त्या समाजाचा तरुण वर्ग कशात गुंतलाय यावर त्या समाजाचे भविष्य ठरत असते. आमच्या भागातील गरिबी, कठीण भौगालिक रचना, उपलब्ध असलेल्या यंत्रणा यासर्वांची गोळा बेरीज केली तर आयुष्य खूप अवघड आहे असे दिसते. मी आता पर्यंत जेवढे काम केले आहे नोकरी निमित्त, आवड म्हणून, कुठल्या तरी प्रशिक्षणा साठी म्हणून जेवढा प्रवास केला आहे तो सर्व जेन्डर समजून घेण्यासाठी. त्यातले खाचखळगे, त्याचा लोकांच्या जीवन मानावर होणारा परिणाम आणि त्यातून तयार होणारी विषमता दूर करण्यासाठी लोकांच्या आणि स्वतःच्याही जेन्डर या मानसिकतेवर काम करणे ही माझी आवड आहे. आज आपण जेन्डरचा व्यक्तीच्या कमावण्यावर कसा परिणाम होतो हे समजावून घेणार आहोत.


काल मी काही कामासाठी जव्हार वरुन मुंबईला येत होते. भल्या पहाटे तुम्हाला मुंबईला पोहचायचे असेल तर चार चाकी शिवाय पर्याय नाही. आमच्या कडे बसेस ची आणि एकूणच वाहतूक व्यवस्थेची फार चांगली परिस्थिती नाही. त्यामुळे मी एकटीच आणि माझा वाहक असे गाडीतून जात होतो. गाडी ऑफिसला आली आणि मी निघाले तर ज्या ट्रव्हल्सची आम्ही नेहमी गाडी वापरतो त्याच्या मालकाचा पोरगाच स्वतः गाडी चालवत होता. मला फारच आश्चर्य वाटलं. आता प्रवास चार तासाचा, तो घाटातून तेव्हा तुम्हाला मळमळ होऊ द्यायची नसेल तर प्रवासात तुम्हाला पूर्ण झोपता आल पाहिजे किंवा जगातल्या सर्व विषयावर ड्रायव्हर ह्या जमातीशी बोलता आलं पाहिजे. मला आता अनुभवाने दोन्हीही जमायला लागले आहे. पण आज मला उत्सुकता होती की हे एवढया पैशा वाल्याच देखण पोरग गाडी चालवायला का आलं?

मी त्याला सहजच प्रश्न केला, आज तू स्वतःच? ड्रायव्हर आज आला नाही का? “नाही मीच आज त्याला बोलावलाच नाही. माझ हि एक काम ठाण्यात होत तुम्हालाही तिकडेच जायचं होत म्हंटल चला आपणच जाऊ. पैसे पण मिळतील, कामही होईल, घराचा धंदा ही होईल आणि घरातच जास्त पैसे येतील” त्याच अगदी सहज उत्तर. त्याचा हा स्वभाव काही आताच्या तरुण पोरांना मॅच होणारा नव्हता. मी रोज बघते, कॉलेजमध्ये येणारे तरुण मग ते आदिवासी भागातले असो नाहीतर शहरी किंवा ग्रामीण भागातले असो कोणाची तरी गरज म्हणून ते शिक्षण घेतात. सरकारने शाळा सुरु केल्यात, घरातले आग्रह करतात म्हणून ते कॉलेजला येतात. पहिलीच्या मुला-मुलींची हि अवस्था मी समजूही शकते कारण शिक्षणाच महत्व समजावून घेण्याचे ते वयच नाही. पण शिक्षण हे आनंदासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी, जगण्याचे अर्थ समजावून घेण्यासाठी असत हे सांगायला, शिकवायला आपण सगळेच अयशस्वी झालो. त्यामुळेच आपण शिक्षण आनंदाने घेता येईल याची व्यवस्था करू शकलो नाही. शाळेत जायचे म्हणून लहान मुलेही रडतात आणि मोठेही. ज्या कॉलेज मध्ये मुल- मुली एकत्र आहे तिथे त्या एका मोठ्या आकर्षणा पायी उपस्थितांची संख्या जरा बरी असते. फक्त शिकायला या असे म्हंटले असते तर किती मुल फक्त मुलांच्या कॉलेज मध्ये आणि फक्त मुलींच्या कॉलेज मध्ये किती मुली नियमित आल्या असता याचा विचार न केला तर बरे.


आमच्या गप्पा छानच रंगल्या होत्या. माझ्या गाडीचा ड्रायव्हर काम मालक खूपच हुशार, चौकस आणि सतत माहिती घेण्याची इच्छा असलेला होता. त्याच्या कडे खूप माहिती होती. त्याला आजचा डॉलरचा भाव माहित होता. कुठल्या देशात कोणते चलन, भाषा चालते हे त्याला माहित होत. त्याने त्याचा पासपोर्ट काढला आहे कारण त्याला परदेशात जावूनच काही गोष्टी पहायच्या आहेत. आमची गाडी जरा मी कशाही साठी थांबवली की हा लगेच मोबाईल काढून पाहत होता. मला पहिल्यांदा राग आला, आताची तरुण पोर माणसापेक्षा मोबाईलशीच जास्त बोलतात अस बरच काही मनात आलं. पण त्याच उत्तर ऐकून प्रत्येक मोबाईल बघणार वाईटच अस जे आज पर्यंत वाटत होत ते किती चूक आहे हे लक्षात आल. तो म्हणाला तुम्ही विचारलं ना की मला एवढी माहिती कुठून मिळाली तर त्याच उत्तर आहे ह्या मोबाईल मधून. मॅडम, ठरवलं तर हे यंत्र खूप कामाच आहे तुम्ही त्याच्या द्वारे माहिती काढली तर जगातली कुठलीही माहिती घर बसल्या मिळू शकते आणि आज च्या जमान्यात माहिती हेच उत्पनाचे साधन आहे, माहिती मुलेच आपले आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते. जेवढी माहिती जास्त आणि ती माहिती कुठे वापरायची हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तुमच्या पायावर लवकर उभे राहतात आणि इतरांसाठीही रोजगार निर्मिती करु शकतात. मॅडम, माझा अर्ध्यापेक्षा जास्त व्यवसाय हा माहितीच्या आधारावर चालतो. आपल्याकडे लोकांना कुठे तरी फिरायला कामासाठी जायचे असते त्यांना मी ह्या मोबाईल द्वारा मदत करतो. त्याच्या निमित्ताने मला शोध लागला की मुलांना मोबईल वरून रागवण्यापेक्षा त्यांना याचा वापर करावा कसा हे शिकवलं पाहिजे.


दुसर कायम मला एक गोष्टीच वाईट वाटत ते म्हणजे मुल आणि पालक यांचा कुठल्याच प्रकारचा संवाद नसतो. बोलणच होत नाही तरुण मुलांशी पालकांचं. कॉलेजला नेमक काय घडत हेच बऱ्याच पालकांना माहित नसत. काहीही विचार न करता डिमांड सप्लायच नात फक्त दिसून येत. मुल काहीतरी मागणी करतात आणि पालक त्या संदर्भात मुलांशी काहीही न बोलता त्यांना त्या त्या वस्तू आणून देतात. यात पालक किंवा आपला समाज प्रचंड विषमतावादी आहे. यात मुलीना एक न्याय आणि मुलांना एक न्याय असतो बर का आणि हे चित्र सगळीकडे सारखं आहे. मुलीना तिच्या मैत्रिणींबरोबर फक्त सिनेमा बघायला जायचे असेल तरी परवानगी नाही आणि मुलांना मात्र ते म्हणतील तेवढे महाग बूट, कर्ज काढून गाडी घेतील. त्या गाडीच्या पेट्रोल साठी रोज पैसे देतील. मग अशी मुल नुसती टवाळक्या करीत फिरतील नाहीतर काय करतील? जव्हार सारख्या ठिकाणी अतिशय महागड्या गाड्या जेव्हा घेवून तरुण पोर रस्त्यात उभी असतात तेव्हा मला फार आश्चर्य वाटत. तुम्ही म्हणाल जव्हारच्या पोरांना जीव नाही का? त्यांना पण हौसमौज असते ना ! अगदी खर मला हि अस वाटल आणि मग चौकशी केली तर कळल एकुलता एक मुलगा, सहा मुलींच्या पाठीवर झालेला, नवसाचा म्हणून कर्ज कडून गाडी घेवून देणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय आहे. सिनेमा पहिला तर मुली बिघडतील मग अशी फुकटची गाडी मिळाली, फुकटच पेट्रोल मिळालं तर मुल नाही का बिघडणार? म्हणून बिघडलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. शास्त्र अस म्हणत की ज्या गोष्टीत माझी गुंतवणूक नाही त्या गोष्टीची मला किंमत ही नसते.


यातून काही गोष्टी मला सर्वांसमोर मांडायचे आहे एक म्हणजे तुम्ही पालक असाल तर मुलांना फुकटच्या अशा गाड्या, कपडे, बूट देऊ नका. सतत मुलांशी बोला. तुम्ही तरुण असाल तर काही विनंती आहेत. फुकटच खायचं ज्यादिवशी तुम्ही थांबवलं त्यादिवशी तुमच आयुष्य अधिक आनंदी व्हाल. मग ते फुकटचे कपडे असो, बूट असो, खाण असो नाहीतर गाडी असो. दुसर मोबईल तुमच्या हातात आहे त्याचा स्वतःच्या कामासाठी, पैसे कमावण्यासाठी कसा वापरता येईल, ज्ञान वाढवण्यासाठी कसा वापरता येईल याचा विचार कार्याला हवा. ह्यालाच मला सन्मान अर्थ अस म्हणायचे आहे. अर्थ म्हणजे पैसा आणि तो सन्मानाने मिळवावा म्हणजे स्वतःचा सन्मान असे मला म्हणायचे आहे.

3 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922