सोशल मिडिया आणि महिला
कुणीतरी ती सोशल मिडियावर एखादी पोस्ट लिहिते. विषय स्त्रियांबद्दल, धर्माबद्दल, राजकारणाबद्दल, नातेसंबंधांबद्दल किंवा अजूनही कशाही बद्दल..ती तिचं मत मांडत असते आणि अचानक काही पुरुष तिने मांडलेल्या मतावरून तिच्याच वॉलवर येऊन तिच्याबद्दल असभ्य बोलायला सुरुवात करतात. धमक्या देतात. लैंगिक ताशेरे मारतात. एखादीने तिचे फोटो टाकले तर त्यावरून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. एखादीने सरकारच्या एखाद्या योजनेवर टीका केली तर तिला मारून टाकण्याची किंवा तिच्यावर बलात्कार करण्याची जाहीर धमकी देतात. एखादीने स्त्रियांच्या समस्यांविषयी लिहिले तर तिला बाजारू म्हणून मोकळे होतात. एखादीने समाजातल्या चुकीच्या प्रथांवर भाष्य केले तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याची परवानगी मिळाल्याप्रमाणे काही पुरुष वागायला लागतात. कुणीतरी एखादीला अश्लील मेसेज करतं. दुसरा कुणी दुसऱ्या एखाद्या स्त्रीविषयी अश्लील लेखन करून तिच्याच एखाद्या मैत्रिणीला पाठवतो. कुणी एखादा सरळ सरळ लैंगिक संबंधांची मागणी वारंवार करत राहतो….हे सगळं अगदी सर्रास सोशल मिडियावर चालतं. तुम्हा वाचकांपैकी जे कुणी सोशल मिडियावर नियमित असतील त्यांना ही गोष्ट माहित असेल. हा सोशल मिडिया छळ फक्त स्त्रियांचा होतो असं नाही; पुरुषांचाही होतो. पण प्रमाणाचा विचार केला तर स्त्रियांचा होणारा सोशल मिडिया छळ कितीतरी अधिक प्रमाणात आहे. या विधानाला आता शास्त्रीय अभ्यासाचीही जोड आहे. नुकताच 'ऍम्नेस्टी इंटरनॅशनल' ने एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं आहे. या सर्वेक्षणानुसार दर पाच स्त्रियांपैकी एकीला सोशल मिडिया अब्यूजला सामोरं जावं लागतं. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. चार हजार स्त्रियांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. या सोशल मिडिया अब्यूजमध्ये लैंगिक ताशेरे, शारीरिक आणि लैंगिक हिंसेच्या धमक्या यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. विशेषतः स्त्रिया जेव्हा धर्म, पंथ, लैंगिक अग्रक्रम, राजकारण याविषयी लिहितात, किंवा त्यांचे फोटो शेअर करतात त्यावेळी अशा प्रकारच्या लैंगिक छळाला त्यांना सामोरे जावे लागते.
ऍम्नेस्टी रिसर्च ऑन टेक्नॉलॉजी अँड ह्युमन राईट्सच्या प्रमुख 'अझमीना द्रौडिया' यांच्या मतानुसार, 'इंटरनेट हि जितकी उपयुक्त गोष्ट आहे तितकीच ती अतिशय भीतीदायक, धोकादायक आणि मनावर दीर्घकाळ परिणाम करणारीही गोष्ट आहे. सोशल मिडियावर ज्या अब्यूजला त्या सामोऱ्या जातात त्यानंतर साइन आउट झाल्यानंतरही त्याचा झालेला त्रास संपत नाही. जेव्हा एखादीला खुनाची किंवा बलात्काराची धमकी खुलेपणाने सोशल मिडियावर दिली जाते तेव्हा तिथून आईनं आउट केल्यानंतरही रोजचं आयुष्य जगणं त्या स्त्रियांना कठीण होऊन बसतं. सतत कुणीतरी आपल्याला मारेल किंवा आपल्यावर बलात्कार करेल ही भीती घेऊन जगणं सोपं नाही. स्वतःचे विचार खुलेपणाने मांडण्याची फार मोठी किंमत स्त्रियांना सोशल मिडियावर मोजावी लागते आहे.' काही वर्षांपूर्वी इंटरनेट डेमॉक्रसी प्रॉजेक्टच्या वतीने एक सर्वेक्षण भारतात करण्यात आलं होतं. त्यात असे दिसून आले कि सोशल नेट्वर्किंगच्या माध्यमातून स्त्रियांवर लैंगिक ताशारे मारणं, त्यांना धमकावणं , त्यांचा शाब्दिक छळ करणं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, अश्लील शेरेबाजी करणं, बलात्काराच्या धमक्या देणं असे प्रकार वाढत चालेल आहेत. ऍम्नेस्टी रिसर्चमध्ये ज्या ४००० स्त्रियांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी ४१ टक्के स्त्रियांना या सोशल अब्युजनंतर रोजच्या वास्तव आयुष्यातही अतिशय असुरक्षित वाटतं. अझमीना द्रौडिया हा रिसर्च मांडताना अजून एक मुद्दा अधोरेखित करतात, 'सोशल मिडिया चालवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या व्यासपीठावर येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीरपणे हाताळला पाहिजे. त्याकडे अधिक लक्ष देण्याची आज गरज आहे.'
आज ऍम्नेस्टीचं सर्वेक्षण समोर आलं आहे उद्या अजून कुठल्या संस्थेचं येईल. पण या सगळ्यातून एक गोष्ट मात्र ठळक होते कि जगभर सर्वत्र स्त्रियांना सोशल मिडिया अब्यूजला सामोरं जावं लागतंय. तुम्ही समाजाच्या मान्यताप्राप्त चौकटीत बसेल इतकंच आणि असंच सोशल मिडियावर लिहीत असला तर तुमच्यावर त्या मानाने हल्ले कमी होतात पण जर या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही लिहायला लागलात, फोटो शेअर करायला लागलात की ताबडतोप सोशल मिडिया अब्यूजला सुरुवात होते. एखाद्या नाक्यावर उभं राहून एखाद्या स्त्रीची छेद काढणं आणि सोशल मिडियावर छेड काढणं यात फारसा फरक नसतो. मुळात सोशल मिडियावर एका भिंतीच्या पलीकडून व्यक्ती वार करत असतो. त्यामुळे प्रत्यक्षात छेड काढण्यापेक्षा हे त्याला सोपं वाटतं. शिवाय बहुतेक स्त्रिया असा छळ झाल्यानंतर पोलिसांकडे न जाता त्या व्यक्तीला ब्लॉक करणे, अनफ्रेंड करणे किंवा स्वतःचा सोशल मिडिया वावर सीमित करून टाकणे हा पर्याय निवडतात. त्यामुळे बलात्काराची धमकी, लैंगिक ताशेरे, चारित्र्यहनन करणाऱ्या व्यक्तीला भीती वाटत नाही. आपण काहीही केलं तरी चालतं असा एक समज तयार होतो. अनेकदा स्त्रियांविषयी मनात असलेल्या भावना सोशल मिडियावर उघड होतात. अशा असभ्य व्यक्तींच्या सभ्य प्रतिमेला धक्का पोचत नाही. पण या छळाला सामोरं जाणाऱ्या स्त्रियांना मात्र याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
हे सगळं लिहिलं कि सर्रास एक प्रतिवाद समोर येतो, पण स्त्रियांनी असं काही लिहावंच कशाला ज्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतील? म्हणजे पुन्हा मुद्दा समाजमान्य चौकटीत स्वतःला सीमित करण्याचाच आला कि! तिने उघडपणे समाजासाठी 'आडचणी' च्या मुद्द्यांवर बोलू नये ही पुरातन इच्छा आजही पुरेशी शाबूत आहे. तिने तिच्या लैंगिकतेबद्दल, तिच्या गरजांबद्दल बोलू नये, तिने राजकीय मत मांडू नयेत, तिने जाती व्यवस्थेवर बोलू नये, तिने समान हक्कांवर बोलू नये अशा अनेक मुद्द्यांबाबत समाजाची जी सुप्त इच्छा असते तीच अशा लोकांच्या वर्तनातून अनेकदा व्यक्त होत असते हे विसरता काम नये.
मुद्दा एका व्यक्तीने एका स्त्रीचा छळ करणं हाच नाहीये फक्त मुद्दा आहे तो समाज म्हणून, समुदाय म्हणून आपल्या सोशल मिडिया वर्तनाचा. आपण सोशल मिडियावर काय बोलतो, कसे वागतो, कशा प्रतिक्रिया देतो याचा आणि त्याबाबत आपण अधिक सजग होण्याची गरज आहे.
सोशल मिडियावर वावरताना
काय करा काय टाळा.
१) कुणाला फ्रेंड लिस्टमध्ये जागा द्यायची याचा काळजीपूर्वक विचार करा.
२) अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध असा.
३) ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती असभ्य वर्तन करत असेल तर पुरेशा स्पष्ट शब्दात तुमची नाराजी व्यक्त करा.
३) ब्लॉक हि सेवा तुमच्या सोयीसाठी आहे. तिचा जिथे वाटेल तिथे बिनधास्त वापर करा.
४) सगळ्या पोस्ट पब्लिक ठेवण्याची गरज नसते. सोशल मिडियावरचे सिक्युरिटी फीचर्स समजून घ्या.
५) फेसबुकवर तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे अशी सुरक्षा कवच वापरा.
६) एखादी कमेंट, पोस्ट, प्रोफाइल तुम्हाला फेक वाटलं किंवा गैरवर्तन करणारं वाटलं तर तुम्ही ते त्या साईटकडे रिपोर्ट करू शकता. तुम्ही ते प्रोफाइल रिपोर्ट केलं आहे हे समोरच्या व्यक्तीला समजत नाही. तुमची ओळख बाहेर येत नाही. त्यामुळे असं कुणी त्रास देणारं असेल तर रिपोर्ट करा.
७) गोष्टी हाताबाहेर जातायेत असं वाटलं तर सरळ पोलिसात तक्रार नोंदवा. अशा तक्रारींची दखल तात्काळ घेतली जाते.
८) समोरची व्यक्ती कितीही असभ्य बोलू, लिहू देत, आपली भाषा आणि वर्तन घसरणार नाही याची काळजी घ्या. अनेकदा स्त्रियांच्या तीव्र प्रतिक्रियांतून विकृत आनंद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे अब्युजिव्ह लेखनही केले जाते.
९) दर वेळी आरे ला कारे करण्याची गरज नसते. काही वेळा न बोलता ब्लॉक करणे, सरळ तक्रार नोंदवणे हे पर्याय वापरता येतात.
१०) घरच्यांपासून, मित्र परिवारापासून या गोष्टी लपवू नका. त्यांना सांगा. म्हणजे त्यांचीही मदत मिळू शकते. विकृत वृत्तीचा सामना एकत्रितपणे करण्यात कधीही शहाणपण असते.
- मुक्ता चैतन्य,
मुक्त पत्रकार व सोशल मिडिया अभ्यासक
muktaachaitanya@gmail.com
लेख दैनिक लोकमतमध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे.