Search

सोशल मिडीयावरचं नेहमीच्या काही घटना

प्रकार १

व्यावसायिक आयुष्यात कुणाचं कुणाशीतरी वाजलं, मतभेद झाले किव्हा अपेक्षित काम करून मिळालं नाही तर हा जो “कुणाचं” आहे तो “कुणाशी” विषयी सोशल मिडियावर नाही नाही ती गरळ ओकतो. व्यावसायिक आयुष्यातले मतभेद चव्हाट्यावर आणतो. अर्थात हे आणत असताना तो “कुणाशी” च नाव घेत नाही. कि ‘कुणाशी’च्या नावाला tag लावत नाही. पण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो कि साऱ्या जगाला समजत कुणी कुणाविषयी काय लिहिलं आहे.


प्रकार २

प्रियकर. प्रेयसी.

काही कारणांनी ब्रेक अप झाल, कि एकमेकांविषयी जाहीर सभा घेऊन कुचागळया केल्याप्रमाणे एकमेकांविषयी वाईट साईट एकमेकांच नाव न लिहिता बोलत राहतात. आनंदाचे जे काही क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात त्याबद्दलचा आदर क्षणार्धात संपून जातो. पुन्हा एकमेकांच नाव घेऊन लिहिण्याची हिम्मत नसते. त्यामुळे आडून आडून टोमणे मारण्याचा कार्यक्रम होतो आणि अर्थातच जगाला मज्जा येते.

हे कमी म्हणून कि काय, यातल्या प्रेयसीवर मारणाऱ्या दुसऱ्याच ‘त्या’ ला प्रेयसीच्या स्टेटस वरून आता आपल्याला चान्स आहे हे लक्षात येत. आणि प्रेयसीला पहिलं अपयश पचवायला वेळ न देता हा दुसरा लगेच तिला सहानुभूती देण्यासाठी पुढे सरसावतो. आडून आडून त्याच्या प्रेमभावना सांगायला लागतो. अर्थात हेही आडून आडून. जरा थांबण्याची, विचार करण्याची फुरसत त्याला नको असते.


प्रकार ३

कसली तरी घमासान चर्चा चालू आहे. लोक एकमेकांशी वाद घालत आहेत. अशावेळी चर्चेत अशीही काही मंडळी असतात जी प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत, मात्र मागून चर्चा करणाऱ्यांविषयी बोलत राहतात. किव्हा काहीतरी गंभीर चर्चा चालू असताना मध्येच कसला तरी फालतू जोक टाकतात. एखादा स्मायली अगदीच चुकीच्या वेळी पोस्ट करतात. किव्हा चर्चेत सहभागी होणार्यांबद्दल स्वतःच्या wall वर नाव न घेता वाईट साईट लिहित राहतात.


प्रकार ४

कुठल्याही आणि कसल्याही पोस्टला लाईक मारणारे तर अगणित असतात. कुणाचे पालक वारले, कुणी जोडीदार गमावला, कुणाला लागलं आहे, कुणा थोर व्यक्तीची पुण्यतिथी आहे अशा कसल्याही पोस्टना लाईक करणारे अगणित असतात. आपण कशाला लाईक करतोय, का करतोय याचा कसलाही विचार न करता लाईक नावच सोप्प बटण हातात आल्यावर लोक ते अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरतात.

एखाद्या पार्टीच आमंत्रण नाही, एखाद्या सोहळ्याला जायला मिळालं नाही, एक्सच लग्न, साखरपुडा...यातून निर्माण होणारा मत्सर अनेकांना आवर्जून लाईक करायला भाग पडतो.

असे कितीतरी सोशल मिडिया वर्तणुकीचे प्रकार लिहिता येतील. या साऱ्यांनाच मानसशास्त्रीय भाषेत पैसिव्ह अग्रेशन म्हणजेच, निष्क्रिय आक्रमकता असे म्हणतात. यात माणसे प्रत्यक्ष जे वागणार नाहीत तेच वागतात पण त्याला एक नकारात्मकतेची किनार असते. काहीवेळा तर लोक टोकाचे नकारात्मक असू शकतात. माणसांमधल्या सकारात्मक भावना जशा सोशल नेट्वर्किंग वर बघायला मिळतात तशाच नकारात्मक भावनाही मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असतात. एखादं छान वाढदिवसाच ग्रीटिंग पोस्ट केलं जातं, त्यावर पोस्ट करणाऱ्याचे आभार मानण्याऐवजी ‘सेम ग्रीटिंग अजून एक दोघांनी आठवली आहेत.’ अशी कमेंट करणारे अनेक जण असतात. अशावेळी पाठवणार्याने किती प्रेमाने कार्ड पाठवले आहे याचा विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अजिबात संवाद न साधणे, कुणी मेसेज केला तरी त्याला उत्तर न देणे, शुभेच्छांची दखल न घेणे, कुणातरी एकाच व्यक्तीला जाणून बुजून टाळत राहणे किव्हा इग्नोर करणे, कुठल्याही चर्चेत फक्त भांडण करण्यासाठी सहभागी होणे, सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहणे, आपण असे दुर्दैवी याचा पाढा कळत नकळत वाचत राहणे, सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणे आणि स्वतःच्या पोस्टने इतरांना गोंधळून टाकणे किव्हा इरीटेट करणे, सगळ्यांकडून अतिरेकी अपेक्षा करणे, आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इतरांना अप्रत्यक्ष दूषणं देत राहणे, सतत विविध गोष्टींसाठी कारण देत राहणे, त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे याच भूमिकेतून सतत वावरणे आणि दुसरी बाजू बघायला नकार देणे, सतत आपण किती दुर्दैवी आहोत याचा पाढा म्हणणे, दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणे आणि सतत दु:ख कुरवाळत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न कारण राहणे हि सगळी निष्क्रिय आक्रमकतेची उदाहरणे आहेत. बारकाईने विचार केलात तर अशा प्रकारे वागणारे अनेकजण सोशल मिडीयावर बघायला मिळतात.

ज्यावेळी आपण सोशल मिडीयावर असतो, कुठेतरी आपल्याला खात्री असते कि आपल्याला संरक्षण द्यायला कम्प्युटर किव्हा मोबाईलचा स्क्रीन आहे. अशावेळी काय करावे आणि काय नाही याचे जे काही संकेत असतात ते गळून पडतात. अशावेळी मग नकारात्मक भावनाही बाहेर पडायला सुरुवात होते. अनेकांना फोमो (FOMO) ची बाधा होते. फोमो म्हणजे, ‘दि फियर ऑफ मिसिंग आउट’. लोक आपल्याला विसरतील, आपल्याला बोलावण येणार नाही, आपल्याला कुणी काहीच म्हणणार नाही या भीती पोटी लोक नकारात्मक पद्धतीने प्रतिसाद द्यायला लागतात. हि नकारात्मकता इतकी वाढत जाते कि त्यातून हि माणस स्वतःभोवती नकारच एक वर्तुळ्च तयार करतात. इतरांना अप्रत्यक्षपणे नाव ठेवताना आपणही कधीतरी दुसऱ्या बाजूला असू शकतो हे हि माणस विसरतात आणि मनातला राग, द्वेष वर्तणुकीतून व्यक्त करत राहतात. हि माणस थेट शिव्या घालत नाहीत. अद्वातद्वा बोलत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकारात मोडणारी आहे हे चटकन लक्षात येऊ शकत नाही. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या वर्तणुकीकडे बारकाईने बघितले कि लक्षात येत काहीतरी गडबड आहे. या लोकांना कशाचच आनंद नसतो, कशाचच कौतुक नसत. दुसऱ्याला चटकन चांगल म्हणवत नाही, मग ते काही न बोलता लांबून बघत राहतात आणि कुणातरी जवळ मनातली गरळ हळूच ओकून मोकळे होतात. यांच्या सगळ्या कमेंट्सना एक वर्ख चढवलेला असतो. सतत इतरांच्या चुका शोधण्याचा छंद यांना जडलेला असतो. आणि हा छंद पूर्ण करण्यासाठी हे कुठल्याही ठरला जायला तयार असतात.

आणि हे सगळं करण्यासाठी लाईक बरोबर स्टेटस अपडेट नावच अजून एक अस्त्र यांना मिळालेलं असत. मनातली नकारात्मकता या स्टेटस मधून बाहेर यात राहते आणि पसरत राहते.

या पसरण्याला रोखणे महाकठीण आहे. सकारात्मकता पसरली तर त्याचा धोका नसतो. उघड राग आणि द्वेष हाताळता येण्यासारखा असतो पण निष्क्रिय आक्रमकतेतून निर्माण होणारी नकारात्मकता दिसत नाही. पसरते पटकन आणि हाताळायला अवघड असते.

म्हणूनच, बी अवेअर !!


मुक्ता चैतन्य, muktachaitanya11@gmail.com

सदर लेख दैनिक लोकमतमध्ये पूर्व प्रसिद्ध झालेला आहे.

30 views0 comments
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922