Search

ही कसली मदत

ही कसली मदत

पहिला प्रसंग एका शहराच्या बस मध्ये घडलेला. माझ्या सारख्या अनेकां समोर घडलेला. फार काही नवीन नाही, नेहमीच घडत असावा अस वाटणारा. त्या प्रसंगाच्या साक्षी होत्या काही तरुण मुली, बरेच तरुण मुलगे, काही प्रौढ, काही म्हातारे आणि माझ्या सारखे ‘अभी तो मै जवान हुं’ असे म्हणणारे काही. वेगवेगळ्या ठिकाणावरून बस मध्ये बसलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी उतरणारे. आमच्या बस मधली एक तरुण मुलगी बरोबरच्या तरुण मुलाबरोबर गप्पा मारत होती असे आम्ही सर्वानीच पाहिलेले आणि अचानक तिचा आवाज चढला आणि ती काहीतरी मघापेक्षा जरा जास्त मोठ्याने बोलत होती. तिचा आवाज येत होता पण ती काय म्हणत होती ते मात्र फार समजत नव्हत. माझ्या सारखे सगळेच ती काय म्हणते हे समजावून घेण्यासाठी आमचे कान जरा जास्तच तिच्याकडे केले. आम्हांला काही कळायच्या आत गाडीतल्या इतर तरुण पोरांपैकी काहींनी त्या पोराची गचांडी तुमच्या भाषेत कॉलर आमच्या भाषेत गच्ची पकडली आणि त्याला उभं केलं. आम्ही पाहताच होतो आणि काही तरी बोलणार तेवढ्यात त्या सैनिकाने त्या पोराच्या दोन व्यवस्थित लावल्या. तशी ती मुलगी किंचाळली आणि तिनेच त्या पोराची सुटका त्या सैनिकांच्या हातून केली. मग आम्हांला कळल की ती ह्या पोरांवर किंचाळली होती. मी बोलायचा प्रयत्न केला, अग नेमकं झालं काय? अस म्हणाले ही, पण मला उत्तर द्यायच्या आत ती आपल्या जागेवरुन उठली, त्या पोराला बरोबर घेतलं आणि गाडीतून तणतणत खाली उतरली. सर्वाना ऐकायला जाईल अशा आवाजात म्हणाली, ‘’ह्याला काय अर्थ आहे, काही चौकशी नाही, काही माहिती नाही आणि लगेच मारायला उठतात मदतीच्या नावाखाली.’’

बऱ्याच जणांनी ऐकल ती काय म्हणाली ते. ड्रायव्हर आणि कंडक्टरने मात्र काढता पाय घेतला आणि गाडी पुढेच नेत राहिले. ‘नसती भानगड’ अस काहीतरी कंडक्टर म्हणाला. काहींनी त्याच्या म्हणण्याला मान हालवत दुजोरा दिला. ज्यां सैनिकांनी त्या पोराला लगावली होती ते मोठ्या फुशारकीने सगळ्यांकडे पाहत होते. काहींनी डोळ्यातून तर काहींनी स्पष्टपणे बर झालं लगावली अस म्हणत आपला पाठींबा जाहीर केला. मला मात्र तीच वाक्य व्यवस्थित पोहोचलं. ती अस का म्हणाली? खरतर ती अडचणीत होती आणि हा शूर सैनिक तिला बहिणीच्या नात्याने सुरक्षित करत होता तरी ती अस का म्हणाली? माझ्या शेजारी आणखी एक तरुण होऊ पाहणारी किशोरवयीन मुलगी बसली होती. अस म्हणतात ना, जेंव्हा एक तज्ञ एखाद्या विषयात अडकतो तेंव्हा त्याने किंवा तिने एखाद्या निरागस लेकराचा सल्ला घ्या प्रश्न लगेच सुटतो. त्यानियमाप्रमाणे मी शेजारचीला म्हणाले, ‘तो मुलगा चांगला त्या मुलीला मदत करत होता तरी तिने मदत घेतली नाही आणि परत त्या त्रास देणाऱ्या मुला बरोबरच निघून गेली, ह्याला काय अर्थ आहे, म्हणून मुलींना, मार खाणाऱ्या बायकांना सोडवायला कोणी येत नाही’. माझ वाक्य जेमतेम संपत होत तर ती मुलगी म्हणाली, बरोबर आहे त्या मुलीचेच, ह्याने कशाला तिने मदत मागायच्या आत दिली. त्याची ही मदत तिला काय भावात पडेल हे तिच्याच जीवाला माहित.

प्रसंग दुसरा. माझ्या सारख्या महिलांवर होणारा हिंसाचार याविषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात नेहमीच घडणारा. जेंव्हा बायका मार खावूनही पोलीस स्टेशनला न जाता आमच्याकडे येतात तेंव्हा आम्ही त्यांना विचारतो, ‘अग एवढा मार खाल्ला आहेस, पोलीस स्टेशनला का नाही गेलीस? म्हणजे गुन्हा नोंदवता आला असता, मेडिकल झाली असती ,इ.इ’. तेंव्हा शंभरातल्या नव्वद बायकांचे हे म्हणणे असते की, बाई पोलिसात गेले तर ऐकूनच घेत नाही, घरगुती भांडण आहे म्हणून हाकलूनच लावतात. पण आम्ही खूपच आग्रह केला किंवा अंगावर मारण्याच्या खुणा असतील तर आम्हांला बसवून ठेवतात, नवऱ्याला उचलून आणतात आणि आम्ही काय सांगतो ते ऐकायच्या आत त्याला मारतात. तो तिथ गप्प ऐकून घेतो, पोलिसांनी सांगितले म्हणून घरी घेवून येतो आणि जेवढे फटके त्याला बसले त्याचा जेवढा राग आला असेल तो जाई पर्यंत आम्हांला मार खावा लागतो. मग काय करतील ग पोलीस? आमचा टिपिकल प्रश्न. ताई, पोलिसांनी आमचा अर्ज लिहून घ्यावा, आम्ही म्हणलो तर गुन्हा दाखल करावा, मारायचं कशाला? ही कसली मदत? आम्ही त्यासाठी तिथं गेलेलोच नसतो. मग आमचं मूळ भांडण रहात बाजूला आणि पोलिसांनी तुझ्या मुळे मला मारलं, घराण्याची इज्जत गेली, सर्वांसमोर मला मार बसवला अस म्हणत आम्हांला मार खावा लागतो आणि बऱ्याच जणींना तर आयुष्यभर माहेरीच काढाव लागल कारण त्या नवऱ्याने अशा मार खाण्यामुळे तिला नेलेच नाही.

ही कसली मदत? आपल्या सारख्या देशात आपण अनेक जण अशी न मागता सहजपणे पुढचा मागचा विचार न करता मदत करत असतो आणि अशा न मागता केलेल्या मदतीचे आपल्याकडे समर्थनही असते बर का ! तुम्ही म्हणाल मग आपण काय पाहत बसायचं तो कसा तिला मारतो किंवा त्रास देतो ते ! परत उद्या तुम्हीच म्हणणार की, पहा कसा समाज निर्ढावलेला आहे ते. खर आहे ते ही. आज आपण हा विषय समजावून घेवू या. म्हटंला तर अतिशय सोपा आणि म्हटंला तर अतिशय गुंतागुंतीचा विषय. कुठल्याही दुर्बल व्यक्तीला जेंव्हा एखादी दुसरी व्यक्ती मारते तेंव्हा त्यामागे नियंत्रण मिळवणे, ताबा ठेवणे, मार खाणारी व्यक्ती कुठल्यातरी अर्थाने कमकुवत किंवा अशक्त आहे म्हणूनच मारणारी व्यक्ती तिला मारत असते हे आधी आपण समजावून घेतले पाहिजे. त्यात आपल्याला मदत करायची इच्छा असेल तर त्या प्रसंगात तिचा मार वाचवावा, त्यात हस्तक्षेप करावा. त्याऐवजी आपण जेंव्हा मारतो तेंव्हा आपणही तोच सबळ- दुर्बळाचा सिद्धांत पुढे घेवून जातो हे आपल्याला लक्षातच येत नाही. बुद्ध खूप छान म्हणतो, ‘हिंसाचाराचे उत्तर हे हिंसाचार असू शकत नाही’. खर त्यासाठी ती अंगुलीमालाची गोष्ट असावी किंवा मला तरी त्यातून तोच संदेश मिळतो. बुद्ध जादूगार नव्हते तर त्यांचा अहिंसेवर विश्वास होता हेच त्यातून दिसत. विज्ञाना पासून तर निसर्गापर्यंत सर्वानीच ह्या मदतीच्या भावनेसाठी अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण लक्षात कोण ठेवेल. उदा. आपण शाळेत असतांना शिकलेलो आहे की, जेंव्हा सुरवंटातून फुलपाखरु बाहेर पडत असत तेंव्हा तो जो कोष असतो तो त्याचा त्याला भेदू द्या, तुम्ही त्याला मदत करायला जाऊ नका, तुमची मदत कदाचित त्याला कमकुवत बनवेल आणि त्याचा अकाली मृत्यू होईल. मोठे झालो कामाला लागलो तेंव्हा आपल्याला शिकवलं गेलं की जर एखाद्याला मदत करायची असेल तर त्याला भाकर देण्यापेक्षा ती कशी मिळवावी ह्याचे शास्त्र शिकवा. आठवतय ना, ‘मासे देण्यापेक्षा मासेमारी करायला शिकवा’ इ.इ.

आपल्याकडचे बरचसे पुरुष मर्दानगीच्या नावाखाली आपल्या घरातल्या मुलींना, महिलांना, आया बहिणींना उंबरा देखील ओलांडू देत नाहीत. आमच्याकडे मुलीला सासरी मारहाण होते अशा तक्रारी घेवून येणारे पालक जेंव्हा कौतुकाने सांगतात की, लग्न होईपर्यंत तिने मार्केट कधी पहिले नाही हो, आम्ही तिला कधी कोथिंबीर आणायला सुद्धा कधी पाठवले नाही आणि हे लोक खुशाल तिला मारतात ! अशा पालकांचं काय करावं तेच समजत नाही. मग असे पालक तिच्या आयुष्याचे सर्वच निर्णय घेतात आणि जितका होऊ शकेल तेवढा तिच्या आयुष्याचा विचका करतात. आता ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीच स्वतःच्या आकलेने, कष्टाने करुन पाहिलेले नाही त्यांना कदाचित असे वाटण्याची शक्यता आहे की हेच खरे सुख आहे पण ज्यांना स्व निर्णय, माणूस म्हणून मला मोजल जावं अस वाटतय त्यांना मी काय म्हणते आहे त्याचा अर्थ कळू शकेल.

अडचण कुठे आहे जेंव्हा हे स्वयंघोषित मदतगार, सैनिक आपल्या आजूबाजूच्या परिसराचा संस्कृतीच्या नावाखाली ताबा घेतात आणि मदतीच्या नावाखाली सर्व निर्णय, नियम ठरवायला लागतात तेंव्हा खरी वाट लागते. मग ते मुला-मुलींचा घोळका उभा असेल तर लगेच हटकतात आणि चला घरी जा असा आदेश काढतात. का? असा प्रश्न विचारला तर उत्तर असते, की एरिया खूप वाईट आहे, पोरींना समजत नाही म्हणून आम्ही त्यांना खरतर मदतच करीत आहोत. तर मला वाटत की, त्यापेक्षा मुलींना समजू द्याना सर्व परिस्थिती, एरिया, प्रश्न, बर, वाईट. त्यांना शिकू दे ना आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायला. त्याविरोधात दोन हात करायला. मी इतकी वर्ष महिलांवरील हिंसाचार विरोधात काम करते आहे. माझा अनुभव सांगतो की, ज्या मुली स्वतः सक्षम होत्या त्यांचेच प्रश्न सूटतात, कितीही गुंतागुंतीचे असले तरी. पण जिथे सारखा मदतीच्या नावाखाली नियंत्रण आहे, तिथे मुलींना निर्णयक्षमताच नसते आणि त्यांचे सोप्यातले सोपे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होऊन जातात, ताणले जातात, आणि दीर्घकाळ सुटत नाही.

शेवटच. मग मुली संकटात आहे हे लक्षात आलं तर मर्दानी काय करायचं? ही सूचना सर्वान साठी आहे. ही सूचना अमलात आणण्यासाठी ‘मर्द’ असण्याची, शो करण्याची गरज नाही. संकटातल्या मुलीला शक्य असेल तर म्हणा, खुणवा, सूचित करा की, तिचा त्रास तुमच्या लक्षात आला आहे, तिला मदत हवी असेल तर तुम्ही द्यायला तयार आहात. त्यांनतर तिने मदत मागितली तर नेमकी तिला काय मदत हवी आहे हे नीट समजावून घ्या आणि ती मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही म्हणाल हे एवढ त्यावेळेस कस काय जमेल. तर जमत बर का. आम्ही हिंसाचार ग्रस्त महिलांना मदत करतो म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांच्या नवऱ्याना किंवा सासरच्यांना किंवा कामाच्या ठिकाणी कोणी त्रास देत असेल तर त्यांना मारायचे कंत्राट घेत नाही तर तिला तिच्या बरोबर आम्ही म्हणजे इथला समाज, कायदे आहेत याचा विश्वास देतो, ती हाक मारेल तेंव्हा आम्ही तिच्या साठी, तिचे ऐकण्यासाठी उपलब्ध असू याचा विश्वास तिच्यात जागवतो. आम्ही तिच्या कल्याणाची जबाबदारी घेत नाही किंवा आमच्याकडे आल्यामुळे तिच्यावरची हिंसा आता आपोआप बंद होईल, बघतोच आम्ही, असलं काहीही तिला सांगत नाही किंवा ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी अस सांगायचेच नसते हेच त्या मदतीचे शास्त्र आहे.

आता एवढी कथा सांगितल्यावर तुम्ही उठसुठ कोणाला मारणार नाही, मदतीच्या नावाखाली. जोपर्यंत कोणी आपल्याला मदत मागत नाही तोपर्यंत याचा अर्थ मदत मागणारी किंवा मागणारा तुम्हांला लेखी अर्ज करेल याची वाट पहा असं मी म्हणत नाहीये बर का? मी एवढंच म्हणते आहे की योग्य ती मदत करा. आपल्या मदतीला कोणी, ‘ही काय मदत झाली’ असं म्हणू नये एवढी काळजी घ्या बुवा एवढंच आजपुरत.

अनिता पगारे

8080940920

pagare.anita@gmail.com


17 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922