Search

हेय, हाय, आर यु ऑन इंस्टाग्राम?

हेय, हाय, आर यु ऑन इंस्टाग्राम? - सोशल मिडीयावर अनोळखी माणसं जेव्हा एकमेकांशी कनेक्ट होतात तेव्हा असलेच काही बाही प्रश्न विचारतात. सोशल मिडिया, विशेषत:फेसबुक आणि व्हॉट्स अँप आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. जणू काही शरीराचा आणि मनाचा एक भाग. अवयव. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत या नव्या अभिव्यक्तीच्या माध्यमांवर येत जात असतो. सतत अपडेट करत असतो. इतरांचं काय चालू आहे ते चेक करत असतो. आपल्याला जगाला काहीतरी सांगायचं आहे, आणि इतर प्रत्येकाच्या जगात काय चाललंय हे जाणून घ्यायचं आहे. हे सगळं आता अंगवळणी पडलंय. पण कालपर्यंत शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे आपण आता मोठ्या प्रमाणावर छायाचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होतोय. एक काळ असा होता कि छायाचित्र काढण प्रचंड कौशल्याचं काम होतं. मोजक्याच लोकांना ही कला अवगत होती. पण काळाच्या ओघात आणि स्मार्ट फोन नावाच्या क्रांतीनंतर आपल्यापैकी प्रत्येक जण फोटोग्राफर आहे. आणि म्हणूनच फोटो हे अभिव्यक्तीचं नवं प्रभावी माध्यम आहे.

इंस्टाग्रामचा जन्म याच क्रांतीतून २०१० साली झाला आहे.


फेसबुक विचारतं, तुमच्या मनात, डोक्यात काय चालू आहे ते लिहा. पण प्रत्येकालाच स्वतःच्या मनातल्या, डोक्यातल्या गोष्टी शब्दबद्ध करता येत नाहीत. अनेकदा अनेकांना खूप काही सांगायचं असतं पण ते कसं सांगायचं हेच कळत नाही, त्यासाठी शब्द सापडत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या साचेबद्ध पद्धतीमुळे माणसे अनेकदा योग्य शब्दांची जुळवाजुळव करायला घाबरतात. आपण लिहू ते चांगलं असेल ना, ते लोकांना आवडेल ना, त्यावर टीका झाली तर या भीतीतून ना लिहिता फॉरवर्ड करणाऱ्यांचं प्रमाण पुष्कळ आहे. त्यामानाने चित्रभाषा सोपी असते. स्मार्टफोनमुळे आणि त्यातल्या फोटो करेक्शनच्या अगणित फीचर्समुळे तर ती अजूनच सोपी झाली आहे. तुमची जर बारीक निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल कि फेसबुकवर सगळ्यात जास्त लाईक्स फोटोला असतात. कारण त्यावर प्रतिक्रिया देणं सगळ्यात सोपं आणि कमीत वेळात होणार आहे. एखाद्याची एखादी पोस्ट वाचायची आणि त्यावर व्यक्त व्हायचे तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पण फोटोवर व्यक्त होणं सोपं, चटकन होणारं आणि दुसऱ्याला सुखावणारं असतं. इंस्टाग्राम प्रचंड लोकप्रिय होणायामागेही हेच प्रमुख कारण आहे. इंस्टाग्रामवर भटकताना हे प्रकर्षाने जाणवतं. लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना, प्रसंग यांच्या नोंदी फोटोच्या माध्यमातून घेत असतात. कुठे काय खाल्लं, किंवा कोणता पदार्थ बनवला इथपासून ते मित्रमैत्रिणी, नातेवाईक, प्रेमातली माणसं, जोडीदार यांच्याबरोबर घालवलेले क्षण, प्रवासात दिसलेल्या गोष्टी, घरात आणि घराबाहेर मनाने टिपलेल्या अनेक गोष्टी चटकन स्मार्टफोनवर घेऊन त्या इंस्टाग्रामवर अपडेट केल्या जातात. शिवाय फोटोसकट लांबलचक पोस्टची गरज नसते. दोन चार कि वर्ड्स असणारे शब्द, एखाद दुसरा हॅश टॅग लावला कि काम झालं. लाल बदामांची तात्काळ खैरात सुरु होते आणि ढीगभर लाल बदाम मिळत जाणं, मिनिटा मिनिटाला त्याची संख्या वाढत जाणं हि कळत नकळत झिंग आणणारी गोष्ट असते.

माणसं इंस्टाग्रामवर का जातात, का रमतात यावर जगभर प्रचंड संशोधन सुरु आहे. स्वतःला प्रमोट करण्यापासून अत्यंत खासगी क्षणांच्या नोंदींपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो काढून ते सार्वजनिक करावेसे का वाटतात हा खरंतर औत्स्युक्याचा विषय आहे. इंस्टाग्राम का वापरलं जातं याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा अनेक मुद्दे पुढे येतात.

व्हिज्युअल माध्यमाची ताकद

सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ते व्हिज्युअल माध्यम आहे. एक असं व्यासपीठ जिथे तुम्ही सातत्याने स्वतःचे फोटो अपलोड करू शकता. जिथे लिहिण्याची फारशी गरज नाही. जिथे व्यक्त होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम शब्द संचय, अचूक एक्स्प्रेशनची गरज नाही. स्मार्ट फोन वापरून एक क्लिक करायचं आणि अपलोड झालं कि जगाला समजतं तुमच्या आयुष्यात काय चालू आहे. म्हणून तर सेलिब्रिटीज स्वतःच रिलेशनशिप स्टेटस जगापुढे ठेवायला इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. नव्याने एखाद्या नात्यात शिरताना त्या व्यक्तीबरोबरचा एक फोटो जगाला काय सांगायचं ते सांगून टाकतो. त्या उपर काही लिहिण्याची, सांगण्याची, कळवण्याची गरज निर्माणच होत नाही. किंवा अगणित ब्रँड्स स्वतःची प्रॉडक्ट्स प्रमोट करायाला मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्राम वापरतात. एक फोटो, एक व्हिडीओ टाकला कि जिथे काम होतंय तिथे प्रोडक्ट काय आहे हे जगाला समजावून सांगण्याची गरजच नाहीये. शिवाय इंस्टाग्राम अतिशय युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे एक क्षणात हजारो लोकांपर्यंत पोचणं अगदीच सहज आणि सोपं आहे. शिवाय छायाचित्र जो परिमाण मनावर करतात ते अनेकदा शब्द साधू शकत नाहीत. कारण शब्द वाचून समजून घ्यावे लागतात. छायाचित्र नकळत दृष्टीच्या टप्प्यात आलं तरीही मन त्यांची नोंद घेतंच. म्हणजेच एखाद्या प्रॉडक्ट विशेष माहिती नको असेल, त्याविषयी उत्सुकता नसेल तरीही ब्रॅण्ड्स आपोआप ग्राहकापर्यंत पोचतात. मग ग्राहकाची इच्छा असो अगर नसो. जे ब्रॅन्डचं तेच व्यक्तींचं. इंस्टाग्रामवर फिरताना अनेक लोक स्वतःला प्रसिद्ध आणि चर्चेत ठेवण्यासाठी इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. त्यातूनच 'सोशल मिडिया सेलिब्रिटी' हा प्रकार जन्माला येताना दिसतोय. असे चेहरे ज्यांना सोशल मिडियावर, इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोवर्स आहेत. जे सतत निरनिराळे फोटो अपलोड करून चर्चेत असतात. व्यक्तींचा, वस्तूचा ब्रँड बनवण्याच्या प्रक्रियेत व्हिज्युअल माध्यमं खूप मोठी भूमिका बजावतात. आणि हीच इंस्टाग्रामची ताकद आहे.

जमाना मायक्रोब्लॉगिंग

लांबलचक पोस्टचं जमाना हळूहळू संपत चाललाय. आता सगळे जण मायक्रोब्लॉगिंग कडे वाळतायेत. खरंतर एकीकडे ट्विटरचं गारुड कमी होतंय तर दुसरीकडे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून त्याबरोबर एखाद दुसऱ्या ओळीत आपली गोष्ट सांगणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. यातही माणसांकडे वेळ कमी असणं, सतत जगाच्या संपर्कात राहिलो नाही किंवा सोशल मिडियावर वावरलो नाही तर आपण एकटे पडू हि भीती आहेच. फिलिंग ऑफ मिसिंग आऊट अर्थात 'फोमो' च्या भीतिपोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर वावरणाऱ्या लोकांसाठी मायक्रोब्लॉगिंग आणि त्यातही इंस्टाग्राम हे सहज आणि सोपं माध्यम आहे. इंस्टाग्राम वापरण्याच्या कारणांमधलं हे एक महत्वाच कारण आहे.

ट्राफिक वाळवण्याचं माध्यम

जगभर चाललेला अनेक सर्वेक्षण सांगतात कि इंस्टाग्रामचा वापर करून कंपनी, ब्रँड, व्यक्ती ऑनलाईन भटकंती करणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या साईटवर, ब्लॉगवर सहज वळवू शकता. ऑनलाईन जगतात, तुमच्या साईटवर, ब्लॉगवर किती ट्राफिक येतो याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ऑनलाईन जगताच अर्थकारण या ट्रॅफिकवर अवलंबून असतं. ट्रॅफिकची दिशा आपल्या साईट आणि ब्लॉगवर वळवण्यासाठी इंस्टाग्राम उपयोगी पडत असा अनेकांचा अनुभव आहे. त्यातही पुन्हा इंस्टाग्रामचे व्हिज्युअल माध्यम असणं हेच सगळ्यात महत्वाचे कारण आहे. तिथे पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ बघून ट्रॅफिक एखाद्या विशिष्ट साईटवर किंवा ब्लॉगवर जायला प्रवृत्त होतं.

मस्त मजेचे माध्यम

इंस्टाग्राम वापरणाऱ्यांना विचारलं कि ते इंस्टाग्राम का वापरतात तर अनेक जण सांगतात कि हे मस्त मजेचं माध्यम आहे. स्वतःचे फोटो काढायला कुणाला आवडत नाही. आपल्या फोटोवर खूप लोकांनी छान छान प्रतिक्रिया दिलेल्या कुणाला आवडत नाहीत? आपल्या फोटोंना फॉलोअर्स आहेत हि गोष्ट इगो सुखावणारीच असते. त्यामुळे इंस्टाग्राम हे काहीसं मनाला सुखावणारं, गमतीशीर फोटो टाकून इतरांना सहज आकर्षित करून घेता येण्यासारखं, सहजपणे प्रसिद्धी देणारं, कळत नकळत फोटोग्राफर बनल्याचा भास निर्माण करणारं माध्यम आहे. त्यातूनच मग इंस्टग्रामवर सेल्फीसारखे अजूनही अनेक प्रकार सहज बघायला मिळतात. उदा. ग्रुपीज( म्हणजे ग्रुपने काढलेला फोटो), अग्लीज (चित्रविचित्र चेहरे करून काढलेले फोटो), स्लीपीज (झोपेतून उठल्या उठल्या, प्रियकर/प्रेयसीबरोबर बेडमध्ये असताना, रात्री झोपायच्या आधी, सकाळी गादीतून बाहेर आल्यावर गाडीचा असे अनेक प्रकारचे फोटो यात समाविष्ट आहेत.) फुटीज (म्हणजे पायांचे फोटो. पेडिक्युअर केल्यानंतर, सकाळी जॉगिंगला निघताना, निवांतपणे बसलेले असताना किंवा अशाच अनेक क्षणी पायांचे काढलेले फोटो) असे अनेक प्रकारचे फोटो इंस्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध होतात. रोज नव्या प्रकारे फोटो काढून स्वतःची कहाणी सांगण्याची धडपड बघायला मिळते. त्यातूनच ग्रुपीज, अग्लीज, स्लीपीज, फ़ुटूज हे प्रकार उदयाला आले आहेत. इंस्टाग्राम हे पिढीनुसार बदलत जाणारं माध्यम आहे. लोकं काय पोस्ट करतात हे त्यांचं वय, आर्थिक परिस्थिती अंडी त्यांच्याकडे असलेला वेळ यावर अवलंबून असतं. म्हणूनच असेल पण इंस्टाग्राम हा तरुण सोशल मिडिया आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणी आणि स्त्रिया यांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे.

स्त्रियांचं प्रमाण सगळ्यात जास्त का?

बायकांना नटायला, छान दिसायला, स्वतःचे फोटो काढायला आवडतात म्हणून त्या इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त असतात असं ढोबळमानाने मानले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामचे एक्टीव्ह ग्राहक ४०० दशलक्ष होते. त्यात स्त्रियांची संख्या होती ६८ टक्के. याचं कारण नमूद करताना सर्वेक्षणकर्ते सांगतात कि इंस्टाग्राम खानपान, सौंदर्य, फिटनेस, ब्रॅण्ड्स च्या वस्तू आणि फॅशनसाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं. त्यात ब्रॅण्ड्स तर आहेतच पण व्यक्तिगत पातळीवरही वापरणारे स्वतः बनवलेलय पदार्थांचे फोटो, घेतलेले नवीन ब्रँडेड कपडे, महागड्या पर्सेस, एखाद्या पार्टीसाठी केलेला युनिक मेकअप यांचे फोटो टाकण्यातही इंस्टाग्रामचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे कदाचित इंस्टाग्राम हे स्त्रियांच्या वर्चस्वाचं माध्यम आहे. जेंडर रिसर्चर रॅशेल सिमन्स यांच्या मतानुसार स्त्रियांनी स्वतःचे काढलेले फोटो अधिक सुंदर आणि आकर्षक बनवण्याची सोया इंस्टाग्राममध्ये आहे. तुम्ही जसे दिसता त्यापेक्षा जास्त सुंदर दाखवण्यासाठी पूरक फीचर्स इंस्टाग्राममध्ये आहेत. त्यामुळे स्त्रियांचा वावर इथे जास्त आहे. विशेषतः कॉलेजमधल्या मुली. ज्यांना स्वतःच्या चेहऱ्यातल्या नकोशा गोष्टी, शरीराची ठेवण आणि बांधा सहज बदलता येतो. याचा बारकाईने विचार केला तर या सगळ्याचा थेट संबंध व्यक्तीच्या मानसिकतेशी, न्यूनगंडाशी आणि जगण्याच्या धारणांशी असतो. आपण कसे दिसतो याबद्दल मनात शंका असतील आणि स्वतःच्या शरीराचा, व्यक्तिमत्वाचा स्वीकार नसणं, किंवा त्याबद्दल मनात गोंधळ असणं अशी अनेक कारणं इंस्टाग्रामवरच्या प्रचंड वापरामागे असू शकतात. अर्थात वरकरणी यातलं काहीच जाणवत नसलं, तरी माणसांच्या मनात खोलवर गेल्यावर या गोष्टी सहज जाणवून जातात.

सगळ्यात धोकादायक सोशल मिडिया व्यासपीठ

जगातले ७०० दशलक्ष लोक इंस्टाग्राम वापरतात. त्यातले ४०० दशलक्ष लोक नियमितपणे इंस्टाग्रामवर असतात. द रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ या संस्थेने युकेमध्ये एक सर्वेक्षण केले होते. १४ ते २४ वयोगटातल्या १४७९ तरुण तरुणींचे सोशल मिडिया वापरकर्ते म्हणून यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आरोग्यवर होणारे परिणाम, तज्ज्ञ व्यक्तींपर्यंत पोचण्याची संधी, मानसिक आधार, ताण आणि काळजी, एकटेपणा, झोप, अभिव्यक्ती, स्वओळख, बॉडी इमेज, समूह बांधणी, बुल्लिंग आणि फोमो असे काही महत्वाच्या विषयांवर या तरुणाईला काय वाटते, त्यांचे अनुभव काय सांगतात याची माहिती घेण्यात आली. यात फेसबुक, ट्विटर, स्नॅप चॅट, युट्युब आणि इंस्टाग्राम या सगळ्यात सोशल मिडिया व्यासपीठाच्या संदर्भात सदर मुद्द्यांवर तरुणाईशी चर्चा केली गेली. जवळपास १४ मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांच्या सर्वेक्षणात इंस्टाग्राम सगळ्यात हानिकारक सोशल मिडिया व्यासपीठ असल्याचे समोर आले आहे. बहुतेक प्रश्नांच्या बाबतीत उत्तरे नकारात्मक आणि शरीर, मनावर इंस्टाग्रामच्या वापराचे विपरीत परिणाम होतात असं सांगणारी आहेत. इंस्टाग्रामच्या वापराने जागरूकता वाढते, निरनिराळ्या विषयांपर्यंत पोचण्याची संधी मिळते, मानसिक आधार काही प्रमाणात मिळू शकतो, अभिव्यक्तीचे हे एक उत्तम माध्यम आहे असं हे सर्वेक्षण नोंदवत. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामच्या सकारात्मक बाजू अधोरेखित करताना स्वओळख मिळवून द्यायला हे व्यसपीठ उपयोगी पडत, जगभर काय चालू आहे हे समजून त्याच्याशी कनेक्ट राहायला मदत करत, समूह बांधितही उपयोगी पडत असंही नोंदवत पण त्याचबरोबर वापरकर्त्यांची काळजी करण्याची सवय प्रचंड वाढवतं, ताण वाढवतं, एकटेपणाची भावना विकसित करतं, त्याला खतपाणी घालतं, विस्कळीत झोपेची समस्या निर्माण करतं, स्वतःच्या शरीराचा स्वीकार करण्याच्या मानसिकतेत अडथळे निर्माण करतं. चेष्टा, टोकाची टिंगल टवाळी आणि त्यातून निर्माण होणारा ऑनलाईन छळ यात भर घालत, शिवाय फोमो म्हणजेच फार ऑफ मिसिंग आऊट हि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण करत असंही हे सर्वेक्षण नोंदवत. त्यामुळे इतर कुठल्याही सोशल मीडियापेक्षा इंस्टाग्राम सगळ्यात जास्त हानिकारक आहे असंही हे सर्वेक्षण आवर्जून नमूद करतं. जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे सर्वेक्षण इंस्टाग्रामला सगळ्यात कमी मार्क देतं.

जसे इंस्टाग्रामचा उपयोग आहे तसेच त्याच्या सातत्याने केलेल्या वापरातून गंभीर मानसिक समस्या निर्माण होतात हे आता स्पष्ट झाले आहे. आपण जसे आहोत तसे जगाला दाखवण्याची भीती हे या सगळ्यामागचं महत्वाचं कारण आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण निरनिराळे मुखवटे घेऊन सतत वावरत असतो. काहीवेळा ती वैयक्तिक किंवा व्यावसायिक गरज असते. तेवढी गरज भागली कि तो मुखवटा माणसं बाजूला सारतात. पण सोशल मिडिया सतत, चोवीसतास आपल्या आयुष्यात जागं असतं. त्यामुळे एकदा चढवलेला हा मुखवटा उतरवून मोकळा श्वास घेण्याची संधीच आपल्याला मिळत नाही आणि मग आपला श्वास गुदमरतो. मग सुरु होते तो मुखवटा जपण्याची धडपड. त्यातही अनेकदा हि धडपड करकरूनही कंटाळा येतो. समाजाला दाखवलेला चेहरा, बदलता येत नाही. मनातली भीती, असुरक्षिततेची भावना जगासमोर आणता येत नाही. आपल्या मनाच्या डोहात खोलवर बघण्याची आपल्यालाच भीती वाटायला लागते. जे काही जगाला दाखवलं आहे तेच खरं आहे हे आपण मानतो, स्वतःला समजावून, मनाला मान्य करायला भाग पडतो. त्यातच आपण रमतो आणि मग या सगळ्या खोट्या रमण्याचा विचित्र ताण मनावर यायला लागतो. त्यातूनच मग विविध मानसिक समस्या निर्माण होतायेत. सोशल मिडिया वापरू नये असं नाही मात्र तो वापरात असताना सजग असणं, त्याचा आपल्या वर्तणुकीवर, स्वभावावर परिणाम तर होत नाहीये ना, त्यामुळे नाती दुरावत नाहित्येत ना, ताण निर्मण करत नाहीये ना याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या तरुण मुलामुलींना सजग करणं आवश्यक आहे. सोशल मिडिया आयुष्यातून डिलीट करता येऊ शकत नाही, निदान त्याचा वापर काळजीपूर्वक होईल एवढं तर आपण नक्कीच बघू शकतो.


मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

सदर लेख प्रपंच दिवाळी अंकात पूर्व प्रसिद्ध झालेला आहे.


26 views0 comments
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922