Search

हे वागणं बर नव्हं.........

सद्या सगळ जग एकाच चिंतेत अडकल आहे आणि ती चिंता म्हणजे ह्या कोरोना चे करायचे काय? ह्या कोरोनाने मोठ्या संख्येने माणसांचे मृत्यू करण्यापर्यंत, जगातली सर्व मानवजात ‘मानवाने कसा निसर्ग मानवाच्या नियंत्रणात आणला आहे, मानवाच्या मनात येईल तेव्हा तो निसर्गाला थांबवू शकतो, पळायला लावू शकतो’ याच्या कथा सांगितल्या. पण आता मात्र त्या एका विषाणूला नतमस्तक होऊन आख्खी मानवजात गप घरात बसली आहे. काही विषयात एका मर्यादेपर्यंत निसर्गावर मानवाने नियंत्रण मिळवल्याचे प्रथम दर्शनी तरी वाटते. या मर्यादित यशाच्या जोरावर दिवसेंदिवस मानव जात उन्मत होत चालली होती. पण उघड्या डोळ्यांनी जो विषाणू दिसत सुद्धा नाही त्याने सर्व मानवजात नियंत्रणात आणली आहे. ह्या विषाणूमुळे सर्वच लोक खूपच दुखी झाले आहेत कारण अनेकांचे व्यवहारच बंद पडले आहेत आणि ते कधी सुरु होईल यावर कोणीच निश्चित उत्तर देऊ शकत नाही.

माझ्या सारखे कार्यकर्ते कोरोना सोबतच वाढत चाललेल्या कौटुंबिक हिंसाचारा मुळेही चिंतेत आहेत. आणि हि चिंता आज निर्माण झालेली नाही तर जेव्हा पासून मानव विकासाच्या स्पर्धेत आला तेव्हा पासूनच हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा पासूनच कमी अधिक प्रमाणात हा विषय गंभीर आहे आणि याकडे दुर्लक्ष न करता जाणीवपूर्वक यावर उपाय शोधला पाहिजे असे म्हणणारे कार्यकर्ते त्या त्या वेळी होते. आता त्यांची संख्या वाढलेली असण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अनेक प्रकारच्या विषमता आहेत. जात, धर्मापासून ते लिंग विषमता याविरुद्ध मानवाचा अखंड विरोध सुरु आहे, त्यामाने त्याला जितके यश मिळायला हवे होते तेव्हढे मिळाले नाही. माणूस हा प्राणी जेवढा सो कॉल्ड प्रगत होत आहे, त्या प्रगतीचा उपयोग हिंसाचार करण्यासाठी, कोणाला तरी आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी, ठेवण्यासाठी करतांना दिसतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेला कौटुंबिक हिंसाचार हा फारच मोठा चिंतेचा विषय आहे. कोरोनावर उपाय नक्कीच सापडेल पण ह्या लिंग विषमतेवर मात्र अजूनही निश्चित असा उपाय सापडत नाही असे वातावरण निर्माण केले गेले आहे. समाजवादी विचारांनी यावर खूप आधी उपाय शोधले, ते अमलात आणले आणि लिंग समानतेचा आनंद हि घेतला हे सांगण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. लिंग समानता आली तर पुरुषाची सत्ता जाईल, स्त्रीया पुरुषांना आपल्या ताब्यात ठेवतील अशी भीती जाणीवपूर्वक सनातनी विचारांचे लोक पिढ्यानपिढ्या पसरवत आहेत. या प्रचारात जसे पुरुष मोठ्या संख्येने आहेत तश्याच स्त्रियाही आहेत. यात न शिकू शकलेल्या स्त्रिया तर आहेतच पण उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियाही वाहक म्हणून प्रचारकी करतांना दिसत आहेत.

समाजवादी विचार हा फक्त भाषणात बोलण्याचा विचार नाही तर तो कृतीला मान्यता देणारा विचार आहे म्हणूनच त्याची सभासद संख्या हि अगणित नाही. महिन्याला सदस्य फी ची पावती फाडली की तुम्ही ह्या विचारांचे झालात असे समाजवादी विचारप्रणाली मनात नाही. तुम्ही जे बोलता ते तुमच्या कृतीत असले पाहिजे हीच याची सभासदत्वाची अट आहे. पण एकदा का हा विचार आनंदाने स्वीकारला, रुजला की आयुष्यभर तो जात नाही. आपल्या समाजात असलेल्या विविध प्रकारच्या विषमता ह्या एकाच वेळेला दूर केल्या पाहिजे असे समाजवादी विचार मानणारे मानतात आणि तसे मांडतात ही. आम्ही म्हणतो की जात, धर्म, वर्ग, शारीरिक क्षमता यावरुन निर्माण झालेल्या विषमतांच्या जसे आम्ही विरोधी आहोत तसेच आम्ही लिंग विषमतेच्याही विरोधी आहोत. त्यामुळे आमच्याकडे सर्व कामे सर्व मिळून केले जातात मग ती कामे शिबारातील झाडलोट असो, सतरंज्या घालायच्या असो की घरातला स्वयंपाक असो; सगळीकडे ज्याला जे आवडेल त्याने/तीने ते करावे यासाठी आम्ही आग्रही असतो. म्हणूनच कोरोनाच्या ‘घरबंदी’ मध्ये समाजवादी मित्रांना कोणीतरी घरकाम, स्वयंपाक यासाठी चैलेंज करायची आवश्यकता नव्हती. त्यांचा तो रोजचा दिनक्रम होता. बर घरातला स्वयंपाक, झाडलोट ही कामे घरातल्या स्त्रियांची आणि पुरुषांची दोन्हीची जबाबदारी असल्यामुळे समाजवादी विचारांच्या पुरुषांना ते काहीतरी अफलातून, ग्रेट काम करतात असे कधीच वाटत नाहीत. म्हणून ते त्याचा गवगवा करतांना दिसत नाही किंवा त्याचे फोटो सेशनही नसते. ज्या घरात आपण राहतो, तिथे स्वच्छता लागणार तर ती मी क्केली पाहिजे, मला भूक लागते तर मी स्वयंपाक केला पाहिजे इतके ते सहज आहे.

समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी शिबिरातील अभ्यासवर्गा इतकाच हा विषय गंभीर असतो. मला दोन गोष्टी यावरुन आठवल्या. डॉ. अनिल अवचट ज्यांना आपण बाबा म्हणतो यांची आवड म्हणून आणि अनिता ताई नोकरी करीत असल्यामुळे त्यांचा डबा बाबाच भरायचे याचे खूप कौतुक त्याकाळात लोकांना वाटायचे. दुसरी गोष्ट, एकदा मी आमची एक मैत्रीण अनिता हिच्या कडे बैठकीसाठी गेलो होतो. जेवणाची वेळ झाली तसा तिचा पार्टनर नितीन थोडा आमच्या आधी बैठकीतून उठला, कणिक भिजवली आणि चपात्या केल्या. तोपर्यंत पुरुष पाणी भरू शकतो, कधीतरी झाडूनही काढू शकतो असे मला वाटायचे पण जेव्हा मी नितीनला चपाती म्हणजे छान मऊ फुलके करतांना पाहिले तेव्हा विश्वास बसला की चपात्या किंवा कुठलेही घरातले काम पुरुष हि सहज करु शकतो, तो फक्त सरावाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट पटली ती म्हणजे समाजवादी विचार हा फक्त भाषणापुरता विषय नाही तो रोजच्या आयुष्यात जगण्याचा विचार आहे. पुढे माझ्या घरात मी पैसे कमवायचे आणि मनोहरने घर सांभाळायचे अशी वाटणी झाली तेव्हा मी एका कार्पोरेट कंपनीत कामाला होते. तिथे सकाळी लवकर ऑफिसला जावे लागायचे. हजारो लोक करतात तसच मलाही मुंबईची ट्राफिक ओलांडून जाणे म्हणजे घरातून लवकर निघावं लागायचं आणि घरी उशीरा पोहोचायचे. त्यामुळे माझ्या कडे सकाळचा छान नाश्ता, दुपारचे व्यवस्थित जेवण आणि परत सहा वाजता परतीच्या प्रवासात खाण्यासाठी काहीतरी असायचे आणि हे सर्व मनोहरने केलेलं असायचे. त्यामुळे त्या दोन ते अडीच हजार स्टाफ असलेल्या ठिकाणी मी प्रसिद्ध होते का तर, माझा डबा माझा पार्टनर शिजवतो. लोक माझी तशी ओळख करुन द्यायचे. पहिल्यांदा मला शरम वाटायची लोकांच्या विशेषतः स्त्रियांच्या नजर बघून पण नंतर सवय झाली. पुरुषांचे मत, प्रतिसाद असायचा की, बाई इथे भेटलीस बायको बरोबर असतांना भेटू नकोस किंवा कधीच आमच्या घरी येऊ नकोस, आणि हे लोक बोलून दाखवायचे बर का! आणि बायकांची प्रतिक्रिया असायची की, लकी आहे असा नवरा मिळाला किंवा बाईच्या जातीला धब्बा आहेस. माझ्या मनात नेहमी प्रश्न यायचा आणि आताही येतो की शेकडो पुरुषांना त्यांचे आतले कपडे धुता येत नाही पण त्यांना कुठलीही शरम वाटत नाही. मग आपण जर कामाची अशी न्याय्य वाटणी केली आहे तर मी घरात काम करत नाही आणि मनोहर कमावत नाही याची कशाचीच शरम वाटायची आवश्यकता नाही. हे मला समाजवादी विचारांनी शिकवलं.

कौटुंबिक हिंसाचार ज्या लिंग विषमतेमुळे, पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे होतो त्यावरील उपाय खूपच सोपे आहे अगदी कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून धुवायच्या हातासारखे. आपण कोरोना पासून दूर राहू शकतो, अनेक मृत्यू थांबवू शकतो जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली, घराची आणि परिसराची आवश्यक ती किमान स्वच्छता, आणि शिंकताना आणि खोकताना तोंडावर रुमाल/कापड ठेवायच्या सारख्या काळजी घेतल्या तर. तशाच अगदी सहज स्वतःच्या वर्तनात जाणीवपूर्वक बदल केला तर लिंग विषमतेमुळे प्रत्येक अर्ध्या तासाने कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून आत्महत्या करुन किंवा घरच्यांनी मारुन टाकल्यामुळे मरणाऱ्या एका स्त्रीला आपण वाचवू शकतो. यासाठी समाजवादी विचाराने आम्हांला समाजातील अनेक चालीरीतींना प्रश्न विचारायला शिकवले. आमच्या कडे बायको नवऱ्याला नावाने हाक मारते म्हणून नवीन नवीन लोक खूप हसायचे. भांडणात तर बायको नवऱ्याला अरे कारे करतेच पण जे प्रेमात आहेत, गोडीत सगळ चालल आहे त्यातल्या बायकोने का बरे नवऱ्याला आहो काहो म्हणायचे? पती-पत्नी, बायको-मालक ऐवजी दोघेही एकमेकांचे साथीदार का असू नये? का बरे पुरुषांची, मुलांची आणि घरातल्या स्त्रियांची पंगत वेगवेगळी असेल? का बरे पुरुष आंघोळीला जाताना स्वत:चा टॉवेल, आतले कपडे बरोबर घेऊन जात नाही? का बरे पुरुषांचे कपडे स्त्रियांनी धुवायचे? कमावत्या स्त्रियांचे एटीएम कार्ड तिच्या ताब्यात का नसावे? घरातल्या स्त्रियांना निर्णयात सहभागी करुन का नाही घ्यायचे? लग्नासारख्या महत्वाच्या निर्णयात ज्या मुलीचे लग्न आहे तिला सुद्धा का घेतले जात नसावे? अनेक प्रश्न. इतक्या वर्षांची विषमता आहे की न संपणारी यादी आहे ही.

या सर्व का? ला न्यायाचा, समाजशास्त्राचा आधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पती पत्नी एकमेकांचे मित्र मैत्रीण नसतील तर दोघेही आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकणार नाही. शेकडो समाजवादी घरातून असा समानतेचा, मैत्रीचा प्रवास सुरु आहे आणि त्याचा आनंद हि सर्व लोक, आम्ही घेत आहोत. जेव्हा अशी समानता येते त्यामुळे कोणा एकावरच कुठलेही बर्डन, ताण येताना दिसत नाही. जसा आनंद विभागला जातो तशी जबाबदारीही विभागली जाते. नाहीतर अनेक पुरुष आयुष्यभर फक्त कमावण्याचे काम करतात, घरात एटीएम सारखी त्यांची भूमिका असते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर किंवा निवृत्तीला त्यांच्या लक्षात येते की, अरे आपले जगायचे तर राहूनच गेले, हसायचे राहूनच गेले, मुलांशी बायकोशी घरतल्या सर्वांशी गप्पा मारायच्या राहूनच गेल्या. छोट्या गोष्टी आहेत ह्या आणि खरतर त्यातच खरा आनंद, गुंतवणूक आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कशाला हवा हास्य क्लब तो रोज का असू नये? हे एकदा लक्षात आले ना की माणसे धावायची थांबतात. मग कोणालाही नियंत्रणात ठेवण्यासाठी आटापिटा करतांना दिसत नाही. लोक आपल्या नियंत्रणात आहेत याची फुशारकी मारत नाहीत.

कोरोना मुळे लॉक डाऊन सुरु झाल्या नंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने जाहीर केले. त्यांच्या कडे नोंद होणाऱ्या केसेस वरून त्यांनी हा अहवाल जाहीर केला आहे. लहान घर, उत्पन्नाचा थांबलेला मार्ग, सर्व प्रकारचे दळणवळण थांबलेले, मर्यादित मनोरंजनाची साधन आणि सतत स्त्रियांनी पुरुषांच्या आगेमागे, त्यांच्या इच्छा पूर्ण करीत राहाव्यात हि अपेक्षा, अपमान/चिडचिड/अस्वस्थता व्यक्त करण्याचे सहज माध्यम म्हणजे स्त्रिया यातून कौटुंबिक हिंसाचार वाढलेला आहे असे नोंदणी झालेल्या तक्रारीवरून लक्षात येते. हा रिपोर्ट वाचत होते आणि रेडीओ वर ‘छबिदार छबी, मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी’ हे जुनेच गाणे पण नव्या ढंगात वाजत होते. माझ्या एकदम मनात आल, खरच हे वागण बर नव्ह....

बाई मी बाई, कष्टकरी बाई, सारखीच कामाला तयार उभी,

अहो घरातल्यानो,

माझ्या मनातून तुम्ही उतराल, हे वागण बर नव्ह.....

समाजात होईल वेअब्रू अशी, हे वागण बर नव्ह.....

किती पिढ्या मी राबू तशी? हे वागण बर नव्ह....

मार तरी खाऊ किती आणि कशी? हे वागण बर नव्ह....

अनिता पगारे, pagare.anita@gmail.com

27 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922