Search

रंजना

दोन-तीन महिन्यापूर्वीच ती आमच्या चाळीत राहायला आली होती. माझ्याच एका ओळखीच्या बाईनी तिला माझ्याकडे पाठवलं होतं. तीने तिची ओळख करुन दिली. त्यांना खोलीची किती गरज आहे, ही नववधू कशी स्वच्छतेची पुजारी आहे. दोघा नवरा-बायकोचे कसे आपसात प्रेम आहे. त्यांच्यात भांडण कसे होत नाही. याची सर्व रसभरीत वर्णनं ऐकवली त्यामुळे तील शेजारच्यांनी खोली दिली.

सामान घेऊन आली. सामान काय? एक स्टोव्ह, दोन-चार ताट,वाट्या, दोन-चार पातेले, एक मोठी प्लास्टिकची बादली, एक हंडा, दोन-चार गोधड्या बस. तीच नाव रंजना. रंजनाच गोड बोलणं, तिचा निरागस चेहरा, तिच्या नवऱ्याचा सर्वांशी हसून बोलण्याचा स्वभाव यामुळे सर्वाना हे जोडप पहिल्या भेटीतच आपल वाटायला लागलं. कोणी तिला मुलगी मानली तर काहींनी तिच्या नवऱ्याला मुलगा मानून तिला आपली सून घोषित केली. आपल्या लेकीचा तर काहींच्या सुनेचा संसार सुरळीत चालवा यासाठी प्रत्येकीने आपल्या घरातून काही न काही जीवनावश्यक वस्तू रंजनाला देऊन तिचा संसार लावला.

अशी ही रंजना कोण कुठली कधीच आम्ही तिला प्रश्न विचारला नाही. रोज सकाळी लवकर उठून रंजना घर आवरायची. दोघ हसत-खेळत, एकमेकांची चेष्टा करत, अतिशय प्रेमात घर आवरायचे. दोघंही बाहेर पडायचे ते संध्याकाळी सात-साडेसातलाच घरी यायचे. रंजनाच्या नवऱ्याचे एक छोटसं युनिट होतं. तिथं दोघ मिळून खूप काम करायचे. हे विचारल्यानंतर समजले.

त्या दिवशी तिला सकाळी बर वाटत नव्हतं म्हणून ती कामावर गेलीच नाही. खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून दवाखान्यात गेली आणि दिवस गेल्याच कळल. खूपच खुशीत ती घरी आली. तिच्या सर्व ‘आय-सासवाना’ खूपच आनंद झाला. सगळ्या तिच्या काळजीत रमल्या. मी दुपारून घरी आले तेव्हा सर्वजणी तिला समाजावूनच सांगत होत्या. या दिवसात काय आणि कशी काळजी घ्यायची याचे सल्ले स्वतःचे अनुभव प्रत्येकजणी सांगत होत्या. तेवढ्यात मी ही तिथे पोहोचले. मीही माझे अनुभव सांगून तिला सल्ला द्यायला सुरुवात केली. बोलता बोलता मी सहज तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. तिच्या केसातून हात फिरवला. मी हात काढायच्या आत रंजना एकदम रडायला लागली. आम्ही सर्वच काळजीत पडलो. कसंबसं तिला बोलत केलं. हुंदके देत देत तीने तिच्या रडण्या मागचं कारण सांगायला सुरुवात केली.

ती चार-पाच वर्षाची होती तेव्हा वडील दारुत गेले. आई एकटी पडली. रंजना एवढं एकच अपत्य. वडिलांच्या दारुमुळे, दारुसाठी त्यांनी त्यांच्या भावाकडे केलेल्या चोरीमुळे त्यांनी ह्या सर्वांनाच घराबाहेर काढले होते. वडील गेल्यानंतर रंजना आई बरोबर मामाकडे राहीली. मामांची आर्थिक परिस्थिती जेमतेम. त्यातही रंजना सातवी पर्यंत शिकली. शाळेत रंजना खूप हुशार. सातवीची परीक्षा जवळ आली होती. एके दिवशी रंजनाच्या मामाकडे खूप पाहुणे आले. रात्री जेवणं झाली. दारूची पार्टी झाली.

‘त्या पाहुण्यांसाठी एवढा खर्च का केला’ असे रंजनाने आईला विचारले तेव्हा समजलं की त्या रात्री रंजनाच लग्न ठरलं आहे.ते तिचे सासरचे लोक होते. ती खूप रडली. आईला समजावलं, पण आई तरी काय करणार? भावाचा निर्णय, तो नाकारण्याचा तिला तरी कुठे हक्क होता? रंजनाने ही गोष्ट आपल्या बाईना सांगितली. बाई घरी येऊन मामाच्या खूप पाया पडल्या. त्यामुळे रंजनाला सातवीची परीक्षा देण्याची संधी मिळाली. लग्नानंतर रंजनाला समजलं की तिचा पहिला नंबर आला होता. अर्थात त्याचा आता काही उपयोग नव्हता.

लग्नानंतर फक्त एकदाच रंजना माहेरी आली. त्यानंतर तिला भेटायलाही कोणी आलं नाही. पत्र नाही की फोन नाही. रोजचा मार, शिव्या खाऊन रंजना वैतागली होती. एके दिवशी सासू-सासरे, नवरा गावी गेलेले असतांना माहेरी पळून आली. आई, मामाने मनसोक्त मारलं. ‘उभ्या गेलेल्या मुलीने आडवचं यायचं असत’ हा नियम मोडला म्हणून मामीही मारु लागली.

दुसऱ्या दिवशी मावशीच्या घरी जायचं अस सांगून रंजना एका महीला आश्रमात दाखल झाली. हिच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार करायची आहे. तो फार वाईट आहे. तो तिला आमच्या घरी येऊन मारीन, असे कारण सांगून तिला महीलाश्रमात ठेवलं. नंतर बरेच दिवस झाले तरी तिला घ्यायला कोणी येईना. शेवटी ती तिथूनच कामाला जायला लागली. खाजगी ट्रस्टचा आश्रम असल्यामुळे तिला कामाला जायची परवानगी मिळाली.

रंजना बाहेर पडली. सर्वार्थाने बाहेर पडली. बाहेरच्या मोकळ्या हवेने तिच्या मनावर फुंकर घातली. आता रोज तिला मार बसत नव्हता. टोमणे बसत नव्हते. बाहेर पडत असल्यामुळे जगाचे रीतीरिवाज, वेगवेगळे दिसणारे, वागणारे, बोलणारे लोक तिला भेटत होते. अशातच तिची एका तरुणाबरोबर ओळख झाली. रंजनाही आता अधिक उत्साही, सुंदर, तरुण दिसायला लागली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे फिरणे वाढले. तीच उशिरा होस्टेलवर येणे वाढले. एके दिवशी तीने अधीक्षिका मावशीना हे सर्व सांगितले. त्यांनी त्याला बोलावले, त्याची चौकशी केली. तो किती पक्का आहे, त्याला तिचा भूतकाळ माहीत आहे का? त्यामुळे त्याच्या निर्णयात फरक पडणार नाही ना? याची टेस्ट घेतली आणि लग्न पक्के झाले.

दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्यामुळे त्याच्या घरी दंगल झाली. शिव्याशाप बसले. ही कोण मुलगी? कोणाची कोण? आपल्या जातीत मुलींना काळ पडला आहे का? एक ना अनेक प्रश्न. घरात वादळ होऊनही दोघांचा निर्णय पक्का होता. शेवटी त्याच्या घरच्यांनी त्यालाही घराबाहेर काढलं. वडिलांच्या इस्टेटीत माझा कुठलाही हक्क यानंतर राहणार नाही अशा स्टॅम्पपेपरवर त्याने सह्या केल्या. दोघांच लग्न नोंदणी पद्धतीने झाले. आश्रमातल्या मुली ह्याच दोन्हीकडच्या करवल्या. तिथेच हळद, तिथेच लग्न आणि तिथेच मानपान. अधीक्षिका मुलीची आई झाली तर स्वयंपाकीण काकू मुलाची आई झाली. लग्नानंतर पुढचे आठ दिवस रंजना आश्रमात आणि तिचा नवरा त्याच्या मित्राच्या घरी. पुढे सर्वांनी मिळून घर शोधलं आणि संसार सुरु झाला. अशी ही रंजना दोन-तीन वर्ष आईपासून दूर होती. आईच्या मायेसाठी भुकेल्या झालेल्या रंजनाला माझ्या स्पर्शाने एकदम भरुन आलं.

रंजना बोलायची थांबली. डोळे मात्र वाहत होते. तिचेही आणि ऐकणाऱ्या आमच्या सर्वांचेही. “मला दिवस गेलेत, आता माझं कोडकौतुक कोण करेल?” हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तिच्या ‘आया व सासवा’ जागा झाल्या. म्हणाल्या “आम्ही आहोत ना, तुझ्या बाळंतपणाला.”

38 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922