Search

नाथा

नाथा, वय असेल बावीस-तेवीस वर्ष. त्याची आई अमावस्या-पौर्णिमेचा हिशेब सांगून त्याचा जन्म सांगते, त्यावरुन काढलेले ते त्याचे वय. उंची असेल सहा-सव्वा सहा फुट. अंगकाठी एकदम किडकिडीत. तो लहानपणी खूप बाळसेदार होता. त्याला कडेवर सुद्धा घेता येत नव्हते असे त्याची आई सांगते. पण एकदा खूप आजारी पडला. खूप जुलाब, उलट्या झाल्या. रक्त पडत होतं. कोणाची तरी नजर लागली असेल. त्याच्या आईच हे पहिलं मुल. कोणीतरी करणी केली असेल म्हणून त्याच्या आईनं त्याला भगताकडे नेला. भगतान त्याला देवाच्या झाडाखाली झोडला. अंगारा,धुपारा केला. त्याच्या आईनं देवाला नवस केला. गडावर जाऊन बकरू कापून नवस फेडला. नाथा बरा झाला. पण तेव्हा पासून जे बारीक झाला ते आत्तापर्यंत.

लहानपणी तो देवाचा लई भक्त होता. सोळा सोमवार करायचा. संतोषी मातेचे शुक्रवार करायचा. आई उद्यापन (सत्यनारायण) करायची. लई गरीब पोरगा. पण एकदा शाळेत भाषण ऐकून आला आणि घरी येऊन ‘आता मी उपास करणार नाही, देवाची पोथी वाचणार नाही, देवामुळेच आपलं नुकसान होतं, देवाच्या नावाखाली आपण लुटलो जातो’ असं बोलायला लागला. एक दिवस तर घरातले सगळे तांब्याचे देव घेतले आणि गंगेत बुडवून आला. त्याच्या आईने त्याला आयुष्यात पहिल्यांदा मारलं. देवाचा कोप झाला आणि तो आजारीच पडला. ‘मी लई कडक उपासतापास केले, देवाला नवस केला, म्हणून देवानं म्हातारपणाच्या आधाराला त्याला जगवल’ अस त्याची आई येईल त्या प्रत्येकाला सांगायची.

नाथाने तेव्हा पासून जो देव सोडला ते आज पर्यंत कुठल्याच देवाचे नाव घेतले नाही. पोथी वाचली नाही की उपास केला नाही. असा हा नाथा. बराच शिकला. त्याच्या घरात शिकणारा तो पहिलाच. दहावीला नापास झाला तरी त्यानं शिक्षण थांबवलं नाही. वखारीत कामाला जायचा, मोलमजुरी करायचा. दोन तीन वेळा परीक्षेला बसला आणि दहावी पास होऊन कॉलेज शिकला.

वडील हमाली करायचे. आईही मजुरी करायची. पाठीमागे दोन बहीणी, एक भाऊ. आपण शिकून खूप मोठं व्हायचं, चांगल्या ठिकाणी नोकरी करायची, भावंडानाही खूप शिकवायचं अशी त्याची मनोमन इच्छा. स्वतः भरपूर शिकत होता. भावंडांच शिक्षण सुरु होतं. पण बहीणींच शिक्षण मध्येच थांबवून त्यांची लग्न केली. खूपच लहानपणी त्यांची लग्न केली गेली. छान नवीन नवीन कपडे मिळाले, खूप लोक आपल्या घरी आले, छान स्वयंपाक केला अशा आनंदात त्याच्या बहिणी लग्नात सहभागी झाल्या. लग्न म्हणजे काय हे न कळणाऱ्या, स्वतःची साडी सुद्धा स्वतः नेसू न शकणाऱ्या नाथाच्या बहिणी त्यांच्या सासरी नांदायला गेल्या. घरी आता ही दोघेच भावंड. लहान भाऊ खुपच लहान, आईचा खूपच लाडका. त्यामुळे घरातली सगळी काम नाथाच करायचा. आईची साडी धुवून,तिचा डबा कामावर पोहोचवून नाथा शाळेत जायचा.

नाथा कॉलेजला जायला लागला, त्याचवेळी एका ठिकाणी कामालाही लागला. कॉलेज शिकून कामावर जाणाऱ्या नाथाच्या हुशारीवर सगळेच खूष असायचे. एकदा नाथा खूपच खूष होऊन घरी आला. येतांना पेढे, भत्ता घेऊनच घरी आला. आईला काही समजेना. आईने विचारले, “भाऊ, पगार झाला का रे?” “नाही गं”- नाथाच उत्तर. “मग परीक्षा पास बीस झाला काय?”- आईचा पुढचा प्रश्न. “नाही गं”- नाथाचे तेच उत्तर. “अरे मग पेढे कशाचे?” “असेच आणले गं, खाय. पेढे आणायला मुहूर्त लागतो काय?” असं म्हणून नाथा घराबाहेर गेला. रात्री खूप उशिरा आला.

हा बदल म्हातारीच्या नजरेत भरला. सारखा घरात राहणारा आपला मुलगा सारखा घराबाहेर राहतो. चांगले कपडे घालतो, पावडर मारतो, रात्री उशिरा घरी येतो, भानगड तरी काय आहे? म्हातारीने खूप चौकशी केली, तेव्हा कळल नाथाच एका पोरीबरोबर प्रेम झाले होते. तिला भेटण्यासाठी, तिला पाहण्यासाठी लवकर घराबाहेर पडायचा. कॉलेजमधून आल्या नंतर कामावर जाऊन रात्री बराच वेळ घरासमोरुन घिरट्या घालायचा. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, जत्रा त्याला परत आवडायला लागली.

देवीच्या खणा-नारळासाठी आईने दिलेल्या पैशातून आपल्या आवडतीला बांगड्या घेऊ लागला. तिचेही नळावरचे येणे-जाणे वाढले. आता ती धुणीभांडी नळावरच करु लागली. कोणालाही कळायच्या आत, गावाला जाऊ असे सांगून, तिला तिच्या लांबच्या मामाकडे घेऊन गेले आणि पंधरा दिवसात तिचे लग्न केले.

महिना झाला तरी आपली आवडती भेटेना, दिसेना तेव्हा नाथा खूपच वैतागला, चिडचिडा झाला. कारण नसतांना घरातल्यांवर चिडायचा, कामावर दांड्या पडायला लागल्या. कॉलेजला जाईनासा झाला. एके दिवशी- ‘तिचे लग्न झाले आहे, तिला एका डोंगराळ -दुर्गम गावात दिले आहे. तिचा नवरा खूपच दारुड्या आहे, घरची खूप गरिबी आहे.’ ही दोघांच्या एका चाहत्याने मोठ्या कष्टाने मिळवलेली माहीती नाथापर्यंत पोहोचवली. नाथा जाम वैतागला आणि एक दिवस उंदीर मारायचे औषध प्यायला. त्याच्या दुर्दैवाने ते औषध पॉवरफुल नव्हतं, त्यामुळे तो वाचला. आत्महत्येचा सर्व प्रकार झाल्यानंतर त्यामागची कारण घरच्यांना कळली आणि घरच्यांनी तत्काळ त्याचे लग्न ठरवले. नाथाच्या एका मामाच्या मुलीशी त्याचे लग्न ठरवले. त्याने खूप विनवण्या केल्या, खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही. शिकून नोकरीला लागलेल्या नाथाची एका अडाणी, अतिशय बालिश, त्याच्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी लहान असलेल्या गावंढळ मुलीशी गाठ बांधली गेली. सर्वांच्या आग्रहा खातर नाथाने लग्न तर केले पण मनाने तयार नव्हताच. जिच्याशी लग्न झाले त्या मुलीशी त्याचे काही भांडण नव्हते, तिच्याबद्दल काहीही राग नव्हता. तिला त्याचे आयुष्य समजत नव्हते त्यामुळे कधी दोस्ती झालीच नाही. त्याचे अजूनही घरी उशीरा येणे सुरुच होते आणि आता ते नियमित झाले. घरी यायचा त्याला कंटाळा येऊ लागला. नको त्या मित्रांबरोबर, वस्तीतल्या टारगट पोरांबरोबर रमू लागला.

व्हायचे तेच झाले. त्या मित्रांनी त्यांचे सर्व छंद याला सांगितले. घरात जावेसे न वाटणारा नाथा जीव रमण्यासाठी त्या मित्रांबरोबर दारु प्यायला शिकला. चांगले बोलणारा, चांगले लिहीणारा, वस्तीतल्या मुलांचा अभ्यास घेणारा, सामाजिक विषयांवर भाषण करुन वस्तीतल्या लोकांना ‘जागं’ करणारा नाथा आता रोज दारु पिऊन झोपू लागला.

परवा त्याच्या वस्तीत गेले होते. वस्तीत शिरताना वस्तीचे एक समाजमंदिर आहे. त्याच्या पायथ्याशी लहान मुलांचा खूपच गोंधळ चालू होता. मुले कशाच्या तरी भोवती गोळा व्हायची, लांब हसत पळायची आणि परत गोळा व्हायची. काय चाललेय असे बघायला म्हणून मीही त्या गर्दीत सहभागी झाले. पहाते तर भरदुपारी नाथा दारु पिऊन बसला होता आणि शाळा बुडवून गोट्या,जुगार खेळणाऱ्या पोरांना शाळेत जाणे कसे गरजेचे आहे ते सांगत होता. तो इतका प्यायला होता की त्याचे शब्द स्पष्ट, नीट फुटत नव्हते. तोल जात होता. त्याच्या वागण्या बोलण्याची गंमत वाटून पोरं त्याची चेष्टा करत होते.

एकेकाळी नाथाशी बोलणे म्हणजे आपले भाग्य समजले जात होते , त्याची आज चेष्टा केली जात होती. एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्या बरोबर गुण्यागोविंदाने राहण्याची इच्छा व्यक्त केली ह्या एका गुन्ह्याची किती शिक्षा त्याला भोगावी लागली, हे नाथालाच ठाऊक!

15 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922