Search

शोभी

शोभा, मोजून पाच फुट उंची. वय असेल बावीस-तेवीस. तिची आई अमावस्या-पौर्णिमेचा हिशेब करते, त्यावरुन काढलेले तिचे अंदाजे वय. गहू वर्ण सद्या तो काळाठिक्कर झालेला आहे. पण ओरीजनल कलर गहूवर्ण हे सांगायलाच पाहीजे इतका तो छान कलर! चेहरा अतिशय तेजस्वी. छान टपोरे डोळे, लांब नाक पण टोकदार नाही. त्यामुळे तिला राग येत नाही. कारण राग यायला, तो टिकायला नाकाला टोक पाहीजे, तर ते नाहीच! अतिशय चंचल, हुशार, सडपातळ मुलगी. आता मुलगी कसली बाई झाली आहे.

तिच्या मनाविरुद्ध लहानपणी लग्न केलं असलं तरी ती आता विवाहीता आहे. जोडीला दोन मुलं आहेत. त्यामुळे आमच्या वस्तीच्या भाषेत ती लहान असली तरी तिला आता बाईच म्हणायला पाहिजे. चौथीपर्यंत मनपाच्या शाळेत शिकलेली. शाळा सात वाजता सुरु व्हायची. आमची शोभा आठ-साडेआठ पर्यंत पोहोचायची. तिची आई मजुरीला जायची. त्यामुळे शोभला कायम शाळेत जायला उशीर व्हायचा. ती मात्र तिच्या मुलीला शाळेत वेळेवर जाता यावं, उशिरा आल्यानंतर उभ्या पट्टीने मिळणारा शिक्षकांचा मार मिळू नये यासाठी, कितीही थकलेली असली तरी सकाळी लवकर उठून शाळेची तयारी करुन द्यायची.

चौथीपर्यंत शोभा जेमतेम शिकली. पुढे लहान भावंडांना सांभाळण्यासाठी तिला शाळा सोडावी लागली. खरं तर तिचा भाऊ तिच्यापेक्षा मोठा, पण कुटुंबाला आधार म्हणून त्याला शाळेची आवड नसतानाही त्याचं नाव कमी केलं नाही. याउलट शोभला शाळेची खूप आवड. तिचा आवाजही गोड. नाचायलाही छान. पण मुलं फक्त मुलीनांच सांभाळता येतात ह्या पारंपारिक समजुतीमुळे तिला आपल्या या आवडीवर, आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं. शोभाची शाळा बंद झाली हे समजल्यानंतर तिच्या शिक्षिका घरी आल्या. आई-वडिलांना खूप समजावलं. वडील दारूच्या नशेत होते त्यामुळे त्यांच्या डोक्यात शिरलंच नाही. आई शुद्धीत होती पण तीने डोक्यात शिरुच दिले नाही. तरीही शोभा आपल्या लहान भावांना घ्यायची...शाळेत वर्गाच्या बाहेर, खिडकीजवळ बसून वर्गातल्या मुलींच्या स्वरात स्वर मिसळून पाढे म्हणायची. पण यामुळे घरातला पसारा तसाच पडून राहायचा. रात्री आई थकून आली की आधी दारुड्या नवऱ्याशी डोकं लावायची आणि मग ‘घर का आवरलं नाही?’ म्हणून शोभाला मारायची. अशा दिनक्रमातून शोभा मोठी झाली.

शाळा सुटली. पोरं सांभाळता सांभाळता शोभा मोठी झाली हे तिला तिचे लग्न ठरल्यावर समजलं. सहज म्हणून पाहुणे आले. तिची आई मजुरीवर गेली नव्हती याचा अर्थ पाहुणे खूप महत्वाचे असले पाहिजेत असं वाटून परकर-ब्लाऊज वरची शोभा स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला आणि आईने शोभाला साडी घालायला लावली. काय झालं काहीच कळेना. आई वरवर हसत, मनातून चिडत शोभाला तयार करत होती. हे काय चाललं आहे याची चौकशी केल्यानंतर समजलं की मागच्या बाजारात शोभाचे वडील बाजाराच्या गावाला गेले होते. तिथे नातेवाईक भेटले आणि दारु पित पित शोभाची शोभी झाली आणि शोभीच लग्न ठरवून आले. आजच्या बाजारा बरोबर सुपारी फोडून घ्यायला आले.

शोभाची चुलत सासू, सासरे, एक नणंद आणि दोन नातेवाईक एवढे पाहुणे पाहायला आले होते. ‘आलो आहोत’ तसे हातासरशी सुपारी फोडून घेण्यात आली. मुलाचा बाप, आई मात्र आली नव्हती. मोठ्या जाऊ बाईना मान द्यायचा म्हणून मुलाचे आईवडील ऐवजी काका-काकू आले असे दरवेळेस सांगितले गेले. लग्न झाल्यानंतर समजलं की सासूला वेडाचे झटके येतात. ज्यावेळी झटके येतात तेव्हा अखंडपणे ती बोलत असते. सारख्या उच्च स्वरात अर्वाच्य, अश्लील शिव्या देत असते. घरातलं सामान, कपडे, जेवण रस्त्यावर फेकून देते.

घरातली गाय सावकाराकडे गहाण ठेवून आईनं शोभीच लग्न केलं. सासरच्या लोकांना प्रत्येक वेळी दारु पाजल्यामुळे सराव पडला होता. लग्नात थोडी दारु कमी पडली म्हणून नवरदेवाच्या वऱ्हाडाने जेवणाची नासधूस केली. शिवीगाळ केली आणि उपाशीच शोभी नवऱ्याबरोबर सासरी आली. घरी पोहोचली नाहीतर नवरीच तोंड पाहायला आले-गेले सगळेच शोभिच्या आईबापाला शिव्या घालत होते. शोभी एकदम गप्प. नुकतीच मोठी झालेली शोभी. शाळेत जात होती तेव्हा खूप बोलायची. खूप शिकेन, मोठ घर बांधेन, नोकरी करेन, नवऱ्या बरोबर गाडीत फिरायला जाईन, गाडी मात्र मी चालवेन. अशी स्वप्न पाहणारी शोभा आता तिच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर त्याची बायको म्हणून राहते.

लग्नाला सहा महीने झाले असतील. शोभा मजुरीला जायला लागली. नवरा मनात आलं तर कामाला जातो. नाहीतर दिवसभर दारु पिऊन पडतो. सासू सरळ असते तोपर्यंत ठीक. एकदा का झटका आला तर ती कोणाचीच नसते. ज्यादिवशी झटका येतो त्यादिवशी सगळे उपाशी कारण ती कोणाला घरातच येऊ देत नाही. सासरा दोन्ही कानांनी बहीरा. त्यामुळे हातवाऱ्या वरच संवाद. सासरा सरकारी नोकरीत होता. त्याची पेन्शन आणि शोभाची मजुरी ह्यावरच घर चालत होतं. शोभाच घर म्हणजे उकाडा सेन्टरच. सर्व बाजूने पत्र होते. शोभा बांधकाम मजूर म्हणून कामाला जायला लागली तेव्हा ठेकेदाराला विनंती करुन स्वतः गवंड्याच्या हाताखाली काम करुन शोभाने घराला ‘उभे’ केले.

ती खूप आजारी आहे अस समजलं. तिच्या वस्तीत एका मिटींगला जाणारच होते. वस्तीतील मिटिंग आटोपून तिच्या घरी गेले तर शोभा पदराने डोकं बांधून झोपलेली होती. घरात पसारा पडलेला. घरातल्या एका कोपऱ्याला अंगाच मुटकुळं करुन शोभा झोपलेली होती. सकाळी साखर आणलेल्या कागदावर किरण बेदीचा फोटो होता, त्याच्या खालची माहिती वाचतच तिला झोप लागली होती. मी तिला आवाज दिला, दार उघडून आत गेले तोपर्यंत ती उठून बसली होती. हसली. पण त्यामागचं रडू लपवू शकली नाही. मीही अडवल नाही. वाहात तेवढ वाहून दिलं. “डोकं का बांधल?” विचारलं तर “खूप डोकं दुखतं” अस म्हणाली. ताप आहे का पाहण्यासाठी डोक्याला हात लावला तर कन्हली म्हणून परत चौकशी केली तेव्हा समजलं नवऱ्याला दारूला पैसे दिले नाही म्हणून रिकामी बाटली त्याने डोक्यावर मारली. आजूबाजूच्यांनी सोडवासोडव केली. कोणीतरी आईबाईने जखमेवर चहापत्ती बांधली. डोक्यावर आता पाटी घेता येत नाही म्हणून दोन दिवस घरीच आहे. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेली शोभा पारच सुकून गेली होती. साडी खालून पार गोळा झालेली. हातापायाच्या काड्या, डोळ्याभोवती काळं, डोळे खोल गेलेले, पण तेज मात्र तेच लहानपणी पाहिलेलं. आम्ही बोलत होतो तेवढ्यात तिची मुलगी आली. बाईंनी पुस्तक घ्यायला सांगितलं हे सांगायला. दवाखान्यात जाण्यासाठी मी तिला पैसे दिले होते त्यातले पैसे मुलीला दिले. मी नुसतीच पहात राहीले. माझ्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे न पाहता कागदावरच्या किरण बेदीकडे पहात म्हणाली, “माझी मुलगी मात्र मी हिच्या सारखीच करीन. त्यासाठी मी माझ पोट मारील, पण पोरीला शिकविल.” तिच्या कोरड्या डोळ्यातून आलेला एकमेव अश्रू गालावर येऊन थांबला. जणू काय तो मला ‘आशेचा किरण आहे’ असं सांगण्यासाठीच आला असावा.

29 views
SANGINI

Registration Address - 4, Kshitish Apartment, Near A1 Bakery, Rane Nagar, Nashik -422009

Maharashtra, India

Office Address - 203, Athavle Chembars,Opp Gavkari Press,Redcrowsss Signal Nashik -422001 422092233222244422

Email: sangini.mk16@gmail.com

Phone: 8625918180 / 8080940920

© 2018 by SANGINI. Proudly created with Om Creation & Infotech +91 - 7738553922